मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेतल्या सौंदर्यवतींच्या निवडीला रंगभेदाचं गालबोट

सौंदर्य Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतिकात्मक

भारतातली सर्वोच्च सौंदर्य स्पर्धा असलेली 'मिस इंडिया' स्पर्धा सुरू होण्याआधीच वादात सापडली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या सौंदर्यवतींमध्ये सर्वच्या सर्व ललना या गौरवर्णीय आहेत. कुणीच सावळ्या किंवा काळ्या कांतीची नाही.

त्यामुळे स्पर्धेच्या आयोजकांवर टीकेची झोड उठली आहे. ट्विटरवरून सुरू झालेली ही टीका आता सर्वच स्तरातून होऊ लागली आहे.

एका इंग्रजी दैनिकात या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. जाहिरातीमध्ये म्हटलं आहे की भारताच्या प्रत्येक राज्यातून एकीची निवड यात करण्यात आली आहे.

या तीस स्पर्धकांपैकी एकीला मिस इंडिया 2019 चा हिरेजडित मुकुट घालण्याचा मान मिळणार आहे. 15 जून रोजी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतल्या विजेत्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील.

"Who will be crowned Miss India this year?" या मथळ्याखाली स्पर्धेचं प्रमोशन करणारी संपूर्ण पानभर बातमी छापली आहे.

यात म्हटलंय की आयोजकांनी भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चारही दिशांनी फिरून सर्वच्या सर्व 30 राज्यांपैकी प्रत्येक राज्यातून एक विजयी सौंदर्यवतीची निवड केली. अशाप्रकारे 30 राज्यांतून निवड झालेल्या या 30 जणींमध्ये आता मिस इंडिया 2019च्या किताबासाठी लढत होईल.

मात्र, वृत्तपत्रातल्या त्या फोटोवरूनच वाद सुरू झाला आहे. एका ट्विटर यूजरने हा फोटो ट्विट करत एक प्रश्न विचारला आहे, "What is wrong with this picture?" (या फोटोत काय चुकीचं वाटतंय?)

या ट्वीटला अनेकांनी उत्तर दिलंय. त्यातल्या अनेकांनी फोटोत वैविध्य दिसत नसल्याचं म्हटलंय. या फोटोमधल्या सर्वच तरुणींचे केस सरळ आणि रंग गोरा आहे. त्यामुळे त्या सगळ्या सारख्याच दिसतात. काहींनी तर या तीस जणी नसून एकीचेच तीस फोटो काढल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

'आयोजकांची प्रतिक्रिया अद्याप नाही'

सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय झाल्यावर आम्ही आयोजकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजूनतरी त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नव्वदीच्या दशकाच्या मध्यापासून भारतात सौंदर्य स्पर्धांकडे गांभीर्याने बघितलं जातंय. देशाने ऐश्वर्या राय, सुश्मिता सेन, प्रियंका चोप्रा यासारख्या अनेक सुप्रसिद्ध मिस इंडिया दिल्या आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्येही छाप उमटवली. त्यातल्या अनेकींना बॉलीवुडमध्ये चांगलं करियर घडवलंय.

गेल्या काही वर्षांत सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायला इच्छुक असणाऱ्या तरुणींना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचं पेव फुटलंय. मात्र, अशा संस्थांमधूनही ज्यांनी पुढे यश मिळवलं, त्यातही गोऱ्या रंगाच्या तरुणींचीच संख्या अधिक आहे.

पण, यात आश्चर्य वाटण्यासारखं खरंतर काहीच नाही.

भारतात गोऱ्या रंगाप्रती असलेलं आकर्षण, विशेषतः मुलींच्या बाबतीत, सर्वश्रृत आहे. अनेकांना असं वाटतं की गोरा रंग हा काळ्या रंगापेक्षा श्रेष्ठ आहे.

1970च्या दशकात रंग उजळवणारी फेअर अँड लव्हली क्रिम भारतीय बाजारात आली आणि तेव्हापासून भारतात सर्वाधिक खप असणाऱ्या उत्पादनांमध्ये रंग उजळवणाऱ्या कॉस्मेटिक्सची संख्या मोठी आहे. इतकंच नाही तर गेली अनेक वर्षं बॉलीवुड तारे-तारका या उत्पादनांचं प्रमोशनही करतात.

Image copyright Getty Images

या उत्पादनांच्या जाहिराती केवळ त्वचेचा रंग उजळवण्याचं आश्वासन देतात असं नव्हे, तर गोरा रंग चांगली नोकरी, मनासारखा प्रियकर आणि चांगला जोडीदार शोधण्यातही मदत करतो, असंही प्रेक्षकांवर बिंबवतात.

शिवाय एका विशिष्ट रंगालाच झुकतं माप देणाऱ्या सौंदर्य स्पर्धादेखील वर्षांनुवर्ष चालत आलेल्या या मानसिकतेवर शिक्कामोर्तब करतात.

'पुरुषांनाही वाटतं आपण गोरं असावं'

2005 साली उद्योगविश्वातल्या काही मातब्बर मंडळींना वाटलं की आपला गोरा रंग असावा असं केवळ स्त्रियांना वाटत नाही पुरुषांना देखील आपण गोरं असावं असं वाटतं. यातूनच जन्म झाला भारतातल्या पहिल्या पुरुषांसाठीच्या फेअरनेस क्रिमचा - फेअर अँड हँडसम. या क्रिमची पहिली जाहिरात केली बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानने. या क्रिमचा खप झाला नसता तरच नवल.

रंगभेद करणाऱ्यांविरोधात एक मोहीम चालवली गेली. काळा रंगही सुंदर असतो हे या मोहिमेतून सांगितलं गेलं. Dark is Beautiful आणि #unfairandlovely यासारख्या काही मोहिमा सुरू झाल्या. गेल्या वर्षी मी एका खास कॅम्पेनविषयी लिहिलं होतं. त्या मोहिमेत भारतीय देवी-देवता काळ्या रंगाचे दाखवण्यात आले होते.

मात्र, अशा कॅम्पेन्सनंतरही भारतात काखेच्या रंगापासून स्त्रीच्या प्रायव्हेट पार्ट्सचा रंग उजळण्यापर्यंतच्या क्रिम आणि जेलचा महापूर काही थांबलेला नाही. भारतात दरवर्षी शेकडो दशलक्ष डॉलर्सचे फेअरनेस प्रॉडक्ट्स विकले जातात, यावरूनच या उत्पादनांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

'सौंदर्याचं अर्थकारण'

एका अंदाजानुसार 2023 सालापर्यंत केवळ महिलांसाठीच्या रंग उजळवणाऱ्या उत्पादनांचं मार्केट 50 अब्ज रुपयांपर्यंत पोहचेल.

रंग गोरा करणाऱ्या उत्पादनांचं समर्थन करणारे, ही वैयक्तिक आवड असल्याचं म्हणतात. ओठांचा रंग अधिक लाल व्हावा यासाठी त्या लिपस्टिक वापरू शकतात तर मग चेहऱ्याचा रंग गोरा व्हावा, यासाठी क्रिम वापरण्यात काय हरकत आहे?, असा त्यांचा युक्तीवाद असतो.

Image copyright Getty Images

तार्किकदृष्ट्या त्यांचं म्हणणं योग्य वाटू शकतं. मात्र, गोऱ्या रंगासाठीचा हा हव्यास अत्यंत अयोग्य असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं की यात गोरेपणाचं श्रेष्ठत्व सुप्तपणे मांडण्यात आलं असलं तरी ते सातत्याने बिंबवलं जातं. त्यामुळे सामाजिक पूर्वग्रह कायम ठेवला जातो आणि यातून आधीच काळ्या रंगाचा न्यूनगंड घेऊन मोठ्या झालेल्या व्यक्ती अधिकच दुखावल्या जातात. यामुळे त्यांच्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यावरही नकारात्मक परिणाम होत असतो.

काम देताना आपल्यासोबत कसा दुजाभाव करण्यात येतो, हे काळा रंग असणाऱ्या मॉडेल्सकडून आपण ऐकलं आहे. बॉलीवुडमध्येदेखील सावळ्या किंवा काळ्या कांतीच्या नायिका बोटांवर मोजण्याइतपतच आहेत.

जाहिरातींचं नियमन करणाऱ्या Advertising Standards Council of India (ASCI) या संस्थेने 2014 साली एक नियमावली प्रसिद्ध केली होती. यात काळा रंग असणाऱ्या व्यक्ती 'कुरूप, दुःखी, उदास किंवा काळजीचं कारण असल्याचं' दाखवण्यावर बंदी घातली होती. लग्न, नोकरी किंवा पदोन्नतीत अशा व्यक्तींना डावललं जातं, असा संदेश जाहिरातीतून जाता कामा नये, असंही म्हटलं होतं.

तरीही जाहिराती या नियमांचं सर्रास उल्लंघन करतात. बॉलीवुडमधले लोकप्रिय चेहरे आजही अशा जाहिराती करतात.

'आशेचा किरण'

मात्र, हा लेख लिहित असतानाच एक चांगली बातमी आली. तेलुगू सिनेसृष्टीतली आघाडीची नायिका साई पल्लवीने आपण यावर्षीच्या सुरुवातीला 2 कोटी रुपयांची फेअरनेस क्रिमची जाहिरात नाकारल्याचं म्हटलंय.

याविषयी दिलेल्या प्रतिक्रियेत ती म्हणते, "अशा जाहिरातींमधून मिळालेल्या पैशाचं मी काय करू? माझ्या गरजा काही फार मोठ्या नाही. मी हे म्हणू शकते की आपण जी मानकं ठरवली आहेत, ती चुकीची आहेत. हा भारतीय रंग आहे. आपण परदेशी लोकांकडे जाऊन ते गोरे का असं विचारू शकत नाही. तो त्यांचा रंग आहे आणि हा आपला."

साई पल्लवीच्या या कृतीचं आणि प्रतिक्रियेचं स्वागत होतंय. विशेषतः यंदाच्या मिस इंडिया स्पर्धेच्या सौंदर्यवतीचा फोटो प्रकाशित झाल्यावर तर साई पल्लवीचं व्यक्तिमत्त्व अधिकच उजळून दिसतंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)