भारतीय वायुसेनेचं AN-32 विमान सापडलं, घनदाट जंगल आणि पर्वतांमुळे बचावकार्यात अडथळा

एयर फ़ोर्स Image copyright Reuters

भारतीय वायुसेनेचं बेपत्ता झालेलं AN-32 विमान अखेर सापडलं आहे.

भारतीय वायुसेनेनं ट्वीट करून त्याची माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशातल्या पश्चिम सियांग जिल्ह्यातल्यात लिपोच्या उत्तरेकडे हे विमान दिसून आल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय वायुसेनेची एमआय-17 हेलिकॉप्टर्स याची शोध मोहीम राबवत आहेत.

पण घनदाट जंगल आणि पर्वतांमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. बराच काळ तर हेलिकॉप्टर्स कुठे उतरवत येतील हे शोधण्यात गेला. आता ती जागा सापडली आहे. पण पुरेशा प्रकाशाअभावी मंगळवारी वचाव कार्य सुरू करता आलेलं नाही. बुधवार सकाळपासून ही शोधमोहिम हात घेतली जाईल असं भारतीय वायूसेनेकडून सांगण्यात आलं आहे.

या विमानाला बेपत्ता होऊन साधारण 8 दिवस झाले आहेत.

सोमवार 3 जून रोजी दुपारी 12.27 वाजता आसाममधल्या जोरहाट विमानतळावरून भारतीय वायुदलाच्या AN-32 या मालवाहू विमानाने झेप घेतली. पण दुपारी 1 वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि तेव्हापासून या विमानाचा आणि त्यात असलेल्या हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचा कुणालाच पत्ता नव्हता.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोदेखील जोरहाट आणि अरुणाचल प्रदेशच्या मेचुका या भागात बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेते होते. त्याशिवाय सुखोई 30 MKI, MI17, चिता आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टर, तसंच C130J सारखी लढाऊ विमानं आणि AN32चं एक मोठं पथक शोधमोहिमेच्या कामी लागलं होतं.

वायुदलाने या विमानाची खात्रीलायक माहिती पुरवणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

AN32 मध्ये बिघाड असल्याचा अंदाज होता

22 जुलै 2016 सालीदेखील एक AN32 विमान बेपत्ता झालं होतं. त्यात 29 कर्मचारी होते. त्यावेळी ते विमान पोर्ट ब्लेअर आणि चेन्नईजवळच्या तांबराम यांच्यादरम्यान उड्डाण करत होतं. त्याचा अजूनही शोध लागलेला नाही.

त्यावेळी विमान कोसळण्याचं संभाव्य ठिकाण किंवा सॅटेलाईट नेव्हिगेशनच्या मदतीने विमानाचा शोध घेता येईल, असं पाण्याच्या आत काम करणारं लोकेटर किंवा ऑटोमॅटिक डिपेंडंट सर्विलंस ब्रॉडकास्ट विमानात नव्हतं.

हवाई दलाचं म्हणणं आहे की सध्याच्या AN32मध्ये जुनं इमरजंसी लोकेटर ट्रान्समिटर (ELT) आहे, जे अपघात किंवा आणीबाणीच्या वेळी विमानाची स्थिती सांगू शकेल.

एका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे, "आतापर्यंत कुठलाच संकेत मिळालेला नाही. स्वाभाविकच अत्याधुनिक आणि अधिक प्रभावी ELTची मदत झाली असती."

विमान अद्ययावतीकरणात झाला विलंब

या विमानाच्या खरेदी कराराची माहिती असणाऱ्या एका जाणकाराने सांगितलं, "विमानाला बदलावं की ते अपग्रेड करावं, यावर दशकभर खल झाला. त्यानंतर आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो की विमान अपग्रेड करायला हवं.

"युक्रेनच्या अँटोनोव्ह कंपनीने हवाई दलासाठी या विमानाची निर्मिती केली होती. या कंपनीनेदेखील अपग्रेडेशनसाठी प्रस्ताव दिला होता. त्यातल्या अटीही चांगल्या होत्या."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा AN-32 - मालवाहू विमान

विमानाचं वय बघता त्याच्या पंखांमध्ये बदल व्हावा. विमानाची वयोमर्यादा 25 ते 40 वर्षांनी वाढवण्यासाठी त्यात आधुनिक उपकरणं लावावी, अशी हवाई दलाची इच्छा होती.

मात्र 2014च्या सुरुवातीला अचानक एक वाद निर्माण झाला. रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष पेटला. या युद्धाचा अनेक गोष्टींवर परिणाम झाला. AN32चं अपग्रेडेशनही त्यापैकीच एक.

हवाई दलाच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितलं, "योजनेनुसार काही AN32 युक्रेनमध्ये अपग्रेड झाले. आम्ही कानपूरमधल्या HAL मध्ये किट्स येण्याची वाट बघत होतो. मात्र त्यात विलंब झाला. आम्ही सगळीकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र योजनेनुसार अपग्रेडेशन होऊ शकलं नाही."

हवाई दलाचं म्हणणं आहे की AN32च्या अपग्रेडशनची आशा अजून पूर्णपणे मावळलेली नाही. हे मात्र खरं की त्यात विलंब झालाय.

Image copyright Reuters

आता आक्रोशाविषयी बोलू या. AN32 सारख्या जुन्या विमानांच्याही आधी याहूनही जुन्या हॉकर सिडले (HS) एव्हरो 748 या विमानावरही हवाई दलात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

सर्वप्रथम जून 1960 मध्ये HS एव्हरो उडवण्यात आलं आणि हे विमान उडवणं दिवसेंदिवस अवघड होत चालल्याचं अधिकारी सांगतात.

हवाई दलासमोर पर्याय काय आहेत?

एका सूत्राने सांगितलं, "संरक्षण मंत्रालयात HS एव्हरोला बदलण्याची फाईल UPA-2 च्या काळापासून धूळ खात पडली आहे. त्या तुलनेत AN32 बरं आहे."

भारतात सरकारी खरेदीबाबत असलेल्या गोंधळाचं वास्तव बघता हवाई दलाला याची पूर्ण कल्पना आहे की जुनं असो किंवा आधुनिक, जे उपलब्ध आहे, त्यातच गरज भागवावी लागणार आहे.

अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की अपग्रेड केलेली AN32 विमानंसुद्धा जवळपास एक दशक वापरली जाऊ शकतात. ते सांगतात, "AN32 उडवण्यात धोके असले तरी आमच्याकडे दुसरा पर्याय काय आहे?"

हवाई दलाच्या एका माजी प्रमुखांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "यंत्रणेत उत्तरदायित्व नसल्यातच जमा आहे. बालाकोटमध्ये हवाई दलाने केलेल्या कारवाईचं श्रेय घेणं ठीक आहे. मात्र UPA असो किंवा NDA, जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा सरकार का ऐकत नाही?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)