RSS चे विचार पटले नाहीत, तरी चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात - शरद पवार

शरद पवार Image copyright RAVEENDRAN

गेल्या कित्येक वर्षांपेक्षा यावर्षी पाण्याची परिस्थिती भीषण आहे. राज्यात दुष्काळ पडला आहे, त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ही समस्या सोडवावी, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.

याशिवाय, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांसारखा प्रचार करावा, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

पिंपरी चिंडवडमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यात त्यांनी विविध प्रश्नांना सामोरं जात आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेचं मुख्य कारण हे दुष्काळाची समस्या सर्वांसमोर मांडणं हे आहे असं पवार म्हणाले. जेव्हा दुष्काळ पडत असे तेव्हा निदान धरणात काही प्रमाणात पाणीसाठी असे पण आता परिस्थिती गंभीर झाली आहे.

लोकांना प्यायला देखील पाणी नाही. गावोगावी टॅंकरनं पाणी पुरवलं जात आहे. हे पाणी लोकांना प्यायला मिळत आहे पण पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था नाही. अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

पिण्याची पाण्याची सर्वत्र टंचाई आहे. लोक अतिशय अस्वस्थ आहे. पशुधनासाठी काही व्यवस्था करण्यात यावी.

या प्रकरणात सरकारची चूक आहे की नाही हा विषय नाही. ही वेळ आपसांत भांडण्याची किंवा टीका करण्याची नाही तर सर्वांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवण्याची आहे, असं पवार म्हणाले.

Image copyright BBC/niranjan chhanwal

मुख्यमंत्र्यासोबत माझी बैठक झाली. उद्या पुन्हा माझी त्यांच्यासोबत बैठक आहे. मी राज्यातल्या लोकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी जे काही शक्य आहे ते सर्वांनी मिळून करावं, असं म्हणाले.

दुसरी गोष्ट म्हणजे कारखानदारांनी समोर येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्यात किमान 100 साखर कारखाने सुरू आहेत. इतर कारखाने आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करावेत. कुणी कॅटल कॅम्प आयोजित करावे. कुणी चारा पुरवावा अशी जबाबादारी स्वतःहून घ्या. असं आवाहन पवारांनी केलं.

संघाच्या स्वयंसेवकांसारखा प्रचार करावा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांसारखा प्रचार करावा, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

ते म्हणाले, "आतापासूनच मतदारांना घरोघरी जाऊन भेटायला हवं. असं भेटलात, तर ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न विधानसभेवेळी मतदार उपस्थित करणार नाहीत. संघाचे स्वयंसेवक सकाळी एखाद्या घरी गेले आणि ते घर बंद असेल तर संध्याकाळी परत जातात. तेव्हाही संबंधित व्यक्ती भेटली नाही, तर ते दुसऱ्या दिवशी जातात, पण संबंधितांना भेटतातच. त्यांचे विचार पटले नाहीत, तरी चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात."

ईव्हीएमबाबतची शंका निवडणूक आयोगासमोर मांडणार

ईव्हीएमबाबत तुमच्या मनात शंका आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले ईव्हीएमबाबत आपण निवडणूक आयोगाशी चर्चा करू. निवडणुकांआधी आयोग सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवलं जातं. त्यावेळी आम्ही आमच्या शंका त्यांच्यासमोर मांडू.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)