पुलवामानंतर इमरान खान आणि मोदींचं पहिल्यांदाच संभाषण

नरेंद्र मोदी- राहुल गांधी Image copyright Getty Images

14 फेब्रुवारीला पुलवामा इथं CRPF च्या जवानांवर झालेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यात थेट संवाद झाला आहे.

भारतीय आणि पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं यासंबंधी निवेदन प्रसिद्ध केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी नरेंद्र मोदींना फोन करून लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.

पंतप्रधानांनी इमरान खान यांना प्रादेशिक शांतता आणि विकासासाठी दहशतवादाविरोधात लढण्याचं आवाहन केलं, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार पंतप्रधानांनी इमरान खान यांना म्हटलं, की आपल्या प्रदेशात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी हिंसाचार आणि दहशतवादविरोधी वातावरण तयार करणं आवश्यक आहे.

दक्षिण आशियामध्ये शांतता, विकास आणि परस्पर सहकार्याच्या आपल्या आश्वासनाचा पंतप्रधान इमरान खान यांनी पुनरुच्चार केला, असं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

या मुद्द्यांवर भारतीय पंतप्रधानांसोबत काम करण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असं इमरान खान यांनी स्पष्ट केलं.

2014 मध्ये शपथविधीला नवाज शरीफ यांची उपस्थिती

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळाला आहे. 2014 साली निवडणूक जिंकल्यानंतर मोदींनी दक्षिण आशियाई देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आपल्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं.

या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफदेखील उपस्थित राहिले होते.

Image copyright Getty Images

नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी ते कोणत्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना शपथविधी कार्यक्रमाला बोलावणार आहेत, हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही.

केवळ इमरान खानच नाही तर मालदीवचे माजी राष्ट्रपती तसंच नेपाळचे माजी पंतप्रधान यांनीही फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे.

मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी पंतप्रधान मोदींचं त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केलं त्याचबरोबर कट्टरपंथ आणि दहशतवादाविरूद्ध लढण्याचं महत्त्वही अधोरेखित केलं. मोदींनी त्यांचे आभार मानताना दक्षिण आशियामध्ये विकास, सुरक्षा आणि शांततेसाठी काम करण्याचं आश्वासन दिलं.

नेपाळचे माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाल यांनीही पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं. जागतिक महासत्तेच्या दिशेनं होत असलेली भारताची वाटचाल संपूर्ण प्रदेशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)