रामाचं मंदिर होणार आणि ते लवकरच होणार - मोहन भागवत #5मोठ्याबातम्या

मोहन भागवत Image copyright RSS
प्रतिमा मथळा मोहन भागवत

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. राम मंदिराचं काम लवकरच होणार - मोहन भागवत

राम मंदिराचं काम लवकरच होणार आहे,असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर अहमदाबादमध्ये बोलताना त्यांनी म्हटलं की, "राम मंदिराचं निर्माण करायचं असेल, तर ते आपण स्वत:हून करणं गरजेचं आहे. ते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर सोपवलं, तर त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. रामाचं मंदिर होणार आणि ते लवकरच होणार."

"आपण वाट पाहत असलेल्या गोष्टींविषयी काम करणं गरजेचं आहे. ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण संबंधित संस्थांच्या कल्याणासाठी झटणं गरजेचं आहे," असंही त्यांनी म्हटलंय.

2. जय श्रीराम म्हणा, मराठी डॉक्टरला दिल्लीत सक्ती

दिल्लीतल्या कनॉट प्लेस या मध्यवर्ती भागात सकाळी फेरफटका मारायला निघालेल्या डॉ. अरुण गद्रे यांना 6 जणांच्या टोळक्याने अडवून ते कोणत्या धर्माचे आहेत, याची विचारणा केली. त्यानंतर त्यांना 'जय श्रीराम' म्हणण्याची सक्ती केली.

डॉ. गद्रे यांनी 'जय श्रीराम' म्हणताच टोळक्याने त्यांना सोडून दिले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

Image copyright BBC/Niranjan Chhanwal
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक फोटो

"या टोळक्याने मला कोणतीही शारीरिक इजा पोहोचवली नाही. पाच-सहा जणांनी अचानक घेरल्यामुळे थोडा विचलित झालो होतो. पण, हा प्रसंग क्षुल्लक असून त्यावरून कोणीही कुठलाही निष्कर्ष काढू नये," असे डॉ. अरुण गद्रे यांनी सांगितलं आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

डॉ. गद्रे हे डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर सामाजिक कार्यात सहभागी आहेत.

3. कार्यकर्त्यांनो चुकीचे वागाल तर मी वाचवायला येणार नाही- इम्तियाज जलील

"माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे. तुम्ही चुकीचे वागलात तर मी वाचवायला येणार नाही", असं मत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

लोकसभा निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Image copyright FACEBOOK
प्रतिमा मथळा इम्तियाज जलील

निवडणूक निकालादिवशी काही युवकानी गोंधळ केला होता. "माझ्या कार्यकर्त्यांमुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो," असंही त्यांनी म्हटलं आहे.

"शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आता राजकारण बंद करून शहराच्या विकासासाठी सोबत यावं. माझे कार्यकर्ते चुकीचे काम करत असतील तर मला सांगा, मी दोनशे टक्के कारवाई करेन," असंही ते पुढे म्हणाले.

4. 'कन्नड डेली'च्या वरिष्ठ पत्रकाराविरोधात बंगळुरूमध्ये FIR दाखल

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी यांच्याविरोधात कथितरित्या अपमानकारक बातमी छापल्यामुळे बंगळुरू पोलिसांनी कन्नड डेलीचे वरिष्ठ पत्रकार विश्वेश्वर भट यांच्या विरोधात FIR दाखल केली आहे. ETV भारतनं ही बातमी दिली आहे.

'कन्नड डेली' या वृत्तपत्रात निखिल आणि त्यांचे आजोबा एच.डी. देवेगौडा यांच्यात झालेल्या वादाबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती.

या बातमीत असे लिहिलंय की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर निखिल कुमारस्वामी आणि एच.डी. देवेगौडा यांच्यात बाचाबाची झाली होती. एच.डी. देवेगौडा यांनी निखिलची राजकीय कारकीर्द नाजूक अवस्थेत आहे, त्याच्यासाठी खर्च केलेला पैसा काढून घेतला पाहिजे, असं देवेगौडा यांनी निखिल यांना सुनावलं आहे.

5. शिक्षक भरतीला प्रारंभ

राज्यात जवळपास 12 हजार शिक्षकांची पदं भरण्यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

Image copyright SANTOSH MAGAR

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यात तब्बल 9 वर्षांनंतर शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे.

राज्यात डीएड आणि बीएड बेरोजगारांची संख्या जवळपास 7 लाखांपर्यंत आहे. सरकारी आणि खासगी शाळांमध्ये जवळपास 25 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत, असं बातमीत म्हटलं आहे.  

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)