साने गुरुजीः स्फूर्तिगीतं, 'श्यामची आई' ते 'प्राणार्पणा'पर्यंतचा प्रवास

साने गुरुजी Image copyright SADHANA SAPTAHIK
प्रतिमा मथळा साने गुरुजी

साने गुरुजी हे दोन शब्द जवळजवळ आले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्या शाळेतल्या प्रार्थनेचे स्वर घुमू लागतात.

'खरा तो एकची धर्म' सारखी प्रार्थना, 'आता उठवू सारे रान', 'बलसागर भारत होवो' सारखी स्फुर्तीगीतं चालीसकट मनामध्ये येणार नाहीत असा मराठी माणूस विरळाच म्हणावा लागेल. 'श्यामची आई' पुस्तक आणि सिनेमानं आपल्या सर्वांच्या मनावर एकदम अमीटसा प्रभाव टाकला आहे.

11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे निधन झाले. आज त्याला 7 दशके उलटली असली तरी त्यांच्याबद्दलची आपली बहुतांश माहिती श्यामची आई आणि स्फूर्तिगीतांपर्यंतच थांबते.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात क्रांतीकार्य करणारे, लहान मुलांसाठी, अखिल विश्वासाठी लेखन करणारे, सतत विचारमग्न राहाणाऱ्या या व्यक्तीचं आयुष्य लोकांपर्यंत पूर्णपणे आलं नाही असं दिसतं.

पालगड ते संपूर्ण महाराष्ट्र

साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील पालगड येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असं होतं. पालगडला प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी त्यांची रवानगी पुण्याला करण्यात आली.

नूतन मराठी विद्यालयात शिक्षण झाल्यावर न्यू पूना कॉलेजमधून त्यांनी मराठी आणि संस्कृत साहित्यात त्यांनी एम. ए पदवी मिळवली.

त्यानंतर ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. असहकार आंदोलनात भाग घेतल्यानंतर त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. 1942 च्या लढ्यामध्ये त्यांनी भूमिगत होऊन क्रांतीकार्य केले.

सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन ब्रिटिश सत्तेविरोधात लढण्याचं आवाहन केलं. क्रांतीला पोषक अशी काव्यंही लिहिली. साने गुरुजींनी 100हून अधिक पुस्तकं लिहिली. बंगाली, तमिळ भाषांमधील साहित्य मराठीत आणलं.

Image copyright DATTA JOSHI/PALGAD
प्रतिमा मथळा पालगड येथील साने गुरुजी स्मृती भवन

15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी 'साधना' हे साप्ताहिक सुरू केलं. आजही हे साप्ताहिक सलग सत्तर वर्षं महाराष्ट्रात प्रसिद्ध होत आहे. 11 जून 1950 रोजी साने गुरूजींनी स्वतःचं आयुष्य संपवलं.

'साने गुरुजींच्या विचारांचा माझ्या मनावर सखोल प्रभाव'

साने गुरुजी यांनी जीवनाच्या शेवटच्या वर्षांमध्ये आपली पुतणी सुधा हिला उद्देशून साधनामधून पत्रं लिहिली होती. त्याला 'सुंदर पत्रे' असं नाव देण्यात आलं होतं. त्यावेळेस सुधा फक्त 14 ते 15 वर्षांच्या होत्या. विवाहानंतर त्या सुधा साने बोडा झाल्या आणि गुजरातमध्ये बडोदा येथे स्थायिक झाल्या.

बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी साने गुरुजींच्या आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, "साने गुरुजी हे सतत कार्यरत असल्यामुळे आम्हाला त्यांचा सहवास अत्यंत कमी लाभला."

"1942 च्या लढ्याच्या वेळेस साने गुरुजी तुरुंगात होते. त्यामुळे पालगडला आमचे बाबा अस्वस्थ असत. अण्णा (गुरुजी) तुरुंगात आहेत. त्याला तिथं धान्य दळावं लागतं, तिथं त्याला नीट अन्न मिळत नाही असं ते सांगायचे. सणासुदीला गोड खायचे नाहीत. तसंच परदेशी माल म्हणून फटाकेही वाजवू द्यायचे नाहीत.

"माझे धाकटे काका म्हणजे पुरुषोत्तम साने बोर्डीमध्ये (तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यात, आताचा पालघर) एक बोर्डिंग आणि शाळा चालवायचे. अनेक क्रांतिकारी विचारवंत तिथे शिक्षक होते. माझ्या आईचं निधन झाल्यावर आणि वडील आजारी पडल्यावर आम्ही तिकडेच राहायला गेलो.

Image copyright DATTA JOSHI/PALGAD
प्रतिमा मथळा पालगड येथील पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर

"याच काळात माझा भाऊ वसंता थोर कम्युनिस्ट नेत्या गोदुताई परुळेकर यांच्याबरोबर काम करत असे. तो डॉक्टर होता. क्रांतिकार्यामुळे त्याला आर्थररोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

"तिथंच त्याला टायफॉइड झाला आणि तो वारला. त्याच्या मृत्यूचा माझे वडील आणि गुरुजींवर मोठा आघात झाला. साने गुरूजींना त्याचा फारच धक्का बसला. इकडे आजारी वडील बिछान्यातून उठलेच नाहीत."

साने गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटांच्या मालिकेबाबत बोलताना सुधाताई म्हणतात, "24 डिसेंबर 1944 रोजी गुरुजींच्या वाढदिवशीच माझा भाऊ वारला आणि 13 फेब्रुवारी 1946 रोजी माझे वडील वारले. गुरुजींना या धक्क्यांनी खचले. सगळ्या कुटुंबावर त्या मृत्यूने आघात केला."

साने गुरुजी बोर्डीला आल्यावर त्यांच्याशी अधूनमधून बोलणं व्हायचं असं सुधाताई सांगतात. आज वयाच्या 85 व्या वर्षीही त्यांच्या डोळ्यांसमोर साने गुरुजींची प्रतिमा उभी राहाते.

"पॅरोलवर सुटून आल्यावर वडिलांची ते सेवा करायला थांबले होते. पण दिवसभर सतत काहीना काहीतरी करत राहायचे. महाराष्ट्रभरातून त्यांना पत्रं यायची, ते कंदिलाच्या उजेडात लेखन करत बसायचे." असं त्या सांगतात. पंढरपूरच्या उपोषणावेळीही सुधाताईंना तिकडे जाण्याची संधी मिळाली होती.

'सुंदर पत्रां'नी घडवली जगाची सफर

सुंदर पत्रांच्या सदराला 10 जून 1949 रोजी सुरुवात झाली होती. सुधाताईंना उद्देशून साने गुरुजी पत्रं लिहू लागले.

सुधाताईंना उद्देशून लिहिली असली तरी ती पत्रं सर्व मराठी मुलांसाठी असत. जगभरातील स्थिती, माणसं, प्राणी, फळं, फुलं ऋतूंची वर्णनं त्यात असतं, असं सुधाताई सांगतात.

Image copyright DATTA JOSHI/PALGAD
प्रतिमा मथळा साधनाच्या पहिल्या वर्धापनदिनी साने गुरुजी

"आज मराठीत 'मावळलेले' अनेक शब्द त्यात असत," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

एकदा त्यांनी लिहिलं होतं, "आपण एकदा सगळे विमानात बसू आणि ढगांना हात लावू. पण त्यांची विमानात बसायची इच्छा पूर्ण झाली नाही. आता मी त्यांना पत्र लिहिलं आहे. अण्णा तुम्ही विमानात बसू शकला नाहीत, पण तुम्ही आम्हाला जगाची ओळख करून दिलीत", असं मी या पत्रात म्हटलं आहे.

सुंदर पत्रांमध्ये गुरुजी अनेक पाश्चात्य विचारवंतांची ओळख करून देत असत. "आईनस्टाईन, गटे, वर्डस्वर्थ यांची नावं जागोजागी पेरत त्यामुळे मुलांच्या मनामध्ये या विचारवंतांबद्दल जिज्ञासा जागृत होई", असे त्या सांगतात. 11 जून रोजी 1950 रोजीचं पत्र लिहून झाल्यावरच साने गुरुजींनी जगाचा निरोप घेतला.

कम्युनिस्ट विचार- काँग्रेस- वैफल्य

1935 च्या सुमारास साने गुरुजी डाव्या विचारांच्या संपर्कात आले होते असं निरीक्षण मुंबई येथील एसएनडीटी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख चैत्रा रेडकर यांनी नोंदवलं आहे.

त्यांनी गुरुजींच्या व्यक्तित्वाचा आणि विचारांचा वेध घेणारं 'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक लिहिलं आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "साने गुरुजी 1930 च्या दशकात डाव्या कम्युनिस्ट विचारांच्या संपर्कात आले होते. 1936 च्या प्रांतिक सरकारमध्येही काँग्रेसने रॅडिकल भूमिका घ्यावी असं त्यांचं मत होतं.

Image copyright SADHANA SAPTAHIK

दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेस आणि डाव्यांनी युद्धविरोधी भूमिका घेतली होती. पण रशिया युद्धात उतरल्यावर डाव्यांनी रशियाला पोषक भूमिका घेतली. त्यामुळे साने गुरुजी डाव्यांपासून दूर गेले. तोवर इकडे त्यांच्यापासून काँग्रेसही दुरावली होती.

सगळ्या बाजूंनी ते एकटे पडले होते. 1946 सालच्या काँग्रेसच्या अंतरिम सरकारमुळेही त्यांना आपली निराशा झाली असं वाटू लागलं. आपण सर्वांना एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी लढायला सांगितलं, पण आपण ते ध्येय नीट साध्य करत आहोत का असे प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागले."

स्वातंत्र्यानंतर या गरिबांचं काय होणार असे प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागले. तसेच वैयक्तिक आयुष्यातही त्यांची आर्थिक ओढाताण होऊ लागली होती. या वैफल्यावर ते सार्वजनिकरित्या बोलत नसले तरी त्यांनी तेव्हा लिहिलेल्या पत्रांमधून देशाच्या स्थितीबाबत निर्माण झालेले नकारात्मक विचार दिसून येतात, असं रेडकर सांगतात.

तेव्हाचे राजकारण आणि साने गुरुजी यांच्याबद्दल लिखाण करणारे लेखक, पत्रकार प्रभाकर पाध्ये यांनी 1946 साली 'तीन तपस्वी' या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

या ग्रंथात पाध्ये लिहितात, "साने गुरुजींच्या सत्वशीलतेच्या तेजाने नोकरशाहीच्या नेत्रास अंधत्व आले, एवढेच नव्हे तर कित्येक काँग्रेसभक्तांनाही ते तेज सहन होईनासे झाले.

ज्यांची काँग्रेसभक्ती विशुद्ध देशप्रेमातून निर्माण न होता सत्ताभिलाषेतून निर्माण झाली होती अशा काही काँग्रेसश्रेष्ठींना (अधिग्रहणाच्या काळात) साने गुरुजींच्या तेजाचा उपद्रव वाटू लागला आणि आजसुद्धा ऑगस्ट आंदोलनाचा उज्ज्वल आणि उदात्त पुरस्कार करणाऱ्या साने गुरुजींची काही काँग्रेस नेत्यांना अडचण वाटू लागली आहे."

प्रभाकर पाध्ये यांनी लिहिलेल्या या ओळींमधून उत्तरायुष्यात त्यांची कशी कोंडी झाली असेल याचा अंदाज बांधता येतो.

टोकाची परोपकारीवृत्ती आणि खालावलेली आर्थिक स्थिती

साने गुरुजी टोकाचे परोपकारी होते असे रेडकर सांगतात. "एखादा नाडलेला माणूस आला की त्याला एका पुस्तकाचा कॉपीराइट देऊन टाकत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली होती", असं सांगत गुरूजींच्या परोपकारी वृत्तीबद्दल सुधाताई साने यांनीही बीबीसी मराठीकडे मत मांडले.

Image copyright DATTA JOSHI/PALGAD
प्रतिमा मथळा गुरुजींच्या निधनानंतर नवशक्तीमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्तांकन

सुधाताई सांगतात, "एखादा कार्यकर्ता, कामगार प्रश्न घेऊन आला की साने गुरूजी एका रात्रीत पुस्तक लिहित. ते प्रकाशकाकडे सोपवून मोकळे होत असं त्या सांगतात. त्यांच्या इतक्या पुस्तकांपैकी एकाही पुस्तकाचे हक्क साने कुटुंबाकडे नाहीत."

'रोकडा व्यवहार आणि देवाणघेवाणीच्या जगात आदर्शवाद तोकडा पडला'

साने गुरुजींचं साहित्य रडकं आहे. ते खूपच आदर्शवादी आहे. भाबडं आहे असा त्यांच्यावर आरोप होतो. ते स्वप्नाळू होते, असंही म्हटलं जातं. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या आरोपांबद्दल चर्चा केली.

ते म्हणाले, "रोकडा व्यवहार, देवाणघेवाणीची चर्चा करणाऱ्या या समाजामध्ये त्यांच्यासारखा सर्वव्यापी, सर्वांचं कल्याण व्हावं असा विचार करणाऱ्या, माणसंच नव्हे तर सर्व नागरिक, सृष्टी, प्राणी यांना कवेत घेण्याची भाषा करणारा माणूस स्वप्नाळू वाटणं शक्य आहे.

ज्या लोकांवर कोवळ्या वयात गांधीजींच्या आदर्शवादाचे संस्कार झाले त्यांना गुरूजींच्या संवदेनशील मनाचा, त्यांच्या विचारांचा ठाव घेता येणं शक्य आहे. "

"साने गुरुजींची पात्र स्वतःसाठी रडत नाहीत तर ती एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी मिळालं नाही म्हणून रडतात", याकडे शिरसाठ लक्ष वेधतात.

Image copyright DATTA JOSHI/PALGAD
प्रतिमा मथळा विद्यार्थी मासिकाचे संपादन आणि चरित्रलेखन

साने गुरुजींच्या साहित्याबाबत प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरूंदकरांनी विचार मांडले होते असं शिरसाठ सांगतात. साने गुरुजींचं साहित्य 14 ते 18 वयाच्या मुलांच्या मनावर परिणाम करतं असं ते म्हमाले होते.

या 4 वर्षांच्या काळात जर त्यांचा संस्कार झाला तर त्यांचं मोठेपण समजतं असे ते कुरुंदकरांनी म्हटल्याचं शिरसाठ सांगतात.

गुरुजींचे क्रांतीचे विचार 'स्वप्नं' होती की 'योजनाबद्ध विचार'?

गुरुजी लोकांना केवळ क्रांतीची स्वप्नं दाखवत होते की त्यामागे योजनाबद्ध विचार होता असा प्रश्न विनोद शिरसाठ यांनी समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान यांना विचारला होता. प्रधान यांनी साने गुरुजींबरोबर काम केलं होतं.

तेव्हा प्रधान यांनी शिरसाठांना उत्तर दिलं होतं, "साने गुरुजी हे अत्यंत संवेदनशील आणि पारदर्शक होते. जगाच्या उत्कर्षात आपला उत्कर्ष ते मानायचे. 1940 च्या दशकात आम्हालाही इथं कोणी दुःखी राहाणार नाही असं वाटायचं.

आमचाही त्यावर विश्वास बसायचा. पण नंतर सर्वांचा भ्रमनिरास झाला. ते एकदम भारावलेलं, चेतवलेलं वातावरण होतं. साने गुरूजी अत्यंत उत्कटतेने निर्णय घेत."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा महात्मा गांधींचा गुरुजींवर मोठा प्रभाव होता.

स्वातंत्र्यानंतर केवळ तीन वर्षांमध्ये देशाची ही स्थिती झाली तर पुढे काय होईल असा प्रश्न गुरूजींना पडला होता असं सुधाताई साने सांगतात.

त्या म्हणाल्या, "काँग्रेसनं जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण होत नसल्याचं दिसल्यावर त्यांना धक्का बसला होता. स्वातंत्र्य म्हणजे परकीयांची सत्ता जाणं असं नाही तर सर्वांचे संसार सुखाचे होणार नाहीत तोपर्यंत खरं स्वातंत्र्य येत नाही असं त्यांचं मत होतं. त्यांच्या 'जयंता' पुस्तकात त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील संकटांबाबत लिहिलं आहे."

गांधीहत्येचा आघात

1948च्या जानेवारी महिन्यात महात्मा गांधी यांची नथुराम गोडसेने हत्या केली. या हत्येचा गुरुजींच्या मनावर प्रचंड आघात झाला.

याबद्दल सांगताना सुधाताई साने सांगतात, एखादी व्यक्ती गांधीजींची हत्या करूच कशी शकते आणि मराठी व्यक्तीने त्यांची हत्या केली याचं अपार दुःख त्यांना झालं. त्यावेळी त्यांनी 21 दिवसांचं उपोषणही केलं होतं.

साने गुरुजींना उत्तरायुष्यात खंत का वाटू लागली?

"देश स्वतंत्र झाल्यावर सर्व देश एक होईल, लोक गट-तट विसरतील, सर्वांना रोजगार मिळेल, सर्वांना पोटभर खायला मिळेल अशी आशा साने गुरुजींना होती", असं शिरसाठ सांगतात. मात्र स्वातंत्र्यानंतर यातलं काहीच होताना त्यांना दिसलं नाही.

"50 वर्षांच्या आयुष्यातली शेवटची 25 वर्षं ते राबराब राबले होते. शंभराहून अधिक पुस्तकं लिहिली होती पण त्यातून काहीच निष्पन्न होताना त्यांना दिसलं नाही."

"विचारांच्या आणि आचरणाच्या पातळीवर कोठेही तडजोड करणं त्यांना शक्य नव्हतं. तसेच वैयक्तिक आयुष्यातही आघातांची मालिका सुरूच होती. आई-वडिलांपाठोपाठ भाऊ, भावजय, पुतण्या अशी निधनांची मालिका त्यांना पाहावी लागली.

प्राणापर्णाचा निर्णय आणि कृती

साने गुरुजींनी 11 जून 1950 रोजी प्राणार्पण केले. गुरुजींनी हा निर्णय का घेतला असावा याबद्दल प्रवाद काही काळ चर्चेत होते. राजकीय अनागोंदीमधून आलेले वैफल्य त्यांना प्राणार्पणाच्या निर्णयापर्यंत घेऊन जाईल असे कोणालाही वाटले नव्हते.

2010 साली ज्येष्ठ साहित्यिक रा. ग. जाधव यांनी 'साधना'मध्ये साने गुरुजी विशेषांकातील लेखात गुरुजींच्या प्राणार्पणाबद्दल लिहिले आहे.

Image copyright OTHERS
प्रतिमा मथळा गांधीजींच्या मारेकऱ्यांवर चाललेला खटला. गांधीजींच्या हत्येने साने गुरुजींच्या मनावर मोठा आघात झाला.

ते लिहितात, "गुरुजींच्या भावसंस्कृतीप्रधान परिवर्तनवादाला मोठी मूल्यात्मक प्रतिष्ठा प्राप्त झाली, ती त्यांच्या प्राणार्पणाच्या निर्णयाने व कृतीने! गुरुजीप्रणीत भावमूल्यात एक व्यापक मानवतवादी अपराधी जाणिवेचा- guilty conscience चा मौलिक घटक होता. त्यांच्या विचारात व वाङ्मयात केवळ नव्हे, तर आचारातही तो होता.

म्हणूनच आपल्या परंपरेने हरिजनांचा केलेला गुन्हा, अपराध मान्य करून त्याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी त्यांनी पंढरपूरसाठी प्राणांतिक उपोषण केले. ही अपराधी भावना या भल्या माणसाने दीर्घ काळपर्यंत मनोमन वागवली, सहन केली."

गुरुजींच्या प्राणार्पणामागे गांधीहत्येची घटना असावी असंही जाधव यांनी या लेखात म्हटलं आहे.

ते म्हणतात, "गुरुजींच्या प्राणार्पणाच्या निर्णयामागे असेच एक दुखरे अपराधी मानस होते, असे वाटते. ते म्हणजे म. गांधींच्या हत्येचा महापराध. ही अपराधी भावना केवळ एकवीस दिवसांच्या उपोषणाने शमली नाही. ती त्यांच्या देहमनाला पुढील अठ्ठावीस महिने पोखरत राहिली. भावसंस्कृती, भावमूल्य आणि त्यांतील मानवतावादी अपराधी जाणीव अपूर्व, धक्कादायक व शोकात्म परिणती म्हणजे गुरुजींचे प्राणार्पण!"

त्यांचे रडणे-चिडणे सुंदर होते, त्या चिडण्यामागे भव्यता होती- पु. ल. देशपांडे

साने गुरुजींच्या तरल पण क्रांतिकारक विचारांचे पु. ल. देशपांडे यांनी अत्यंत चपखल वर्णन केले आहे.

"या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत साने गुरूजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे. saneguruji.net या वेबसाइटवर पु. लं. च्या या मताचा उल्लेख करण्यात आला आहे.

Image copyright ANMOL PRAKASHAN
प्रतिमा मथळा श्यामची आई

पु. ल. देशपांडे पुढे म्हणतात, 'ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा! तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!' केशवसुतांचा नवा शिपाई मला साने गुरुजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते."

"साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी तो क्षण खऱ्या अर्थाने आपण जगलो असे म्हणा.

साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती."

(संदर्भः श्यामची आई, सुंदर पत्रे आणि साने गुरुजींची इतर पुस्तके. साप्ताहिक साधना 12 जून 2010 अंक)

(या लेखासाठी विनोद शिरसाठ पुणे, सुधा साने-बोडा, बडोदा आणि पार्थ पंड्या, दिल्ली यांनी मदत केली आहे.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)