नरेंद्र मोदी घेणार शपथ; सोनिया-राहुल गांधीही राहणार उपस्थित #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळ घेणार शपथ; सोनिया-राहुल गांधीही राहणार उपस्थित

लोकसभेत गेल्या वेळेपेक्षा मोठे बहुमत संपादन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा शपथ घेत आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळही शपथबद्ध होईल.

या मंत्रिमंडळामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मावळते अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा समावेश होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

या शपथविधीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहाणार आहेत.

Image copyright SAJJAD HUSSAIN

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शपथविधीला उपस्थित राहाणार नाहीत. गेल्या शपथविधीला सार्क देशातील नेते उपस्थित राहिले होते आता यावेळेस बिमस्टेक देशाचे प्रमुख उपस्थित राहाणार आहेत. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

2) उपचारांसाठी देशाबाहेर जाऊ देण्याची रॉबर्ट वड्रांची मागणी

रॉबर्ट वाड्रा यांनी उपचारासाठी आपल्याला परदेशात जाण्याची मागणी केली होती. या मागणीला सक्तवसुली संचालनालयाने विरोध केला.

Image copyright Getty Images

बुधवारी विशेष न्यायालयाने या मागणीवर निर्णय राखून ठेवला. रॉबर्ट वड्रा यांच्या मोठ्या आतड्यातील एका लहान गाठीबाबत सेकंड ओपिनियन घेण्यासाठी त्यांना लंडनला जाऊ द्यावे अशी मागणी त्याचें वकील केटीएस तुलसी यांनी न्यायालयासमोर केली.

मनी लाँड्रिंगच्या या खटल्यात न्यायालयीन चौकशीसाठी प्रयत्न करणाऱ्या ईडीने या मागणीला विरोध केला.

विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी निर्णय 3 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3) राज्यात वाघांची संख्या 60 ने वाढली- मुनगंटीवार

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आणि इतर जंगले मिळून राज्यात वाघांची संख्या 250 वर गेली आहे. 2018 साली झालेल्या व्याघ्रगणनेतून ही माहिती समोर आली आली आहे.

मागील गणनेच्या तुलनेत वाघांमध्ये 60 ने वाढ झाली आहे असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Image copyright Getty Images

व्याघ्र गणनेसाठी राज्यात प्रथमच एम-स्ट्राइप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने या गणनेची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

4) मुख्यमंत्र्यांनी केली बँकांची कानउघडणी

राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणीच होणार नसेल तर नुसती बैठकांची औपरचारिकता कशाला? निर्णय स्थानिक शाखेपर्यंत पोहोचणार नसतील आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नसेल तर अशा बैठकांची आवश्यकता नाही.

तुमच्या व्यवसायात कर्जाला प्राधान्य असले तरी कृषी कर्जवाटपाच्या कामाला प्राधान्य नाही अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीयीकृत बँकांना फैलावर घेतले.

Image copyright TWITTER

गेल्या वर्षी बँकांना 58,331 कोटी कर्जांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील केवळ 54 टक्के पीक कर्जाचे वाटप झाले.

त्यातही राज्य सहकारी आणि जिल्हा बँकांनी 68 टक्के कर्जवाटप केले. तर पंजाब आणि सिंध बँकेने 6 टक्के, युनायटेड बँक ऑफ इंडियाने 2 टक्के, देना बँकेने 23 टक्के असे वाटप केले.

कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतल्याचे समोर येताच मुख्यमंत्री संतप्त झाले आणि उद्दिष्टपूर्तीसाठी बँकांनी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले.

5) नवीन पटनाक पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी

ओडिशा विधानसभेत मोठा विजय मिळवल्यावर बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच ओडिशा विधानसभेतही बिजू जनता दलाला चांगले यश मिळाले आहे. भुवनेश्वर येथे त्यांना राज्यपाल गणेशी लाल यांनी शपथ दिली.

Image copyright Getty Images

ओडिशा विधानसभेत 147 पैकी बिजू जनता दलास 112 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पटनाईक यांना सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले आहे.

आता या नव्या विधानसभेत भाजपच्या 23, काँग्रेसच्या 9 जागा आहेत. हे वृत्त एबीपी माझाने प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)