हिंदुत्ववादी वकील संजीव पुनाळेकर यांना अटक: आता दाभोलकर हत्याकांडाचं कोडं सुटणार?

नरेंद्र दाभोलकर-संजीव पुनाळेकर Image copyright Getty Images

ॲडव्होकेट संजीव गजानन पुनाळेकर... न्यूज चॅनेल्सवरील चर्चेत अत्यंत आक्रमकपणे, ठासून बोलत सनातन संस्थेची, कडव्या हिंदुत्वाची बाजू मांडणारा एक चेहरा. टीव्ही चॅनल्सवर जेव्हा कधी सनातन संस्था, दाभोलकर हत्या प्रकरण, पानसरे हत्या प्रकरण, 'भगवा दहशतवाद', या विषयांवर चर्चा व्हायची तेव्हा संजीव पुनाळेकर हमखास त्या चर्चेत असायचे आणि अत्यंत जोरकसपणे आपली बाजू मांडायचे.

याच पुनाळेकरांना जेव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक झाली तेव्हा ती केवळ महाराष्ट्रातच नाही तर अगदी राष्ट्रीय पातळीवर हेडलाईन झाली.

एक कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पुनाळेकर गेल्या काही वर्षांमध्ये पुढे आले. केवळ चॅनेलवरील चर्चाच नाही तर भाषणं, पत्रकार परिषदांमधून ते आक्रमकपणे कट्टर हिंदुत्वाची, सनातन संस्थेची बाजू मांडत आले आहेत. एवढंच नाही तर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुनाळेकरांचे जाहीर सत्कारही केलेले आहेत.

पुनाळेकरांवर कोणते आरोप?

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील आरोपींना पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचा आरोप पुनाळेकरांवर आहे. पुनाळेकरांसोबतच त्यांचे सहकाही विक्रम भावेंनाही अटक झाली आहे. CBIने पुण्यातील विशेष न्यायालयासमोर जी माहिती दिली त्यानुसार पुनाळेकरांनीच दाभोळकर हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी शरद कळसकरला गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास सांगितलं.

Image copyright Getty Images

त्यांनी सांगितल्याप्रमाणे कळस्करने दाभोळकर हत्या प्रकरणात वापरलेलं पिस्तूल तसंच कर्नाटकातल्या गौरी लंकेश प्रकरणात वापरलेलं पिस्तूल ठाणे खाडीत फेकून दिल्याचं CBIनं म्हटलंय.

शस्त्रांचा शोध घेणे आणि या हत्या प्रकरणातील षडयंत्राची चौकशी करण्यासाठी CBIने पुनाळेकर आणि भावेंची न्यायालयाकडून पोलीस कोठडी घेतली आहे.

हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद्यांची वकिली

मुंबईतच शिक्षण झालेल्या संजीव पुनाळेकरांनी 2004 मध्ये वकिलीला सुरुवात केली. आज जरी पुनाळेकर बहुसंख्य फौजदारी केसेस लढवताना दिसत असले तरी त्यांनी सुरुवात केली दिवाणी प्रकरणातील वकील म्हणून.

पुनाळेकर सुरुवातीला बँकिंगशी संबंधित खटले लढवायचे. पुढे काही काळानंतर ते फौजदारी खटल्यांकडे वळले, असं हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष आणि पुनाळेकरांचे सहकारी वीरेंद्र इचलकरंजीकर सांगतात. आता पुनाळेकरांची ओळख सनातनशी संबंधित आरोपींचे खटले आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांचे वकील, अशी झाली आहे.

Image copyright WEB GRAB/ SANATANSHOP

पुनाळेकरांचा हा कट्टर हिंदुत्ववादी वकिलीचा प्रवास सुरू झाला मुस्लिमांसाठीच्या सच्चर आयोगाच्या शिफारशींविरोधापासून. त्यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याशिवाय मुंबईच्या आझाद मैदानामध्ये 2012 साली झालेल्या दंगलीत ते वकील होते. पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंचेही वकीलपत्र पुनाळेकरांनी घेतले होते.

याशिवाय मालेगाव स्फोटातील आरोपींचेही ते वकील होते. ज्या-ज्या खटल्यांमध्ये सनातन संस्थेंशी संबंधित आरोपी आहेत, तिथं पुनाळेकर वकील आहेत. यामध्ये मडगाव स्फोट, गडकरी रंगायतन स्फोट, दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरण या खटल्यांचा समावेश आहे.

पुनाळेकर-हिंदू विधिज्ञ परिषद-सनातन

पुनाळेकर हे हिंदू विधिज्ञ परिषद या वकिलांच्या हिंदुत्ववादी संघटनेचे सचिव आहेत. 2012 मध्ये हिंदू जनजागरण समितीने गोव्यात आयोजित केलेल्या हिंदू संमेलनात हिंदू विधिज्ञ परिषदेची स्थापना करण्यात आली. 'हिंदुराष्ट्र' स्थापनेच्या बाजूने या संघटनेची उघडउघड भूमिका आहे.

सनातनशी या हिंदू विधिज्ञ परिषदेचा अधिकृत संबंध नसला तरी त्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "हिंदू विधिज्ञ परिषदेचा सनातन संस्थेशी संबंध नाही. हिंदूंच्या हितासाठी कार्य करणाऱ्या वकिलांची ती संघटना आहे. सनातन संस्थेच्या उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. कायदेशीर सल्लाही ते देतात. ती एक स्वतंत्र संघटना आहे."

तर हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की, "सनातनची हिंदुराष्ट्र स्थापनेची जी विचारधारा आहे ती आम्हालाही मान्य आहे. सनातन एकप्रकारे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे."

Image copyright Getty Images

सनातन संस्थेबाबत आणि संजीव पुनाळेकरांबाबत पाठपुरावा करून त्याबाबत वेळोवेळी बातम्या केलेल्या पत्रकार अलका धुपकर यांचं म्हणणं आहे, की हिंदू विधिज्ञ परिषद आणि सनातन संस्था कागदोपत्री संबंध नसल्याचं दाखवत असल्या तरी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत.

"हिंदू विधिज्ञ परिषदेशी त्यांचा संबंध नसल्याचा सनातनचा दावा खोटा आहे. त्यांची उद्दिष्टं, ध्येयं आणि कार्यपद्धती ही सारखीच आहे. त्यांचा भारतीय घटनेवर विश्वास नाही आणि हिंदुराष्ट्राची स्थापना करण्यासाठी अधिवक्ते या संघटनेत आलेले आहेत.

"संजीव पुनाळेकरांनी सनातनशी संबंधित आरोपी फरार असताना त्यांना आश्रय देण्याचं कामही केलं आहे. सनातनशी संबंधित असलेल्या प्रशांत जुवेकरनी ANIला माहिती दिली होती की मडगाव स्फोटातील फरार आरोपींना पुनाळेकरांनी आश्रय मिळवून दिला होता," अलका धुपकर सांगतात.

साक्षीदाराला धमकावल्याचाही आरोप

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एका अल्पवयीन साक्षीदाराला अप्रत्यक्षरीत्या धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संजीव पुनाळेकरांवर करण्यात आला होता. गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांनी हा आरोप करत पोलिसात तक्रार केली होती.

Image copyright FACEBOOK/KABEER PANSARE
प्रतिमा मथळा डॉ मेघा पानसरे, गोविंद पानसरे

या घटनेविषयी मेघा पानसरे सांगतात, "पानसरे हत्या प्रकरणातील एका अल्पवयीन साक्षीदार मुलासंदर्भात कोल्हापूर पोलिसांना पुनाळेकरांनी एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये त्या मुलाच्या दैनंदिन गोष्टींचे सर्व तपशील लिहिले होते. तो किती वाजता उठतो, बाहेर कधी जातो, कुठे जातो, हे सर्व तपशील लिहून पुनाळेकरांनी पत्रात म्हटलं होतं की हा साक्षीदार आहे आणि त्याच्या जीवाला धोका आहे. त्याला सुरक्षा पुरवायला हवी होती."

"त्यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले - तुम्ही (पुनाळेकरांनी) त्याच्याबाबतचे एवढे तपशील कशासाठी काढले? त्याला नेमका कुणापासून धोका आहे? मग आम्ही शाहूपुरी पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली होती की हा एकप्रकारे साक्षीदारांना धमकावण्याचा प्रकार आहे," मेघा पानसरे सांगतात.

मेघा पानसरे आणि पुनाळेकरांचा वेळोवेळी संघर्ष झालेला आहे. टीव्ही चॅनेल्सवरही हा संघर्ष पाहायला मिळाला आहे.

पानसरे सांगतात, "बऱ्याचदा टीव्ही चॅनेल्सच्या चर्चेत माझे आणि त्यांचे वाद झाले आहेत. या चर्चेत त्यांनी अनेक खोटी वक्तव्यं केली होती. त्या वक्तव्यांना मी तिथेच आक्षेप घेऊन म्हटलं, की तुम्ही लेखी तक्रार द्या. पण त्यांनी लेखी काही दिलं नाही. तोंडी आरोप करायचे, दिशाभूल करायची, असं बऱ्याचदा त्यांचं चालूच आहे. गोविंद पानसरेंची बदनामी करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले होते. ते आम्ही खोडून काढले."

पुढे काय होणार ?

दाभोलकर खटल्याचा तपास न्यायालयाच्या थेट देखरेखीखाली सुरू आहे आणि त्या दरम्यान पुनाळेकरांना सीबीआयने अटक केली आहे. "अर्थात पुनाळेकरांच्या अटकेमुळे प्रश्न संपत नाहीत तर प्रश्नांची मालिका सुरू होते," अलका धुपकर सांगतात.

"खरोखर तपास मुळापर्यंत पोहोचणार का? पुनाळेकरांना आरोपी बनवलं जाणार का? संपूर्ण षड्यंत्र उघड होणार का? हे प्रश्न आता महत्त्वाचे ठरणार आहेत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)