विराट कोहलीला गाड्या पिण्याच्या पाण्याने धुतल्याबद्दल 500 रुपयांचा दंड #5मोठ्याबातम्या

कोहली Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कोहली

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. पिण्याच्या पाण्याने गाडी धुतल्याबद्दल कोहलीला 500 रुपयांचा दंड

पिण्याच्या पाण्यानं गाडी धुतल्याप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला गुरुग्राम महापालिकेनं 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

तर झालं असं की, कोहलीच्या गुरुग्राममधील निवासस्थानी काम करणारे कर्मचारी गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याची नासाडी करत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती.

गुरुग्राममधील DLF फेज-1 मध्ये विराट कोहलीचं घर आहे. घराबाहेर कोहलीच्या मालकीच्या सहा गाड्या उभ्या असतात. या गाड्या धुण्यासाठी कोहलीचे कर्मचारी पिण्याचं पाणी वापरत असल्याची तक्रार त्याच्या शेजाऱ्यांनी दिली होती.

तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे गुरुग्राम महापालिकेनं कोहलीच्या स्टाफकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

2. अर्ध्याच तासात जेऊन परत यायचं: सरकारी अधिकाऱ्यांना आदेश

सरकारी कार्यालयांमध्ये दुपारच्या जेवणाचा कालावधी दुपारी 1 ते 2 असला तरी आता जेवण अर्ध्या तासात उरकावं लागेल, असं परिपत्रक सरकारनं जारी केलं आहे. त्यामुळे आता अर्ध्या तासात जेवण आटोपून कर्मचाऱ्यांना कामावर परत यावं लागणार आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे.

सरकारनं काढलेल्या परिपत्रकात 21 ऑगस्ट 1988च्या सरकारी अध्यादेशाचा उल्लेख करण्यात आला आहे.

Image copyright DIBYANGSHU SARKAR/getty images

या शासन निर्णयानुसार, शासकीय कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची सुटी आहे.

सामान्य नागरिक शासकीय कार्यालयात गाऱ्हाणी घेवून आले असता अधिकारी, कर्मचारी यावेळेत उपलब्ध होत नाहीत. सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी कामात टाळाटाळ करतात. या तक्रारींची दखल घेऊनच सरकारनं हे परिपत्रक काढलं आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

3. देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे कार्यकर्ते फोडत आहेत: अशोक चव्हाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोन करून फोडाफोडीचं राजकारण करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, "काँग्रेसच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री आणि काँग्रेस सोडून गेलेले नेते फोन करून भाजपमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भाजपच्या गळाला काही लागणार नाही."

Image copyright Getty Images

अशोक चव्हाण यांच्या आरोपांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "आमच्या संपर्कात कोण आहेत, याची यादी मी अशोक चव्हाणांना सांगितली तर त्यांचे उजवे-डावेही त्यांच्यासोबत राहणार नाहीत."

4. पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क

पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

एका महिलेनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.

यावेळी न्यायालयानं म्हटलंय, "कमाईच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित आहे. पतीच्या पगारावर कुणीही अवलंबून नसेल तर पत्नीला पगाराचा 30 टक्के हिस्सा मिळाला पाहिजे."

Image copyright Reuters

7 मे 2006ला महिलेचं लग्न एका इन्स्पेक्टरशी झालं होतं. त्यानंतर 15 ऑक्टोबर 2006 रोजी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिलेनं पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली.

2008मध्ये महिलेला सर्व प्रथम पोटगी देण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयानं पगारातील 30 टक्के हिस्सा पत्नीला देण्याचा निर्णय दिला होता.

या निर्णयाला पतीनं न्यायालयात आव्हान दिलं. त्यानंतर सुनावणीदरम्यान ही रक्कम 15 टक्के करण्यात आली. त्यानंतर महिलेनं या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं. यावर निर्णय देताना न्यायालयानं पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क हसल्याचं म्हटलं आहे.

5. 'उद्धव ठाकरे 10 वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही'

राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे 10 वेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाल्याची बातमी लोकमतनं दिली आहे.

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांना घेऊन 16 जूनला अयोध्येत जाणार आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रामदास आठवले

दरम्यान, राम मंदिरा उभारणीसाठी सगळे अडथळे दूर करण्यात येतील, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

महंत नृत्य गोपाळ दास यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त अयोध्येत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हे वाचलंत का?

धोनीच्या ग्लोव्ह्जची का होतेय एवढी चर्चा?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)