नरेंद्र मोदी यांचा शपथविधी जसोदाबेन यांनी पाहिला नाही

जसोदाबेन-नरेंद्र मोदी Image copyright Getty Images

लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला मॉरिशस, किरगिस्तान आणि बिमस्टेक (अर्थात बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूटान) या देशांचे प्रमुखही उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं गेलं. पण या सगळ्या उत्सवी वातावरणापासून नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन या मात्र दूर राहिल्या आणि अलिप्तही...

जसोदाबेन आणि त्यांच्या कुटुंबीयांना शपथविधीचं आमंत्रण नव्हतं आणि त्यांनी टीव्हीवरही हा कार्यक्रम पाहिला नाही. बीबीसी गुजरातीनं जसोदाबेन यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या भावाने सांगितलं की त्या सुरत महानगरपालिकेनं शाळकरी मुलींसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या.

जसोदाबेन यांचे बंधू अशोक मोदी यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं, की आम्हाला शपथविधीचं आमंत्रण आलेलं नाहीये. सध्या आम्ही सुरतमध्ये एका कार्यक्रमासाठी आलो आहोत. संध्याकाळी आम्ही प्रवासात असू. त्यामुळं टीव्हीवरही आम्हाला शपथविधी पाहता येणार नाही.

टीव्हीपासून दूरही झाल्या नव्हत्या जसोदाबेन...

प्रतिमा मथळा घरात टीव्ही पाहताना जसोदाबेन

26 मे 2014 ला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. देश-परदेशातून चार हजार पाहुणे मोदींच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र मोदींच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या सोहळ्याला हजर राहिली नव्हती. मोदींचे चार भाऊ सोमभाई, अमृतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई त्याचप्रमाणे त्यांची बहीण वसंतीबेन, आई हिराबा मोदींच्या शपथविधीला हजर राहिले नव्हते.

अहमदाबादपासून काही अंतरावर असलेल्या उंझा गावात जसोदाबेनही टीव्हीवरच मोदींचा शपथविधी पाहत होत्या. त्या पूर्णवेळ टीव्हीपासून दूर झाल्या नव्हत्या. त्या कोणाशीही बोलत नव्हत्या. नातेवाइकांनाही या दिवशी त्यांनी लांब ठेवलं होतं. लोकांच्या प्रश्नांना टाळण्यासाठी जसोदाबेन एका खोलीतच बसून राहिल्या होत्या, असं बीबीसी गुजरातीचे संपादक अंकुर जैन यांनी सांगितलं. त्यावेळी अंकुर उंझा गावात जसोदाबेन यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले होते.

जसोदाबेन यांना दिल्लीला येण्याचं आमंत्रणही मिळालं नाही आणि त्यांची जाण्याची इच्छाही नव्हती. आता त्या केवळ ईश्वरभक्तीत लीन राहतात, असं जसोदाबेन यांचे भाऊ अशोक मोदींनी सांगितलं होतं.

'त्यांनी बोलावलं तरच मी जाईन'

प्रतिमा मथळा जसोदाबेन त्यांच्या कुटुंबियांसोबत

जसोदाबेन कागदोपत्रीच नरेंद्र मोदींच्या पत्नी आहेत. आपल्या पतीच्या यशात सहभागी होण्याची संधी त्यांना कधीच मिळाली नाही. मोदीचं होणारं कौतुक त्या केवळ टीव्हीवरूनच पाहतात.

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी भारतात प्रजासत्ताक दिनाला पाहुणे म्हणून आलेल्या बराक आणि मिशेल ओबामांचं स्वागत करत होते. टीव्हीवरून या भेटीचं थेट प्रक्षेपण दाखवलं जात होतं. जसोदाबेन यांच्या घरीही टीव्ही सुरू होता. सुरुवातीला त्यांनी टीव्हीवरच्या दृश्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर मात्र त्या बारकाईनं सर्व कार्यक्रम पाहू लागल्या.

बीबीसी गुजरातीचे संपादक अंकुर जैन या घटनेच्या वेळेस जसोदाबेन यांच्या घरी होते. मिशेल आणि बराक ओबामा यांच्यासोबत मोदींना पाहिल्यानंतर जसोदाबेन यांनी म्हटलं, "ओबामांचं स्वागत होत असताना मी दिल्लीमध्ये असायला हवं होतं. पण साहेबांची (मोदी) तशी इच्छा नाहीये. त्यामुळे आता मलाही काही फरक पडत नाही."

"जर त्यांनी मला आज बोलावलं, तर मी उद्या तिथं पोहोचेन. पण मी स्वतःहून कधीच त्यांच्याकडे जाणार नाही. त्यांनी मला बोलवायला हवं. मी आत्मसन्मानाशी तडजोड करणार नाही. आमच्या दोघांच्या सामाजिक दर्जात काही फरक आहे, असं मला वाटत नाही. आम्ही दोघंही मनुष्यच आहोत," असं जसोदाबेन यांनी म्हटलं.

जसोदाबेन यांचं आयुष्य

जसोदाबेन यांचा विवाह नरेंद्र मोदींशी 1968 साली झाला होता. त्यावेळी त्यांचं वय हे 17 वर्षे होतं. विवाहानंतरच्या दिवसांबद्दल बोलताना जसोदाबेन यांनी सांगितलं, "लग्नानंतर ते काही महिने माझ्यासोबत राहिले. ते सकाळी आठ वाजता बाहेर पडायचे आणि रात्री उशिरा घरी यायचे. एकदा ते बाहेर पडले आणि पुन्हा परत आलेच नाहीत. मी तीन वर्ष सासरी राहिले. मात्र आता ते आपल्याकडे परत येणार नाहीत, याची जाणीव मला झाली आणि मी माहेरी परत आले. शिक्षण पूर्ण करून मी शिक्षिकेची नोकरी पत्करली."

जसोदाबेन आपल्या भावाच्या कुटुंबासोबत राहतात. आता त्या निवृत्त झाल्या असून त्यांना महिना 14 हजार रुपये पेन्शन मिळते.

नरेंद्र मोदींनी 2002, 2007 आणि 2012 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन भरताना त्यांच्या वैवाहिक स्थितीबद्दल काहीच माहिती दिली नव्हती. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र भरताना त्यांनी आपण विवाहित असल्याचं मान्य केलं आणि पत्नीचं नाव जसोदाबेन असल्याचं नमूद केलं. त्यानंतर जसोदाबेन प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

याबद्दल बोलताना जसोदाबेन यांनी म्हटलं होतं, "जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मी त्यांची पत्नी असल्याचं स्वीकारलं नव्हतं. मी मोदींची पत्नी आहे, असं सांगितलं की भाजपचे लोक त्यावर विश्वास ठेवायचे नाहीत. गेल्या वर्षी त्यांनी मी पत्नी असल्याचं मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)