बलात्कार प्रकरणातील मुस्लीम संशयिताला हिंदू तरुणांकडून मारहाण? ‘त्या’ व्हीडिओचं सत्य काय : फॅक्ट चेक

सोशल मीडिया व्हायरल Image copyright VIRAL VIDEO GRAB

सोशल मीडियावर सध्या मारहाणीचा एक बीभत्स व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. उत्तर प्रदेशमधील बाराबंकीत 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका मुस्लीम तरुणावर हिंदू तरुणाने चाकूनं वार केल्याचा दावा या व्हीडिओसोबत केला जात आहे. फेसबुक आणि ट्विटरवर हा व्हीडिओ 50 हजारहून अधिक वेळा पाहिला गेलाय.

वर्दळीच्या रस्त्यावर अगदी दिवसाढवळ्या काही लोक एका तरुणाला बेदम मारत असल्याचं या व्हीडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी गर्दीमधली निळा शर्ट घातलेली एक व्यक्ती त्या तरुणाला चाकू मारताना दिसते.

उजव्या विचारसरणीच्या अनेक फेसबुक ग्रुप्समध्ये हा व्हीडिओ अतिशय प्रक्षोभक अशा पोस्टसोबत शेअर केला जात आहे.

भगवा आतंकी नावाच्या एका फेसबुक ग्रुपवर हा व्हीडिओ शेअर करताना लिहिलं आहे, "देशात बलात्कारी लोकांसोबत आता हेच होईल. हिंदू आता जागृत झाला आहे."

काही जणांनी #अब_होगा_न्याय असं म्हणत हा व्हीडिओ तेलंगणामधील हैदराबाद शहरातील असल्याचं लिहिलं आहे.

Image copyright SM VIRAL POSTS

ज्या लोकांनी हा व्हीडिओ हैदराबादचा असल्याचं म्हटलं आहे, त्यांनी वेगळाच दावा केला आहे. गैर-मुस्लीम असल्यामुळेच एका मुस्लीम युवकानं आपल्या बहिणीच्या प्रियकरावर चाकूनं हल्ला केल्याचा दावा हा व्हीडिओ हैदराबादचा आहे असं म्हणणाऱ्यांनी केला आहे.

बीबीसीच्या वाचकांनी व्हॉट्स अॅपवरून हा व्हीडिओ आम्हाला पाठवला. या व्हीडिओसोबत केले जाणारे दोन्ही दावेही त्यांनी आमच्यासोबत शेअर केले. या व्हीडिओचं तथ्य त्यांना जाणून घ्यायचं होतं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हीडिओची पडताळणी केल्यानंतर हे दोन्ही दावे दिशाभूल करणाऱे असल्याचं आढळून आलं.

व्हीडिओची पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर लक्षात आलं, की गेल्या तीन दिवसांत सोशल मीडियावर या व्हीडिओबद्दल वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत.

यांपैकी काही व्हीडिओ हे थोडे दूरवरून शूट केले आहेत, ज्यामध्ये निळ्या रंगाची एक बस आणि पिवळ्या रंगाच्या काही ऑटोरिक्षा घटनास्थळाजवळून जाताना दिसत आहेत.

Image copyright VIRAL VIDEO GRAB

या घटनेचे जे दुसरे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यांचं शूटिंग वेगळ्या अँगलनं करण्यात आलंय. यामध्ये मेट्रो ट्रेनचा एक पूल दिसतोय.

घटनास्थळी असलेली एक जुनी टोयोटा क्वालिस कार, निळ्या कपड्यातला हल्लेखोर आणि त्याला अडविणाऱ्या काही बुरखाधारी महिलाही व्हीडिओमध्ये दिसत आहेत.

बीबीसीच्या पडताळणीत असं आढळून आलं, की सुरूवातीला हा व्हीडिओ हैदराबादचा म्हणून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि नंतर उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमधला असल्याचं म्हटलं गेलं.

हिंदू-मुस्लिम रंग देणं चुकीचं

या व्हीडिओबद्दल माहिती घेण्यासाठी आम्ही हैदराबाद पोलिसांशी संवाद साधला. हे प्रकरण हैदराबाद शहराच्या पश्चिम भागातील पन्जागुट्टामधील असल्याचं हैदराबादचे पोलिस उपायुक्त तिरुपतन्ना यांनी सांगितलं.

हे कौटुंबिक वादाचं प्रकरण असल्याचं त्यांनी बीबीसीचे प्रतिनिधी याकूत अली यांना सांगितलं. ही दोन्ही कुटुंबं मुस्लिम असल्याची माहितीही त्यांनी दिली. मारहाणीच्या या घटनेनंतर हैदराबादमधील SR नगर पोलिस स्थानकात या प्रकरणाची तक्रार नोंदविण्यात आली होती. इन्स्पेक्टर अजय कुमार या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Image copyright TWITTER/TV1

तपास अधिकारी अजय कुमार यांनी सांगितलं, "ही घटना 7 जून 2019 ची आहे. दोन्ही कुटुंब माझ्यासमोरच पोलिस स्टेशनमधून बाहेर पडली होती. त्यांनी हे प्रकरण परस्पर सहमतीनं मिटवलं होतं. मात्र थोड्या वेळातच आम्हाला माहिती मिळाली, की मुलीच्या (फातिमा) कुटुंबियांनी आपल्याच जावयावर (इम्तियाज) हल्ला केला आहे."

"फातिमानं आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन 6 जून 2019 ला आपला प्रियकर इम्तियाज सोबत विवाह केला होता. या लग्नामुळे फातिमाचे घरातले नाराज झाले होते."

व्हीडिओमध्ये इम्तियाजवर चाकूनं वार करताना दिसणारी व्यक्ती फातिमाचा भाऊ सैय्यद फारुक अली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय, असं अजय कुमार यांनी सांगितलं.

Image copyright SM VIRAL VIDEO GRAB

पोलिसांनी फातिमाच्या कुटुंबातील अन्य पाच लोकांनाही अटक केलीये. दोघे जण फरार आहेत.

या प्रकरणाला हिंदू-मुस्लिम वळण देण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे, असं अजय कुमार यांनी म्हटलं.

'दोघेही आता सोबत आहेत'

या हल्ल्यात इम्तियाज गंभीररित्या जखमी झाल्याचं अजय कुमार यांनी सांगितलं. मात्र त्याची प्रकृती आता स्थिर आहे, असंही त्यांनी म्हटलं. पन्जागुट्टामधील एका स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या मारहाणीत फातिमालाही इजा झाली होती. मात्र आता इम्तियाज आणि फातिमा एकत्र आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)