खरंच ममता बॅनर्जी तृणमूलच्या आमदारांना 'वंदे मातरम' म्हणण्यापासून रोखत आहेत का? – फॅक्ट चेक

ममता बॅनर्जी Image copyright Getty Images

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना 'वंदे मातरम' म्हणण्यास मनाई करत असल्याचा दावा करणारा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ममता बॅनर्जींच्या या आदेशामुळे नाराज कार्यकर्त्यांनी हिंसाचार केल्याचा दावाही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये केला जात आहे.

व्हीडिओसोबतच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे, "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या मंत्री आणि आमदारांना वंदे मातरम म्हणण्यास मनाई करत आहेत. देशभक्त मंत्र्यांनं त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जो काही गोंधळ केला तो आपण पाहू शकतो. ममता बॅनर्जींना जीव वाचवण्यासाठी स्वतःला एका खोलीत बंद करून घ्यावं लागलं."

हा व्हीडिओ सोशल मीडियावर 1 लाखांहून अधिक वेळा शेअर केला गेला आहे.

Image copyright Social Media

3 मिनिटं 50 सेकंदांच्या या व्हीडिओमध्ये ममता बॅनर्जी काही लोकांसोबत तावातावानं बोलताना दिसत आहेत. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांनी राज्याच्या विधानसभेत गोंधळ घातला.

आमच्या पडताळणीत हा व्हीडिओ खरा असल्याचं सिद्ध झालं आहे. मात्र त्यासोबत जो दावा केला आहे, तो वस्तुस्थितीला धरून नाहीये.

व्हीडिओचं वास्तव

हा व्हीडिओ 30 नोव्हेंबर 2006 सालचा आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभेच्या लॉबीमध्ये तोडफोड केली होती. त्यावेळी बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. ममता बॅनर्जी तेव्हा मुख्यमंत्रीही नव्हत्या.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला युट्यूबवर एप्रिल 2011 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला एक व्हीडिओ सापडला. या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, की ममता बॅनर्जींकडून पश्चिम बंगालच्या विधानसभेत तोडफोड करण्यात आली.

गुगल सर्चमध्ये 'ममता बॅनर्जी, पश्चिम बंगाल विधानसभा तोडफोड' असे शब्द टाईप केल्यानंतर 30 नोव्हेंबर 2006च्या घटनेसंबंधीच्या अनेक बातम्या सापडतात.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सिंगूरमध्ये प्रवेश करण्यासंबंधीच्या प्रतिबंधात्मक आदेशाचं ममता बॅनर्जींनी उल्लंघन केलं होतं आणि त्यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईचा निषेध म्हणून तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते विधानसभेच्या आवारात घुसले होते. त्यांनी तिथे घोषणाबाजी आणि तोडफोड केली.

सिंगूरमध्ये आपल्याला प्रवेश करू न देण्याची प्रशासनाची कृती ही 'घटनाबाह्य' असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला होता. ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेतील फर्निचरची तोडफोड केली आणि कागदपत्रांचीही नासधूस होईल.

सिंगूरमध्ये कार निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी टाटा मोटर्सनं शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा आक्षेप ममता बॅनर्जींनी नोंदवला होता.

तृणमूल काँग्रेस आणि माकपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या झटापटीमध्ये डाव्या आघाडीचे सहा आमदार, विधानसभेतील दोन कर्मचारी आणि दोन पत्रकार जखमी झाले होते.

ममता बॅनर्जींनी त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना वंदे मातरम म्हणण्यापासून अडवलं नव्हतं. सिंगूरमध्ये जाण्यापासून अडविणाऱ्या पोलिस आणि डाव्या पक्षाच्या सरकारविरोधात त्या आपला निषेध नोंदवत होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)