'निधी चौधरी प्रकरण आमच्यासाठी संपलं, पण...'

निधी चौधरी आणि जितेंद्र आव्हाड Image copyright Nidhi Choudhari/Jitendra Awhad/Facebook

मुंबई महापालिकेच्या माजी सहआयुक्त आणि IAS अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधींवर वादग्रस्त ट्वीट केलं होतं. पण त्यावर टीका झाल्यावर त्यांनी ते ट्वीट मागे घेतलं असली तरी सरकारनं त्यांची बदली केली आहे.

यानंतर मंगळवारी (4जून) चौधरी यांनी फेसबुकवर एक कविता लिहित या संपूर्ण प्रकाराबाबत नव्यानं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

17 तारखेला गांधींविषयी ट्वीट केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 31 मे राजी पत्रकार परिषद घेतली. सरकारनं निधी चौधरी यांना बडतर्फ करावं अशी त्यांनी मागणी केली होती.

निधी चौधरी प्रकरणावर बीबीसीशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "त्यांच्या (निधी चौधरी) बदलीनंतर आमच्यासाठी हे प्रकरण संपलेलं आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एखाद्या भगिनीचं मन दुखवण्याचा आमचा काहीही उद्देश नाही. पण सरकारी अधिकाऱ्यांनी राजकीय मत व्यक्त करणं टाळावं असं आम्हाला वाटतं."

झालेल्या प्रकरणावर त्यांनी परत कविता लिहायची गरज नव्हती, असंही आव्हाड पुढं म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलं?

31 मेच्या पत्रकार परिषदेत आव्हाड म्हणाले, "निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी अनुद्गार काढलेत. त्यामुळं केंद्र/राज्य सरकारनं त्यांना बडतर्फ करावं अशी जाहीर मागणी करतो आहोत."

"त्यांच्या या वक्तव्यामुळे एक IAS अधिकारी म्हणून घेतलेली शपथ, त्यांच्या मर्यादा या सगळ्यांचं त्यांनी उल्लंघन केलं आहे. त्यांच्यावर कायद्यानुसार जो काही खटला दाखल करता येईल तो करावा," असंही आव्हाड पुढे म्हणाले होते.

Image copyright Jitendra Awhad/Facebook

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केलं. राष्ट्रपित्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं वाघ यांनी म्हटलं.

निधी चौधरी यांनी काय कविता केली?

मूळ कविता हिंदीत असून त्याचा थोडक्यात स्वैर भावानुवाद असा :

गोडसेंचे आभार का मानले याबाबत ते(नेते) मला विचारत आहेत, त्यांच्या मूर्ती फोडण्याचं आवाहन का केलं, आपल्या शब्दांनी गांधींचा अपमान का केला असे प्रश्न ते मला विचारत आहेत. हा देश गांधीजींचा आहे, त्यांची विचारधारा एकमेवाद्वितीय आहे. ते स्वच्छ भारत योजनेचे प्रतीक आहेत.

मी सध्याची परिस्थिती पाहता दु:खी होऊन एक व्यंग्य लिहिलं होतं. ते तुम्ही पाहू शकला नाही. माझ्या 17 तारखेच्या व्यंगावर 31 तारखेला पत्रकार परिषद का घेतली असा प्रश्न त्या विचारतात. जर पत्रकार परिषद बोलावली तर एक फोन मलाही का केला नाही असा प्रश्न त्या कवितेच्या माध्यमातून विचारतात. एकदा ते व्यंग्य नीट वाचलं असतं तर इतकी वेळ आली नसती.

माझ्यावर उडवलेले शिंतोडे हे मला एखाद्या अॅसिडसारखे भासत आहेत. माझ्या मनाला या प्रकारामुळे प्रचंड यातना होत आहे. मात्र या दु:खातून सावरण्यासाठी गांधीजींनीच प्रेरणा दिली आहे. मात्र शब्दांनी मला कितीही यातना दिल्या तरी सत्य टिकून राहिलच.

गांधीजी आज जिवंत असते तर त्यांनाच लाजिरवाणं वाटलं असतं. त्यांना रोज मरणयातना झाल्या असत्या. आताही या कवितेची पुन्हा एकदा चिरफाड होईल आणि पुन्हा टीकेचा भडिमार होईल. पण या कवितेत काहीही व्यंग्य नाही. ही माझ्या मनाची व्यथा आहे.

मला कोणत्याही पदाची लालसा नाही. जेव्हापर्यंत लोकांना समजणार नाही तेव्हापर्यंत मी हे करणार नाही. कारण लिहिणं हा माझा हक्क आहे. या काळ्या रात्रीत लेखणीच आशेचा किरण दाखवू शकते. असं त्या म्हणतात.

नेमकं प्रकरण काय आहे?

निधी चौधरी यांनी 17 मे रोजी एक ट्वीटर केलं होतं. त्यामध्ये त्यांनी लिहिलं, "महात्मा गांधींची 150वी जयंती उत्साहात साजरी करत आहेत. पण, आता मात्र रस्ते, संस्थांना गांधींची नावं दिली आहेत, ते काढून टाकावीत. जगभरातली त्यांचे पुतळे पाडावेत. एवढंच नाही तर नोटांवरूनही त्यांचा फोटो काढावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 30-1-1948 साठी धन्यवाद गोडसे."

Image copyright TWITTER

'त्या' ट्वीट सोबत महात्मा गांधींच्या पार्थिवाचा फोटो चौधरी यांनी शेअर केला होता. हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यावर संतापजनक प्रतिक्रिया आल्यानंतर निधी चौधरी यांनी ते काढून टाकलं. तसंच नवीन ट्वीटद्वारे त्यांनी आपली बाजू मांडली होती.

आपल्या व्यंगात्मक भाषेचा लोकांनी विपर्यास केल्याचं चौधरी यांनी सांगितलं. पण सगळ्या बाजूंनी टीका झाल्यामुळे सरकारनं त्यांची बदली केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)