पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जूनला श्रीलंका दौऱ्यावर जाणार #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जूनला श्रीलंका भेटीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांच्यात 31 मे रोजी हैदराबाद हाऊसमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर नरेंद्र मोदी 9 जूनला श्रीलंका दौऱ्यावर असतील, या बाबीला मैत्रीपाला सिरिसेना यांनी दुजोरा दिला आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे.

मोदी सरकारने दिलेल्या निमंत्रणानंतर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना शपथविधी सोहळ्यासाठी आले होते.

सिरिसेना म्हणाले, "सार्क आणि बिम्सटेक दोन्ही क्षेत्रीय सहयोगासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे बिम्सटेकला सार्कचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. दोन्ही आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत."

श्रीलंका दौऱ्याआधी नरेंद्र मोदी 2 दिवसीय मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत, असंही बातमीत म्हटलं आहे.

2. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण

पंतप्रधान 'शेतकरी सन्मान निधी योजने'चा लाभ आता देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. सरसकट सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शुक्रवारी (31 मे) दुपारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे 15 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. याआधी 5 एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 6 हजारांचा निधी दिला जात होता.

Image copyright Getty Images

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या निर्णयाची माहिती दिली. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

याशिवाय पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतही बदल करण्यात आला आहे.

नक्षलवादी आणि दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्य पोलिसांच्या मुलांचा शिष्यवृत्ती योजनेत समावेश केला आहे. या योजनेतंर्गत दर महिन्याला देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढही करण्यात आली आहे. मुलांच्या शिष्यवृत्तीत 2 हजारवरून अडीच हजार आणि मुलींच्या शिष्यवृत्तीत 2250 वरुन 3 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.

3. देशात गेल्या 45 वर्षांत सर्वांत जास्त बेरोजगारी

देशात गेल्या 45 वर्षांतली सर्वांत वाईट बेरोजगारी असल्याचं कामगार सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात बेरोजगारीचा दरही 6.1 टक्के होता. जानेवारी महिन्यातही हिच माहिती समोर आली होती आणि बेरोजगारीचा दर 1972-73 नंतर सर्वाधिक असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण त्यावेळी मात्र त्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नव्हता.

4. 'डॉ. पायल यांचा जातिवाचक छळच'

डॉ. पायल तडवी यांचा अटक केलेल्या तिन्ही वरिष्ठ डॉक्टरांकडून सातत्यानं जातिवाचक छळ केला जात होता, अशी माहिती प्रमुख साक्षीदाराच्या जबाबातून पुढे आली आहे. ही माहिती गुरुवारी (30 मे) गुन्हे शाखेनं सत्र न्यायालयाला दिली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

Image copyright FACEBOOK/PAYAL TADVI

या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार तरुणीने जबाबात आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर किरकोळ कारणावरून सातत्यानं डॉ. पायल यांना जातिवाचक शब्द वापरून अपमानित करत असत, असं सांगितलं असल्याची माहिती दिल्याचं गुन्हे शाखेनं गुरुवारी सत्र न्यायालयाला सांगितलं.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात प्रवेश घेतल्यापासून पायल यांचा छळ सुरू होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली.

5. महाराष्ट्रात १०० टक्के पाऊस; दुसरा मॉन्सून अंदाज जाहीर

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) सुधारित अंदाज हवामान विभागानं शुक्रवारी (31मे) जाहीर केला आहे. त्यानुसार देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के, तर महाराष्ट्रासह मध्य भारतात 100 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अॅग्रोवननं ही बातमी दिली आहे.

देशातील सुधारित पुर्वानुमानानुसार पावसाच्या अदांजात चार टक्के कमी-अधिक फरक गृहित धरण्यात आला आहे.

दरम्यान, यंदा 6 जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचं पूर्वानुमान हवामान विभागानं वर्तविलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)