दहावी बारावीतील गुण का महत्त्वाचे असतात? - ब्लॉग

दहावी Image copyright Getty Images

दहावी बारावीचे निकाल जवळ आले की यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाच्या पोस्टी सोशल मीडियावर लिहिल्या जातात. त्याचबरोबर अपयशी विद्यार्थ्यांचं सांत्वन करण्यासाठी किंवा धीर देण्यासाठी कमी मार्क मिळाले तर 'फारसं वाईट वाटून घेऊ नका कारण त्याचा पुढच्या आयुष्यात फारसा उपयोग नसतो' अशा शब्दांत धीर देण्याचा प्रयत्न केला जातो.

हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. या महत्त्वाच्या वर्षांत कमी मार्क मिळाले तर वाईट वाटतंच पण मार्क तितके महत्त्वाचे नाही हे सांगण्यात किती तथ्य आहे? हा प्रश्नही या निमित्ताने विचारात घेणं गरजेचं आहे.

दहावी आणि बारावी ही आयुष्यातील अतिशय महत्त्वाची वर्षं आहेत. कारण दहावीपर्यंत सगळे विद्यार्थी बोर्डाने निवडून दिलेल्या विषयांचा अभ्यास करतात. नंतर शाखा वेगळ्या होतात. आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं.

मात्र आवडत्या शाखेतील उत्तमोत्तम कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला चांगले गुण मिळवावे लागतात आणि त्याचा पाया दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांमधील मार्क असतात. ते चांगले नसतील तर जिथे प्रवेश मिळेल तिथे समाधान मानावं लागतं. म्हणजे प्रवेशापुरता का होईना हे गुण महत्त्वाचे असतात.

दहावीनंतर कला, विज्ञान, वाणिज्य अशा तीन शाखा ढोबळमानाने निवडल्या जातात. त्यात विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा ओढा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राकडे असतो. हल्ली कोचिंग क्लासेसमुळे महाविद्यालयाचे महत्त्व कमी झालं आहे.

त्यातही IIT, JEEसारख्या परीक्षा देणारे विद्यार्थी फक्त क्लासेसच्या बळावर बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करतात. मात्र या परीक्षांचा पाया दहावी बारावीच्या अभ्यासक्रमात असतो. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत समजा समसमान गुण मिळाले तर बारावीच्या मार्कांवरच मेरिट लिस्ट ठरवली जाते. अशा परिस्थितीत मार्कांचं महत्त्व आहेच की.

वाणिज्य आणि कला शाखेत महाराष्ट्रात तितकीशी स्पर्धा नसली तरी दिल्ली आणि इतर मोठ्या शहरात या क्षेत्रातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा असल्यास चांगले मार्क हवेच हवे. पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषत: बँकांशी निगडीत स्पर्धांमध्ये मार्कांचं बंधन असतं. त्यामुळे चांगले मार्क व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

कमी मार्क मिळाल्यावर काय होतं?

नववीची परीक्षा झाली की घराघरात दहावीचे वेध लागतात. एकदा पाल्य दहावीत गेला की अनेक परीक्षांचा मारा त्यांच्यावर होतो. बौद्धिक कुवत कितीही असली तरी चांगले मार्क मिळवण्याचं साहजिकच एक दडपण असतं. आता चांगले मार्क म्हणजे नक्की किती ही अपेक्षा व्यक्तिपरत्त्वे वेगळी असू शकते.

आपल्याला अपेक्षित असलेले मार्क मिळाले नाहीत तर दु:ख होतं. खूप वाईट वाटतं. कारण त्यासाठी वर्षभर कष्ट घेतलेले असतात. आईवडिलांच्या आणि स्वत:च्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असते. त्यामुळे वाईट वाटतं. चांगले मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा दाखला दिला जातो.

त्यामुळे या दु:खात आणखी वाढ होते. आत्मविश्वास कमी होतो. भविष्याची चिंता निर्माण होते. भविष्यात आता काही होऊ शकत नाही अशी भावना निर्माण होते. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी कोणतीच तडजोड करण्याची इच्छा नसते. मग अशा परिस्थितीत काय करायचं?

Image copyright Getty Images

सर्वप्रथम निकाल जसा आहे तसा स्वीकारला पाहिजे. कारण तो बदलणार नसतो. बोर्डाला किंवा कोणत्याही संस्थेला दोषी अजिबात ठरवू नये. कारण जास्त मार्क मिळाले की आपल्याला उगाच जास्त मार्क दिले असं आपण म्हणत नाही.

आयुष्यात अनेक परीक्षांमध्ये एका परीक्षेत अपयश मिळालं आहे हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. उत्तम गुण मिळवण्याची संधी पुढे मिळणार आहे अशी समजूत घातली तरी कमी मार्क मिळाले हे वास्तव विसरू नये. अन्यथा ही समजूत म्हणजे मूळ समस्येपासून पळून जाण्यासारखं आहे.

कमी मार्क का मिळाले याचा व्यवस्थित लेखाजोखा मांडावा. याबाबत शिक्षकांशी, मार्गदर्शकांशी घरच्यांशी बोला. त्यांनी दिलेल्या सूचना नीट विचारात घ्या. झालेल्या चुका टाळण्यासाठी काय करता येईल याचा आराखडा तयार करावा. सरतेशेवटी कमी मार्कांचा फार बाऊ करू नये. त्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं आणि पुढे चुका कशा टाळता येतील याचा नीट विचार करावा.

शिकण्याची प्रकिया निरंतर...

शिक्षणतज्ज्ञांच्या मते मार्क महत्त्वाचे असतातच. पण सर्वाधिक महत्त्वाची असते ती शिकण्याची प्रक्रिया. एखादा विषय समजला असेल किंवा एखादी संकल्पना समजली असेल तर त्याविषयी कसेही फिरवून प्रश्न विचारले तरी मार्क मिळतात.

त्याचवेळी उत्तम गुण मिळाले याचा अर्थ एखादा विषय समजलाच आहे असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे मार्क कितीही मिळाले तरी शिकण्याची प्रक्रिया निरंतर असते आणि नेमकं हेच विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणारे लोक कमी आहेत असं मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलं.

Image copyright Getty Images

कमी मार्क मिळवूनही यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणं आपल्या समाजात आहेत. मार्क म्हणजेच आयुष्य नाही, आयुष्यातलं यश मार्कांवर अवलंबून नाही हे सांगणाऱ्या लोकांनी कमी मार्क मिळाल्यावर स्वत:वर फार मेहनत घेतलेली असते. कमी मार्काच्या जखमा वागवत त्यांनी यशस्वी होण्यासाठी कष्ट केलेले असतात. आज त्यांना या कष्टाची फळं मिळालेली असतात म्हणून ते हे सगळं सांगण्याच्या स्थितीत असतात हे विसरता कामा नये.

मार्क मग ते कमी असो की जास्त तो आयुष्यभराचा ठेवा असतो. मार्कांचा आकडा कितीही असला तरी तो आपण आपल्या प्रयत्नांनी मिळवलेला असतो. हे सत्य कधीच नाकारलं जाऊ शकत नाही. त्यामुळे कितीही मार्क मिळाले तरी ते आपलेसे करा.

अगदीच अपवादात्मक परिस्थिती वगळली तर कागदावरचे मार्क बदलत नाहीत ते कमी असतील तर आणखी जोमाने प्रयत्न करता येतात. जर मनासारखे मिळाले तर आयुष्यात आणखी प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यामुळे मार्क म्हणजे अगदी जीवन मरणाचा प्रश्न नसले तरी ते महत्त्वाचे असतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)