विधानसभा 2019 : यंदा भाजप-शिवसेना युती 220 जागा जिंकणार - देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1.विधानसभेच्या 220 जागा जिंकणार; मुख्यमंत्र्यांचा दावा

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती 220 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. टाइम्स ऑफ इंडिया ही बातमी दिली आहे.

"लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रचार करत राज्यातील 48 पैकी 41 जागांवर विजय मिळवला. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून 220 जागांवर विजय मिळवू," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या धोरणांचा फायदा जनतेपर्यंत पोहोचला आहे आणि आम्हाला मिळालेल्या मोठ्या विजयातून हे सिद्ध होत आहे. आम्ही विधानसभा निवडणुकीत नवा विक्रम प्रस्थापित करू," असंही त्यांनी म्हटलंय.

2. तृणमूलचे 2 आमदार आणि 60 नगरसेवक भाजपमध्ये

तृणमूल काँग्रेसचे 2 आणि कमुनिस्ट पक्षाच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमात या आमदारांसोबत जवळपास 50 ते 60 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे.

Image copyright PTI

भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी पक्षात प्रवेश केलेल्या आमदारांचं आणि नगरसेवकांचं अभिनंदन केलं.

ते म्हणाले, "यापुढेही अनेक आमदार आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत."

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी रात्री कोलकात्यात काही पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं आहे.

3. नितीन गडकरींना कृषीमंत्री करा - शेतकऱ्याची मागणी

नितीन गडकरी यांना कृषीमंत्री करा, अशी मागणी नाशिकमधील शेतकरी संजय साठे यांमी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पुढारीनं ही बातमी दिली आहे.

संजय साठे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मोदींना एक भेट पाठवली आहे. या भेटीत एक गांधी टोपी, दोन रुमाल आणि एक हस्तलिखित पत्र आहे.

Image copyright BBC/PRAVIN THAKARE
प्रतिमा मथळा संजय साठे

"मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करु इच्छितो. यामुळेच परंपरेनुसार मी त्यांना एक पांढरी टोपी आणि दोन मोठे रुमाल पाठवले आहेत. तसंच नितीन गडकरी यांना कृषीमंत्री करण्यात यावं, अशी मी नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे," असं साठे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कांद्याचे भाव पडल्यामुळे साठे यांनी गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 1064 रुपयांची मनी ऑर्डर पाठवली होती. त्यावेळी ते चर्चेत आले होते.

4.राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

Image copyright ABHIJEET GHORPADE

मंगळवारी (28 मे) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

त्यासाठी एरियल क्लाऊड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यात येणार आहे. यासाठी 30 कोटी रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.

5. उत्तर प्रदेशात विषारी दारूमुळे 12 लोकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी जिल्ह्यात विषारी दारू पिल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 39 जणांवर उपचार सुरू आहेत. द वायर हिंदीनं ही बातमी दिलीय.

"बाराबंकी जिल्ह्यातल्या रामनगर भागातील नागरिकांनी सोमवारी आणि मंगळवारी रात्री विषारी दारू पिली, त्यानंतर त्यांची तब्येत खालावली. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला. यातील 4 जण एकाच कुटुंबातील आहेत," असं बाराबंकीचे पोलीस अधीक्षक अजय साहनी यांनी सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)