गिरीश कर्नाड: राजकीय भूमिका ठामपणे मांडणारा 'वादग्रस्त' नाटककार

गिरीश कर्नाड Image copyright Getty Images

ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक गिरीश कर्नाड यांचं आज सकाळी निधन झालं. नाटक, साहित्य, चित्रपट या क्षेत्रात प्रामुख्याने मुशाफिरी करणाऱ्या कर्नांडांनी त्यांच्या प्रतिभेची झलक विविध भाषा आणि विविधांगी विषयाच्या कलाकृतीतून दाखवली. इतिहास, पुराणांचा आधार घेत जगण्याचं सूत्र शोधण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या नाटकातून केला.

1938 साली माथेरान येथे जन्म झालेल्या कर्नाडांचं प्राथमिक शिक्षण मराठीत झालं. त्यानंतर ते कर्नाटकातील धारवाड या गावात स्थलांतरित झाले. त्यांनी पुढे धारवाड येथे कला शाखेत पदवी मिळवली. नंतर ते इंग्लंडला गेले. तिथे तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांचा त्यांनी अभ्यास केला. ते रोह्डस स्कॉलरही होते.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी लिखाणाचा पेशा पूर्णवेळ स्वीकारला आणि मद्रास प्लेयर्स या नाटकाच्या एका गटात सामील झाले. 1974-75 या काळात पुण्यातील FTII या संस्थेचं अध्यक्षपदही भूषवलं. यादरम्यानच्या आठवणी त्यांचे पुतणे किरण कर्नाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जागवल्या.

ते म्हणतात. "गिरीश बाप्पा (म्हणजे काका) प्रभात रोडवर असलेल्या FTII चे प्राचार्य होते. तिथे अनंत नाग,ओम पुरी आदी नट शिक्षण घेऊन नुकतेच बाहेर पडत होते. मी मग तिथे रहायला गेलो. तिथे बंगल्यावर गिरीशबाप्पांना भेटायला कारंथांसारखे अनेक साहित्यिक, नट, इंग्रजी मराठी पत्रकार यायचे. गिरिशबाप्पांचे थोरले बंधू वसंत कर्नाडही काही काळ तिथे रहात होते."

"या काळात नॅशनल फिल्म आर्काईव्हचे ऑफिसही शेजारीच असल्याने बंगल्यावर सतत लोकांचा राबता असे. या गदारोळात माझ्या बरोबरचे अनेक ट्रेनीज यानाही त्यांच्या आग्रहाखातर घेवून जायचो. सर्वांना गिरीश कर्नाड या सहा फूट देखण्या कलाकाराला पहावं भेटावंसं वाटत असे. या सगळ्यांशी गिरीशबाप्पा अत्यंत आस्थेने आणि प्रेमाने बोलायचे, हस्तांदोलन करायचे. त्यांची विचारपूस करायचे चहापाणी द्यायचे. एवढा मोठा कलाकार माणूस असूनही एकदाही त्यांनी 'किरण या तुझ्या माणसांशी मित्रांशी भेटायला मला वेळ नाही. त्याना कृपया घरी आणू नकोस' असे कधीही म्हटले नाही. किती साधा पण किती मोठा माणूस."

लिखाणातलं वैविध्य

प्रसिद्ध लेखक आणि अनुवादक उमा कुलकर्णी यांनी कर्नाड यांच्या आत्मचरित्राचा आणि त्यांच्या चार नाटकांचा मराठीत अनुवाद केला आहे. गिरीश कर्नाडांच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणतात, "कर्नांडांच्या आधी मी आधी ज्या लेखकांच्या कथा कादंबऱ्या अनुवादित केल्या त्यांना मराठी येत नव्हतं. यांना मराठी येत होतं. त्यामुळे ते माझे सगळे अनुवाद तपासून बघायचे. त्यामुळे माझं काम हलकं झालं. माझ्या काही सूचना असतील तर ते ऐकून घेत असत. आपलंच खरं करायचा त्यांचा स्वभाव नव्हता. संस्थांतर्गत काम केल्यामुळे, तसंच चित्रपटात, नाटकात काम केल्यामुळे, त्यांना माणसांना सोबत घेऊन जायची सवय होती."

"मी त्यांचा आत्मचरित्राचा अनुवाद करत होते. मराठी वाचकांना रुचेल, किंवा आवडेल असा महाराष्ट्राशी निगडीत भाग घ्यावा अशी सूचना मी त्यांना केली. तेव्हा त्यांच्या मूळ कन्नड आत्मचरित्रातला भाग काढून टाकला आणि महाराष्ट्रातला भाग टाकला," उमा कुलकर्णी पुढे सांगतात.

Image copyright Getty Images

गिरीश कर्नांडांनी लोककथा, पुराणकथा घेऊन आजच्या काळात विकसित करायचे. लोककथेचा एक नाजूकपणा असतो. तो तसाच समजून घ्यावा लागतो. त्यामुळे त्याचा अनुवाद करतानाही रोमांचित व्हायला होतं. नागमंडल नाटकात दोन शेवट ठेवले आहेत. कर्नाटकात जे. जयश्री नावाच्या एक दिग्दर्शिका आहेत त्या या नाटकाचा तिसरा शेवट दाखवतात. नाटकककार म्हणून असं स्वातंत्र्य देणं हा फार मोठा गुण कर्नाडांमध्ये होता असं उमा कुलकर्णी सांगतात.

एक महायोद्धा हरपला

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनीही कर्नाड यांच्या आठवणींना उजाळा दिला. "गिरीश कर्नाड या महाकाय व्यक्तिमत्त्वाबरोबर मला अतिशय महत्त्वाचे आणि सुंदर क्षण घालवायला मिळाले हे मी माझं भाग्य मानतो. गिरीशची आणि माझी ओळख 1967 पासून. तो जेव्हा लंडनहून परत आला तेव्हा ययाती हे त्याचं नाटक मुंबईत सादर केलं होतं. मी प्रेक्षकांमध्ये बसून भारावून गेलो. त्यानंतर तरुण, लाघवी अशा पद्धतीने त्याची ओळख मुंबईच्या नाट्यविश्वात करून देण्यात आली होती. तेव्हापासून ते अगदी मागच्या महिन्यात मी त्याला भेटायला बंगळुरूला गेलो होतो. अगदी तेव्हापर्यंत तो मला आठवतो."

"माझ्या आयुष्याला महत्त्वाचा टप्पा म्हणजे हयवदन नाटक. त्यात मी आणि अमरीश पुरींनी अभिनय केला होता. त्या नाटकाच्या निमित्ताने त्याच्याशी अनेकदा गप्पा आणि चर्चा करायची संधी मला मिळाली. त्यानंतर अनेकदा झालेल्या गप्पांमधून मला असं जाणवलं की गिरीशचं ज्ञान, साहित्य, रंगभूमी, चित्रपट क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे. तरीही तो अतिशय साधा, लाघवी होता. तो लोकांशी प्रेमाने वागायचा. इतक्या प्रतिभावान माणसाबरोबर काम करणं आणि खूप शिकण्याचं मला भाग्य लाभलं," पालेकर कर्नाडांबद्दल भरभरून बोलत होते.

Image copyright Getty Images

इतिहासातल्या गोष्टींना आजचा संदर्भ देऊन कलात्मकरीत्या सादर करणं आणि त्यातून काही प्रश्न उभे करणं ही त्याची खासियत होती. त्यामुळे ती नाटकं पुन्हा पुन्हा करत रहावीशीही वाटतात. गिरीशची नाटकं कालातीत होती. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि गिरीश कर्नाड हे भारतीय रंगभूमीचे शिलेदार मानले जातात. गिरीश त्यांच्यापेक्षा तरुण होता तरी तो त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला. त्यांच्या बरोबरीने भारतीय रंगभूमीला एक मोठी दिशा दिली असं पालेकर पुढे म्हणाले.

उंबरठा

डॉ जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपटाच्या माध्यमातून कर्नाड घरोघरी पोहोचले. एक सुखवस्तू वकील, नवरा आणि बाप अशा मुख्य भूमिकेत असलेल्या कर्नाडांबरोबर स्मिता पाटील यांनी सादर केलेल्या सशक्त अभिनयामुळे हा चित्रपट आजही मैलाचा दगड समजला जातो. आपल्या करिअरसाठी एक तरुणी उंबरठा ओलांडते, तिला अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यानंतर नाईलाजाने घरी येते. आता तिला कोणी स्वीकारत नाही आणि ती दुसऱ्यांदा उंबरठा ओलांडते.

चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यामते गिरीश कर्नाड यांची भूमिका खलनायकी प्रकारची होती. बायकोच्या आशा आकांक्षांना विरोध करणारा नवरा अशी त्याची प्रतिमा या चित्रपटात होती. तरीही त्यांनी ही भूमिका अगदी सौम्य पद्धतीने निभावली. चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगात गिरीश कर्नाड त्यांच्या बायकोला म्हणजेच स्मिता पाटीलला सांगतात की त्यांच्या आयुष्यात एक दुसरी स्त्री आली आहे. त्यांनी हा डायलॉग अशा पद्धतीने म्हटला की लोकांना तेही अपील झालं. जर नवऱ्याचं न ऐकता बायको बाहेर पडत असेल तर त्याला दुसरी स्त्री आवडेलच असं अनेक स्त्रियांचं मत झालं.

Image copyright Getty Images

तसंच हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये करायचं ठरलं. त्यामुळे मराठी आणि हिंदी बोलणारा नायक हवा असा आग्रह विजय तेंडुलकरांनी धरला. तेव्हा कर्नाडांचं नाव समोर आल्याची आठवणही जब्बार पटेलांनी सांगितली.

साहित्य, नाटक, चित्रपट अशा अनेक क्षेत्रात काम करण्याबरोबरच राजकीय विषयावरही त्यांनी अगदी ठळकपणे मांडली. त्यावरून अनेकदा ते वादातही अडकले. याविषयी बोलताना उमा कुलकर्णी म्हणतात, "विविध क्षेत्रात त्यांनी काम केल्यामुळे ते कोणत्याही अभिनिवेशात ते अडकले नव्हते. त्यांची काही मतं टोकाची होते. काही वेळा त्यावरून वाद व्हायचे. पण 'माणूस सरळ' असं त्यांच्याविषयी सगळे म्हणायचे. वैचारिक वाद घालण्यात ते अजिबात कमी पडायचे नाहीत. मध्यंतरी लोक त्यांना अर्बन नक्षल म्हणाले तेव्हा त्यांची तब्येतही ठीक नव्हती. तरी ते त्यांच्या विधानांवर ते ठाम होते."

प्रसिद्धी तुझ्यामागे धावत येईल

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही कर्नांडांच्या आठवणी सांगतात, "माझं संपूर्ण करिअर घडवण्यात गिरीश अंकलचा खूप मोठा वाटा आहे. चेलुई हा माझा पहिला चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामुळेच मला पुढचे अनेक चित्रपट मिळाले. बरं या चित्रपटात काम देतानाही त्यांनी मला तू माझ्या चित्रपटात काम करशील का असं चक्क विचारलं होतं. तेव्हा मी भोळसटासारखं सांगितलं माझी परीक्षा आहे, तेव्हा त्यांनी माझ्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची प्रत मी ठेवायला हवी होती अशी रुखरूख मला कायम लागून राहील."

Image copyright Sonali kulkarni

"या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी एकदा तिथे पत्रकारांना आणि फोटोग्राफर्सला बोलावलं होतं. त्यांच्यासोबत जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा सीन सुरू असतानाच ते वारंवार फोटोची मागणी करू लागले. तेव्हा मी जरा गोंधळून गेले. त्यावेळी गिरीश अंकलने मला सांगितलं की तू तुझ्या कामावर लक्ष दे. प्रसिद्धी आणि ग्लॅमरकडे लक्ष देऊ नको. तुझं काम चांगलं असेल तर प्रसिद्धी आणि ग्लॅमर तुझ्यामागे धावत येईल. आपण त्यांना लंचची वेळ दिली आहे. तेव्हा हवे तितके फोटो दे. फोटो मागणं त्यांचं कामच आहे. शुटिंग सुरू आहे असं त्यांना सांग," सोनाली कर्नाडांच्या आठवणीत हरवते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)