अरुण जेटली यांची मोदी मंत्रिमंडळातून माघार: ABVP ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास

अरूण जेटली Image copyright Getty Images

यंदाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मला समाविष्ट करू नये, अशी विनंती करणारं पत्र अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात अरुण जेटली अर्थमंत्री आणि काही काळ संरक्षण मंत्रालयही त्यांनी सांभाळलं होतं.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या एकदिवस आधी जेटलींनी मोदींना लिहिलेलं पत्र ट्वीट करून त्याबाबतची माहिती दिली आहे. या पत्रात त्यांनी त्यांच्या आरोग्याचा संदर्भ दिला आहे.

जेटली यांनी या पत्रात लिहिलं आहे, "गेल्या 8 महिन्यांपासून मी गंभीर आरोग्य समस्यांशी लढा देत आहे. डॉक्टरांच्या मदतीनं त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकांचा प्रचार संपल्यानंतर मी तुम्हाला याबाबत तोंडी सांगितलं होतं, यापुढे मला कुठल्याही जबाबदारीपासून दूर ठेवावं अशी विनंती.

"आता मी आपल्याला औपचारिक विनंती करत आहे की नव्या सरकारमध्ये न सहभागी होण्याची अनुमती मला द्यावी," असं ते या पत्रात पुढे म्हणतात.

अमेरिकेला उपचाराला गेल्यामुळे अरुण जेटली यावर्षी बजेट सादर करू शकले नव्हते. 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या वतीने रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी अंतरिम बजेट सादर केलं होतं.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये किडनीवर उपचार करण्यासाठी अरुण जेटली यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. जेटली यांनी स्वतः ट्वीट करून त्यांना किडनीच्या समस्येनं ग्रासलं असल्याचं सांगितलं आहे.

जेटलींचा राजकीय प्रवास

28 डिसेंबर 1952 रोजी अरुण जेटली यांचा महाराज किशन जेटली आणि रतन प्रभा जेटली यांच्या घरी जन्म झाला. त्यांचे वडील वकील होते.

अरुण जेटली हे विद्यार्थी दशेपासूनच भाजपशी जोडले गेले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सदस्य होते.

दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी कॉमर्सची पदवी घेतली आणि दिल्ली विद्यापीठातून कायद्याचं शिक्षणही पूर्ण केलं.

याच दरम्यान 1974 साली ते दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बनले. त्यानंतर 1991 साली ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनले.

याच दरम्यान त्यांचं 1982 साली संगीता डोग्रा यांच्याशी लग्ना झालं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Image copyright Getty Images

दरम्यान, 1999 साली केंद्रात सत्तेत आलेल्या अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये अरुण जेटलींनी माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर 2000 साली ते कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यांच्यावर कायदा व न्याय मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली.

2004 साली NDAच्या पराभवानंतर जेटली भाजपचे सरचिटणीस बनले. पक्षाने त्यांना राज्यसभेवरही पाठवलं. 2009 मध्ये भाजपनं राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून जेटलींची निवड केली.

2014 मध्ये अरुण जेटलींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. अमृतसरमधून भाजपचे तत्कालीन खासदार नवज्योत सिंह सिद्धू यांना डावलून अरुण जेटलींना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काँग्रेसच्या कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी जेटलींचा पराभव केला.

त्यानंतर पक्षाने त्यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवलं आणि त्याच खासदारकीवर त्यांनी गेली पाच वर्षं मोदी सरकारमध्ये वेगवेगळी केंद्रीय मंत्रिपदं सांभाळली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)