'इथे अजिबात पाणीच नाही...का कोणी रहावं इथे?'

दुष्काळ Image copyright Getty Images

75 वर्षांचे दगडू बेलदार रोज सकाळी उठून त्यांच्या गावच्या घरी डाळ-भात शिजवतात. त्यानंतर त्यांच्याकडे करण्यासारखं फारसं काहीच नसतं.

बीड जिल्ह्यातल्या हटकरवाडीमध्ये ते राहतात. गेली 3 वर्षं बेलदार त्यांच्या अंधाऱ्या एका खोलीच्या घरात एकटेच राहतात. दुष्काळामुळे त्यांची बायको आणि तीन मुलं गावाबाहेर निघून गेले आहेत.

जमीन भेगाळली आहे आणि विहिरी आटून गेल्यात. प्यायला आणि आंघोळ करायला अगदी थोडं पाणी उरलंय. बेलदार कुटुंबाचं बाजरीचं शेत ओसाड पडलंय.

दगडू बेलदारांच्या दोन मुलांना 400 किलोमीटर दूर सांगलीमध्ये साखर कारखान्यात नोकरी मिळाली. शाळेत जाणाऱ्या तिसऱ्या मुलाची काळजी घेण्यासाठी आईही तिथेच राहतेय. हटकरवाडीबद्दलच्या फक्त वाईट आठवणीच आता त्यांच्या मनात राहिलेल्या आहेत.

वयानुसार दगडू बेलदारांना आता कमी ऐकू येऊ लागलंय. दिवसाचा बहुतेक वेळ ते अंधाऱ्या खोलीत बसून असतात.

''ते अगदी एकटे पडलेयत. तीन वर्षं झाली ते कुटुंबाला भेटलेले नाहीत. हे सगळं पाण्यामुळे झालं,'' शेजारी राहणारे गणेश सदगर सांगतात.

प्रतिमा मथळा हटकरवाडी

शेजारच्याच गल्लीतल्या 75 वर्षांच्या किसन सदगरांचा एकुलता एक मुलगा 10 वर्षांपूर्वी साखर कारखान्यात काम करायला म्हणून घराबाहेर पडला. ते आता बायको आणि एका पाळलेल्या कुत्र्यासोबत गावात राहतात. ''माझा मुलगा क्वचितच येतो घरी. आणि जेव्हा येतो तेव्हा 2-3 दिवसांतच त्याला परत जायचं असतं. कारण इथे पाणी नाही.'' ते सांगतात.

काही घरं पुढे सागाबाई त्यांच्या 14 वर्षांच्या मूकबधीर मुलीसोबत, पार्वतीसोबत राहतात. त्यांचा मुलगा अप्पा, फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी काही वर्षांपूर्वीच गाव सोडून गेलाय. ''तो फारसा घरी येत नाही. पाऊस पडला तरच येईन म्हणतो,'' सागाबाई सांगतात.

गावातले एकमेव पदवीधर असलेल्या गणेश सदगर यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही कारण ''पाणी नसलेल्या गावात यायला कोणीही मुलगी तयार नाही.''

हटकरवाडी जिथे आहे तो बीड जिल्हा कमी पर्जन्यमानासाठीच ओळखला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इथल्या 125 घरांमध्ये 1200पेक्षा जास्त माणसं रहात होती. त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त त्यातही बहुतांशी पुरुष गाव सोडून गेलेले आहेत.

आता मागे राहिली आहेत कड्याकुलुपं लावलेली बंद घरं. पाण्यामुळे गाव सोडून गेलेल्या या सगळ्यांना दूरच्या शहरात नोकऱ्या मिळाल्या. ऊसतोडणी, साखर कारखाने, बांधकामं किंवा अगदी टॅक्सी चालवण्याचं काम हे सगळे करतात.

प्रतिमा मथळा पाणी नसल्यामुळे दगडू बेलदार यांच्या कुटुंबातील लोकांनी गाव सोडलं आहे.

''इथे पाणी नाही. का कोणी रहावं इथे?'' गावचे सरपंच असणारे 42 वर्षांचे भीमराव बेलदार विचारतात.

मी गावात पोचायच्या आदल्या रात्री पावसाची एक सर पडून गेली होती. दुसऱ्या सकाळी दिवशी आकाशात असलेले काळे ढग पाहून बऱ्यापैकी पाऊस पडेल असं वाटत होतं. पण दुपारपर्यंत आकाश पुन्हा मोकळं झालं. गावामध्ये ''बऱ्यापैकी पाऊस'' पडल्याला तीन वर्षं उलटून गेली आहेत.

रणरणत्या उन्हाने हटकरवाडीतलं चैतन्यचं काढून घेतलंय. जमीन भेगाळलेली आहे. कपाशी आणि बाजरीची शेतं करपून गेली आहेत. गावातल्या 35 पैकी फक्त 2 विहिरांना थोडं पाणी आहे. गावात डझनभर बोअरवेल आहेत पण भूजल पातळी इतक्या झपाट्याने घसरतेय की पाणी काढण्यासाठी 650 फुटांपर्यंत खोल खोदावं लागतंय.

वाऱ्याचा जरासा मोठा झोत जरी आला तरी विजेची लाईन तुटते. म्हणून मग बोअरवेलचा फायदा होत नाही. दुष्काळी आयुष्य ज्यावर अवलंबून असतं ते पाण्याचे टँकर गावात यायला नकार देतात. कारण गावाला जोडणारा अरूंद रस्ता अतिशय वाईट स्थितीत आहे.

प्रतिमा मथळा यशवंतराव सदगर यांनी पाणी नसल्यामुळे घराला कुलूप लावून गाव सोडण्याचा निर्णय घेतला.

जनावरांना चारा नाही म्हणून मग गावातल्या 300 म्हशी सध्या डोंगराच्या वरच्या बाजूला असलेल्या चारा छावण्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या आहेत. इथे या गुरांसोबत त्यांच्या मालकालाही ताडपत्रीखाली रहावं लागतं.

उघड्यावरच्या शौचाची प्रथा थांबवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोहीमेअंतर्गत सुमारे 75 नवीन संडास बांधण्यात आलेले आहेत. पण पाणीच नसल्याने ते वापरता येत नाहीत. बहुतेक गावकऱ्यांना पिण्याचं आणि आंघोळीचं पाणी बोअरवेल असणाऱ्या श्रीमंत शेजाऱ्यांकडून मागून घ्यावं लागतं.

बीडच्या नकाशामध्ये हटकरवाडी एक लहानसा ठिपका आहे. जिल्ह्यामध्ये दहा लाखांपेक्षा जास्त लोकांना या दुष्काळाचा फटका बसलाय.

वृक्षतोडीमुळे जंगलांचं प्रमाण जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या जेमतेम 2% वर आलेलं आहे. फक्त 16% शेतांवर पाणी पोचलेलं आहे. जेव्हा पाऊस बरा होतो तिथे त्या पाण्यावर 6,50,000 शेतकरी कापूस, सोयाबीन, ऊस, ज्वारी-बाजरीचं पीक घेतात.

पण बीड जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण गेली 6 वर्षं कमी होतंय. बेभरवशाच्या पावसामुळे पिकांचं नुकसान होतंय. पावसाने 10 दिवस जरी दडी मारली तरी पिकांचं नुकसान होऊ शकतं.

गेल्यावर्षी भरपूर पाऊस पडला. अगदी दरवर्षी अपेक्षित असणाऱ्या सरासरी 690 मिलीमीटर पावसाच्या 99% पाऊस पडला. पण तरीही पिकांचं नुकसान झालंच. कारण पावसाने चार वेळा मोठी दडी मारली.

प्रतिमा मथळा यशवंतराव सदगर यांनी पाणी नसल्यामुळे घराला कुलूप लावून गाव सोडण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाची समजली जाणारी गोदावरी नदीही कोरडी होतेय. बीड जिल्ह्यातल्या 140 लहान - मोठ्या धरणांपैकी बहुतेक सगळीच कोरडी पडलेली आहेत. जिल्ह्यातल्या 800 विहिरींची स्थितीही तीच आहे. महत्त्वाच्या 2 धरणांमध्ये आता फक्त ''मृत पाणीसाठा'' असल्याचं अधिकारी सांगतात.

असं पाणी जे अगदी तळाशी उरलंय. ज्यात गाळ आणि कचराच जास्त आहे. हेच पाणी पंपाने उपसून जवळच्या तळ्यात टाकलं जातं जिथून हजारो टँकर्सचे ते पाणी उपसतात. त्यामध्ये क्लोरिन मिसळून ते तहानलेल्या 300 गावांना पुरवलं जातं.

बीड जिल्ह्यातल्या 8,00,000 जनावरांपैकी अर्धी जनावरं ही चाऱ्याच्या अभावामुळे 600 चारा छावण्यांमध्ये दाखल करण्यात आलेली आहेत. 40,000 पेक्षा जास्त लोकांनी रोजगार हमी योजनेतली कामं पत्करली असून अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अधिक लोकांना ही काम देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

शहरात राहणाऱ्यांनाही या दुष्काळाचा फटका बसलेला आहे. बीड शहरात राहणाऱ्या 2,50,000 नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्यात येतो. कधीकधी तर पंधरा दिवसांतून एकदाच नळाला पाणी येतं.

''गेल्या दशकभरातला हा सर्वांत वाईट दुष्काळ आहे. आमच्याकडचा पाणीसाठी जुलैच्या अखेरपर्यंत पुरेल आणि त्यानंतर भरपूर पाऊस पडेल अशी आम्हाला आशा आहे.'' बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे सांगतात.

प्रतिमा मथळा गावातल्या 35 विहिरींनी तळ गाठला आहे.

हवामान बदलाचे परिणाम संपूर्ण भारतात दिसून येत आहेत. महाराष्ट्राला भेडसावणारा दुष्काळ हा त्याचा भाग आहे. एका अंदाजानुसार देशाच्या 40% पेक्षा अधिक भूभागाला सध्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून याचा परिणाम 10 राज्यांतल्या 500 दशलक्ष लोकांवर झालेला आहे.

पिपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाचे संस्थापक आणि संपादक पी. साईनाथ म्हणतात की पाण्याचं दुर्भिक्ष्य हा गंभीर प्रश्न आहे. पण यासाठी फक्त दुष्काळच जबाबदार नसल्याचं ते म्हणतात. पाण्याचं वाटप करताना गरिबांचा बळी देत श्रीमंतांना जे अयोग्यरित्या पाणी दिलं जातं त्यामुळेही ही परिस्थिती उद्भवलेली आहे.

''शेतीचं पाणी इंडस्ट्रीकडे वळवणं, धान्याच्या शेतीचं पाणी नगदी पैसे देणाऱ्या जास्त पाणी लागणाऱ्या शेतीकडे वळवणं, गावाचं पाणी शहराला देणं आणि जगण्यासाठीचं पाणी, शहरी टोलेजंग इमारतींमधल्या स्वीमिंग पूलना देणं या सगळ्यांमुळेही ही स्थिती उद्भवलेली आहे.''

प्रतिमा मथळा पाऊस पडल्यावरच मुलगा घरी येतो असं सागाबाई सांगतात.

बीडमधल्या आपल्या ऑफिसमध्ये आस्तिक कुमार पांडे जीपीएस टॅग असलेल्या जिल्ह्यामधल्या पाण्याच्या टँकरची लाईव्ह मॅपवरची हालचाल पाहण्यात गढून गेलेले आहेत.

पाणी भरण्यासाठी थांबलेले टँकर दाखवणाऱ्या लाल ठिपक्यांनी आणि पाणी घेऊन जाणाऱ्या टँकर्सच्या हिरव्या ठिपक्यांनी जिल्हा व्यापून गेलाय...

''परिस्थिती इतकी वाईट आहे... आशा करूयात की पाऊस लवकरच येईल,'' पांडे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)