प्रकाश आंबेडकर: विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची मतं राज ठाकरेंकडे वळतील

प्रकाश आंबडेकर-राज ठाकरे Image copyright Getty Images

आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेला चांगली संधी आहे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. जिथं शिवसेनेचं संघटन आहे ज्या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उभे राहणार नाहीत तिथं राज ठाकरेंना मतं पडतील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी विधानसभा निवडणुकीची तयारी, त्यांच्यावर होणारे आरोप आणि राज ठाकरे यांच्याविषयी चर्चा केली.

येणारी विधानसभा निवडणूक तुम्हाला शेवटची निवडणूक ठरवायची आहे का, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. तर मनसेला 'अच्छे दिन' आले असल्याचं सांगितलं.

डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, "भाजपने स्पष्टपणे सांगितलं आहे, की आम्ही शिवसेनेला विधानसभेच्या 135 जागा देणार आहोत. म्हणजे उरल्या 153 जागा. या 153 मतदारसंघांमध्ये शिवसेनेचं संघटन आहे, हे मी कबूल करतो. राज ठाकरे यांनी जर स्वतःला पुनर्स्थापित करायचं ठरवलं या 153 मतदारसंघातला शिवसैनिक हा भाजपला मत देणार नाही. तर राज ठाकरेंना देईल."

Image copyright Getty Images

"राज ठाकरे निवडणुकीत उभे राहिले तर शिवसेनेची मतं त्यांच्याकडे वळतील. ही राज ठाकरेंसाठी सुवर्णसंधी आहे. एवढ्या वर्षांत त्यांना अशी संधी मिळालेली नाही. स्वतंत्रपणे उभं राहण्यासाठी त्यांना स्पेस आहे. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना वाटायचं की ही युती आता करू नये आणि विधानसभेसाठीही त्यांचं हे मत आहे, अशी माझी तरी माहिती आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी मतांची स्पेस निर्माण केली तर ती जेवढी भाजपचं नुकसान करणारी आहे. तेवढीच उद्धव ठाकरेंचंही नुकसान करणारी आहे."

राज ठाकरेंना येत्या विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे इतकी चांगली संधी असली तरी त्यांची मतं ही हिंदुत्ववादी मतं आहेत आणि आपल्याला मिळणारी मतं ही धर्मनिरपेक्ष हिंदुंची आहे. त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच नसल्याचं डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय.

या आधी प्रकाश आंबेडकरांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. लग्न कुणाचं आणि कोण नाचतंय हेच कळत नाही असं त्यांनी राज यांना म्हटलं होतं.

'महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात ईव्हीएमच्या मतमोजणीत तफावत'

'लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघांमध्ये झालेलं एकूण मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेली मतं यामध्ये तफावत आहे. निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण द्यावं,' अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रातल्या 48 पैकी 22 जागांवर जास्त मतदान झालं तर 26 जागांवर कमी मतदान झालं. ही निवडणूक आयोगाचीच माहिती आहे. त्यामुळे हॅकिंग झालं आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत आंबेडकर म्हणाले, "माझा या निकालावर अजिबात विश्वास नाही. मी मुंबई बंद पाडू शकतो. अशा वेळी मुंबईतल्या एकाही मतदारसंघात आम्हाला एक लाख मतंही मिळाली नाहीत. हे मी मान्यच करत नाही. यावेळी राष्ट्रवादाची किंवा मोदींची लाट होती हेही मला मान्य नाही. माझ्याकडे महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघातला निकाल आहे. पुढच्या 15 दिवसात देशातल्या 300 मतदारसंघातला निकाल मी आणेन. आम्ही दाखवलेली तफावत चूक आहे, हे निवडणूक आयोगानं दाखवून द्यावं. मी त्यांना आव्हान देतो."

ही तफावत निवडणुकीचा निकाल बदलणारी ठरल्याचा तुमचा दावा आहे का, असं विचारल्यावर आंबेडकर यांनी प्रश्न मतदानात झालेल्या हस्तक्षेपाचा असल्याचं म्हटलं.

निवडणूक संपल्यावर निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबतच्या शंकांबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यात त्यांनी सांगितलं की व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमची गणना केल्यावर आमच्या असं लक्षात आलं आहे की देशात तफावतीचं एकही प्रकरण घडलेलं नाही.

हवा तसा निकाल मिळवण्यासाठी हस्तक्षेप

"मतदानात हस्तक्षेप झाला असेल तर तुम्हाला पाहिजे तसा निकाल तुम्ही आणू शकता."

यासाठी आंबेडकरांनी सोलापूरचं उदाहरण दिलं. 'सोलापुरात स्वतःला देव म्हणवणाऱ्या भाजप उमेदवाराला मुस्लीम मतदार मत देणार नाही. तरीही तिथे भाजपचा विजय झाला. यात शंकेला जागा आहे,' असा त्यांचा आरोप आहे.

Image copyright SAGAR SURAWASE

डॉ. आंबेडकर म्हणाले, "सोलापुरात भाजपच्या उमेदवाराने मीच देव असल्याचं जाहीर सभेत म्हटलं. त्याच देवाला मुसलमान मतदान करतो. हे विसंगत आहे. कारण मुस्लिमांच्या मते अल्ला एकच आणि उरलेले सगळे त्याचे बंदे. त्यामुळे एकतर तो मुसलमान काफर आहे किंवा त्याचं मत फिरवून त्याला काफर केलं, असं म्हणावं लागेल."

"जेव्हा रिटर्निंग अधिकारी 10 लाख 35 हजार मतदान झाल्याचं सांगतो आणि मतमोजणी करताना 10 लाख 35 हजारांपेक्षा कमी किंवा जास्त मतं निघतात, याचाच अर्थ कुठेतरी तिसरा खेळाडू आहे," असं आंबेडकरांनी म्हटलं.

काँग्रेसनं मौलवींचा आधार घेतला

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मौलवींनी काढलेला फतवा हा आमच्यासाठी सरप्राईज एलिमेंट होता, असं म्हणत काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले, "शेवटच्या चार दिवसापर्यंत महाराष्ट्रातली मुस्लीम मतं आमच्याबरोबर होती. हे उघड सत्य आहे. पण मतदानाच्या चार दिवस अगोदर काही मौलवींनी काँग्रेसच्या नावाचा, त्यांच्या उमेदवाराचा फतवा काढला. हा फतवा मुस्लिमांना आमच्यापासून तोडून काँग्रेसकडे घेऊन गेला."

Image copyright FACEBOOK/@OFFICIAL.PRAKASHAMBEDKAR

ते म्हणतात, "शेवटच्या दिवसांमध्ये काँग्रेसने जर फतवा काढण्यासाठी जोर लावला नसता तर आमचे 6 ते 7 उमेदवार निवडून आले असते. आम्हाला पाडता येत नव्हतं म्हणून काँग्रेसने मौलवींना हाताशी धरलं आणि दुर्दैवाने त्या मौलवींनी फतवे काढून आम्हा सर्वांना पाडलं."

वंचित बहुजन आघाडीने पारंपरिक मतं घेतल्याने भाजप-शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपाचंही डॉ. आंबेडकर यांनी खंडन केलंय.

त्यांनी म्हटलं, की दलित आणि मुस्लीम ही काँग्रेसची पारंपरिक मतं नाहीत. मराठा समाजाची मतं ही त्यांची पारंपरिक मतं आहेत. हा समाज आता पूर्णपणे भाजपकडे वळला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला जी मतं मिळाली त्यात 80 टक्के मतं मुस्लिमांची आहे आणि उर्वरित 20 टक्के मतं बिगर मुस्लीम आहे. त्यांच्याकडे आता कुठलाच मार्ग नाही. आम्हाला मिळालेली मतं ही धर्मनिरपेक्ष हिंदू मतं आहेत. आम्हाला मिळालेल्या या 14टक्के मतांमध्ये मुस्लिमांच्या 14 टक्क्यांची भर पडली असती तर आम्हाला एकूण 28 टक्के मतं पडली असती. "

...तर थेट भाजपशीच चर्चा करा

समान पातळीवर येऊन बोलणी करावी, या ट्वीटवरून वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करणार का, अशी चर्चा रंगली होती. मात्र, ते ट्वीट आपलं नसल्याचं डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार का, याबाबत अजून बैठकच झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

"आम्ही आधी (लोकसभा निवडणुकीपूर्वी) काँग्रेससोबत बोलणी करायला गेलो होतो. पण त्यांनी ऐकलं नाही. आम्हाला बी टीम म्हणून गृहित धरलं. आता त्यांना पुन्हा चर्चा करायची आहे. तेव्हा आमचं स्टेटस काय, याचा खुलासा करा. बी टीम म्हणून आमच्याशी चर्चा करणार असाल तर थेट भाजपकडे जाऊनच बोलणी करा. आमच्यामार्फत करू नका", अशा शब्दांत आंबेडकर यांनी काँग्रेसला सुनावलं.

Image copyright Getty Images

"आम्ही अजून पुढे काय करायचं, हे ठरवलं नाही. विधानसभेसंबंधीची आमची बैठक झालेली नाही. त्यामुळे अधिकृतपणे तुम्हाला काही सांगू शकत नाही."

विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याची ताकद आपल्यात असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे.

ते म्हणाले, "वंचित आघाडीची सुरुवात विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच केली होती. गेल्या जुलैपासून आम्ही काँग्रेसच्या मागे लागलो होतो, की जिथे तुमच्याकडे उमेदवार नाही ते मतदारसंघ आम्हाला द्या. जिथे तुम्ही तीन वेळा पराभूत झाला आहात, त्या जागा आम्हाला द्या. जिंकणारा मतदारसंघही आम्ही मागत नव्हतो. तेव्हा आमची तयारी ही विधानसभेची तयारी होती. राज्यातल्या 288 मतदारसंघाची तयारी आम्ही वर्षभरापूर्वीच सुरू केली आहे. वेळ पडली तर सर्वच्या सर्व 288 जागा आम्ही लढवू शकतो, ही ताकद आमच्यात आहे."

आपण कायमच लोकसभा लढवली आहे आणि यापुढेही स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार नसल्याचं डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या

'5 एप्रिलला 9 वाजता 9 मिनिटं विजेचे दिवे बंद करा, पणत्या लावा,' नरेंद्र मोदींचं आवाहन

धारावीत 35 वर्षिय डॉक्टरला कोरोना व्हायरसची लागण

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनीच चेहऱ्यावर मास्क बांधावेत?

मुंबईतील 'त्या' 3 दिवसांच्या बाळाची कोरोना चाचणी आता निगेटिव्ह

कोरोनाचा धारावीत शिरकाव, आता आव्हान संसर्ग रोखण्याचं

कोरोनाची चाचणी करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांवर इंदूरमध्ये दगडफेक?-फॅक्ट चेक

'येत्या 20 दिवसांत मी आई होईन, माझं बाळ सुखरूप राहायला हवं'

जास्त चाचण्या घेतल्या असत्या, तर तबलीगी प्रकरण वेळेत समोर आलं असतं?

कोरोना व्हायरस : घरात आहेत पण हिंसाचारापासून सुरक्षित नाहीत त्यांचं काय?