मिमी चक्रवर्ती, नुसरत जहां संसदेत फोटो काढण्याच्या वादावर काय बोलल्या?

खासदार Image copyright Twitter

लोकसभेत पहिल्यांदा निवडून आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां यांनी त्यांच्या ट्रोल्सला उत्तर दिलं आहे.

संसदेच्या बाहेर जीन्स आणि टी शर्ट घालून फोटो काढण्याच्या निर्णयावर मिमी यांनी बीबीसीशी बातचीत केली. त्या म्हणतात, "आम्ही जीन्स आणि टीशर्ट का घालणार नाही. आम्ही तर युवा आहोत."

"लोकांना आमच्या कपड्यांमुळे इतकी अडचण आहे. पण ज्यांचे कपडे संतांसारखे आहेत मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्याबाबत ते काय बोलणार?" असा प्रश्न मीमी चक्रवर्ती विचारतात.

मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहांचे हे फोटो व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला. "ही संसद आहे की फॅशन शो?" असाही प्रश्न काही लोकांनी विचारला आहे.

नुसरत यांचं वय 29 आहे आणि मिमीचं वय 30 वर्षं. मिमींच्या मते, "मी नेहमीच युवा वर्गाचं प्रतिनिधित्व केलं आहे. जे कपडे ते लोक घालतात तेच कपडे मी घालते असं त्यांना कळलं तर त्यांना आनंदच होईल."

मिमी सांगतात, त्यांनी चित्रपटापेक्षाही राजकारणाला जास्त प्राधान्य दिलं आहे. कारण त्यांच्या मते युवा वर्गच बदल आणू शकतो.

नुसरत यांच्या मते तिकीट दिल्यावरच त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र त्यांच्या विजयाने टीकाकारांची तोंडं बंद झाली आहेत.

नुसरत जहां यांना बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून साडे तीन लाख मतांनी विजय मिळाला आहे.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "माझ्या कपड्याचं काही महत्त्व नाही. माझ्या विजयासारखंच माझं कामही बोलेल. पुढचा मार्ग इतका सोपा नाही. पण आम्ही तयार आहोत."

संसदेत कपड्यांच्या बाबतीत कोणताच कायदा नाही किंवा ड्रेसकोड नाही.

सामान्यत: राजकारणात मुलांच्या तुलनेत बायकांच्या कपड्यांवर शेरेबाजी जास्त प्रमाणात होते. ममता बॅनर्जी, जयललिता, मायावती यांनी या बाबतीत सार्वजनिक पातळीवर वक्तव्य केलं आहे.

जर महिला चित्रपट क्षेत्रातून आल्या असतील तर फरक आणखी स्पष्टपणे दिसतो.

पुरुष खासदारांच्या बाबतीत वाद का नाही?

मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां टॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

मिमी सांगतात, "जेव्हा असे बदल होतात तेव्हा ते बदल स्वीकारायला लोकांना अडचणी येतात. जेव्हा तरुण पुरुष खासदार जीन्स किंवा टीशर्ट घालून येतात तेव्हा कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही. पण जेव्हा महिला खासदार असं करतात तेव्हा लोकांना प्रश्न पडतात."

टीकेबरोबर दोन्ही अभिनेत्रींना अनेकांनी पाठिंबाही दिला.

नुसरत यांच्या मते हा बदलाचा संकेत आहे. "लोकांनी समजून घेण्याची वेळ आली आहे. हे अचानक होणार नाही मात्र आता सुरुवात तरी झाली आहे."

या आधीही तृणमूल काँग्रेसने चित्रपटसृष्टीतल्या अनेकांना तिकीटं दिली आहेत.

देशातल्या सगळ्या पक्षांच्या तुलनेत तृणमूल काँग्रेसने महिलांना सगळ्यांत जास्त प्रमाणात तिकिटं दिली होती.

त्यात 17 महिलांपैकी चार चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यापैकी तिघींचा विजय झाला.

2014 मध्ये जिंकलेल्या मूनमून सेन यांचा यावेळी पराभव झाला आहे.

मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां यांच्याशिवाय तीनदा निवडणूक जिंकणाऱ्या शताब्दी रे यांचाही विजय झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)