कुटुंबातल्या तिसऱ्या मुलाचा मतदानाचा हक्क काढून घ्या - रामदेव बाबा #5मोठ्याबातम्या

रामदेव बाबा Image copyright Facebook

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) कुटुंबातल्या तिसऱ्या मुलाचा मतदानाचा हक्क काढून घ्या - रामदेव बाबा

देशातील वाढत्या लोकसंख्येवर उपाय म्हणून सरकारने कुटुंबातल्या तिसऱ्या मुलाला मतदानाचा अधिकार न देणारा कायदा संमत करावा. तसंच गोहत्या आणि दारूवर पूर्णत: बंदी घालावी, अशी मागणी रामदेव बाबा यांनी रविवारी केली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

"पुढील 50 वर्षांत भारताची लोकसंख्या 150 कोटींच्या पुढे जाता कामा नये. आपण त्याहून अधिक लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी तयार नाही आहोत. लोकसंख्येवर अंकुश लावायचा असल्यास तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार नकारण्यासोबतच त्याला कोणत्याही सरकारी सुविधा-योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा कायदा सरकारने मंजूर करायला हवा", असं रामदेव म्हणाले.

असं केलं तरच सर्व जाती-धर्मांचे नागरिक तिसऱ्या अपत्याला जन्म देण्याचे टाळतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला, असंही या बातमीत म्हटलं आहे.

2) सुषमा स्वराज यांचं विमान पाकिस्तान हवाई हद्दीतून

गेल्या आठवड्यात किर्गिस्तान मधल्या बिश्केकलमध्ये Shanghai Cooperation Organisation (SCO)ची बैठक झाली. त्यासाठी लांबून प्रवास टाळण्यासाठी भारत सरकारच्या विनंतीवरून पाकिस्ताननं त्यांच्या हवाई हद्दीतून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं विमान जाण्याची परवानगी दिली. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.

सध्या पाकिस्ताननं भारतीय विमानांना त्यांची हवाई हद्द बंद केल्यानं हजारो प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसाही वाया जात आहे.

Image copyright PTI

21 आणि 22 मे रोजी बिश्केकमध्ये SCOची परिषद झाली. त्यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी हेही उपस्थित होते. पण त्यावेळी दोन मंत्र्यांची बैठक झाली नसल्याचं भारत सरकारनं सांगितलं.

पाकिस्ताननं हवाई हद्द बंद केल्यानं भारतातून पश्चिमेकडे दररोज जाणाऱ्या 350 हवाई फेऱ्यांना फटका बसत आहे.

3) काही रडार ढगाआड वस्तू पाहू शकत नाहीत - लष्कर प्रमुख

सिमेपलिकडं प्रशिक्षण घेऊन भारतावर हल्ले करणाऱ्या 'दहशतवाद्यांना' संपवण्यासाठी बालाकोटचा हवाई हल्ला केल्याचं भारतीय लष्कर प्रमूख बिपिन रावत यांनी सांगितलं आहे.

तसंच काही काही विशिष्ट रडारांना ढगाआडून आलेल्या वस्तू दिसत नाहीत, असाही त्यांनी दावा केला आहे. दैनिक अमर उजालानं बातमी दिली आहे.

Image copyright PIB

बालाकोट हवाई हल्ल्यात देशातल्या अनेक सुरक्षा संस्थांनी चांगला समन्वय साधला.

रावत यांना रडारविषयी प्रश्न केला असता ते म्हणाले, "अनेक प्रकारचे रडार असतात. त्यामध्ये वेगवेगळी तंत्रं असतात. त्यापैकी काहींना ढगांना भेदून पाहण्याची क्षमता नसते."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत दाट ढगांमुळे पाकिस्तानच्या रडारांना भारतीय लढाऊ विमाने दिसली नाहीत असं म्हटलं होतं.

4) लोकसभा निवडणुकीत इतर देशांनी हस्तक्षेप केला - ममता बॅनर्जी

लोकसभा निवडणुकीत तडजोड करण्यात आली. इतर देशांनी भारतातील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

लोकसत्तानंही बातमी दिली आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली.

या निवडणुकीत पैशाचा गैरवापर झाला. आम्ही याचा सामना कसा करायचा? राजस्थान, गुजरात, हरयाणामध्ये भाजप इतक्या जागा कशा जिंकू शकते. लोक हे बोलायला घाबरतात, पण मी घाबरत नाही.

Image copyright Getty Images

निवडणूक आयोगानं दडपणाखाली काम केलं. केंद्रीय सुरक्षा दलांनी आमच्या विरोधात काम केलं. आणीबाणीची स्थिती निर्माण करण्यात आली. हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी ही निवडणूक करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मतांची विभागणी झाली. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली. पण कोणी दखल घेतली नाही, असे ममता म्हणाल्या.

5) डोंबिवलीत सापांसोबत जीवघेणे टिकटॉक व्हिडीओ, वनविभागाकडून दोन सर्पमित्र ताब्यात

सापांसोबत जीवघेणे स्टंट करत त्याचे टिकटॉक व्हीडिओ तयार करणाऱ्या दोघांना कल्याण वनविभागानं ताब्यात घेतलं आहे. हे दोघे स्वतःसोबतच लहान-लहान मुलांनाही विषारी सापांचं चुंबन घ्यायला लावायचे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही युवक हे डोंबिवलीत राहणारे आहेत. ABP माझानं ही बातमी दिली आहे.

त्यांनी सर्पमित्र म्हणून स्वतःची ओळख तयार केली होती. त्यातूनच एखादा साप पकडला, की हे दोघं त्या सापांसोबत जीवघेणे स्टंट करत व्हीडिओ चित्रित करायचे.

मागील काही दिवसांपासून त्यांनी सापांचं चुंबन घेताना असे अनेक टिकटॉक व्हिडीओ तयार केले होते. हे व्हिडीओ पाहून प्राणीमित्रांनी त्यांचा शोध घेतला असता ते डोंबिवलीत राहणारे असल्याचं समोर आलं, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)