अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक, पाकिस्तान-टर्कीशी संबंधित ट्वीट #5मोठ्याबातम्या

Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक, पाकिस्तान-टर्कीशी संबंधित ट्वीट

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट सोमवारी रात्री हॅक करण्यात आलं होतं. अमिताभ यांच्या अकाउंटवरून तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित ट्वीट केले गेले.

हॅकर्सनी अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल-बायोही बदलला. अमिताभ यांच्या फोटोच्या जागी हॅकर्सनं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावला होता. बीबीसी हिंदीनं हे वृत्त दिलं आहे.

Image copyright TWITTER

टर्किश सायबर आर्मीच्या अयिल्दिज टीमनं अमिताभ यांच्या अकाउंट हॅकिंगची जबाबदारी स्वीकारली होती.

अमिताभ यांचं ट्विटर अकाउंट रिकव्हर करण्यात आलं असून हॅकर्सनी केलेले सगळे ट्वीटही हटवण्यात आले आहेत.

2. पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी घेतली मोदी-शाहांची भेट

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. लोकसत्तानं या भेटीचं वृत्त दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच त्रिपाठी यांनी मोदी व शहा यांची भेट घेतली. या भेटीत आपण राज्यातील स्थितीची माहिती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना दिली. मात्र भेटीचा सविस्तर तपशील आपण सांगू शकत नाही, असं त्रिपाठी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Image copyright Getty Images

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तर भाजपनं हा आरोप फेटाळला असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेसनंही पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून ममता बॅनर्जी आणि भाजपला लक्ष्य केलं. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याशिवाय निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, असं विधान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलं आहे. इंडिया टीव्हीनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

3. आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदासंबंधीच्या बातम्या निराधार : सुषमा स्वराज

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आंध्र प्रदेशचे राज्यपालपद सोपवले जाणार असल्याच्या चर्चा माध्यमांमधून तसेच सोशल मीडियावर सुरू होत्या. आंध्र प्रदेशच्या राज्यपाल म्हणून निवड झाल्याबद्दल स्वराज यांचं अभिनंदन करणारं ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही केलं होतं.

मात्र या सर्व चर्चांना स्वतः सुषमा स्वराज यांनी पूर्णविराम दिला असून या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

हर्षवर्धन यांच्या ट्वीटनंतर तासाभरातच सुषमा स्वराज यांनी ट्वीट करून आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून माझी नियुक्ती झाल्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं.

4. डॉ. पायल तडवी आत्महत्या : आरोपींच्या न्यायलयीन कोठडीत वाढ

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही महिला डॉक्टर आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढविण्याचा निर्णय न्यायालयानं सुनावला आहे.

Image copyright FACEBOOK/PAYAL TADVI

या प्रकरणातील आरोपी डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना 21 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी १७ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

नियमित सुनावणीसाठी या खटल्यातील एक वकील उपलब्ध नसल्यानं न्यायालयाने आरोपींची कोठडी वाढवली आहे.

5. मुंबईत पूर्वमोसमी पावसाची हजेरी, ढगाळ वातावरणामुळं बदलला विमानांचा मार्ग

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात सोमवारी संध्याकाळनंतर विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. मुसळधार पूर्वमोसमी पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे मंदगतीने धावत होती. बोरिवली आणि वांद्रे स्थानकादरम्यान पेंटाग्राफमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेवरही गाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

Image copyright Getty Images

ढगाळ वातावरण आणि वीजांचा फटका छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक विमान सेवांनाही बसला. युनायटेड एअरलाइन्सचं न्यूयॉर्कहून मुंबईला येणारं विमान दिल्लीला वळविण्यात आलं तर गो एअरचं दिल्लीहून मुंबईला येणाऱं विमान अहमदाबादकडे वळवलं. हिंदुस्तान टाइम्सनं हे वृत्त दिलंय. इतर 22 विमानांचा मार्गही बदलण्यात आल्याची माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)