टिक टॉक व्हीडिओ बनवताना बंदुकीतून गोळी सुटून तरुणाचा मृत्यू : #पाचमोठ्याबातम्या

Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. टिक टॉक व्हीडिओ काढताना बंदुकीतून गोळी सुटून तरुणाचा मृत्यू

टिक टॉक व्हीडीओ तयार करताना गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याने एका युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. एबीपी माझाने यासंबंधी वृत्त दिलेलं आहे.

शिर्डीतील पवनधाम या हॉटेलमध्ये प्रतीक वाडेकर, नितीन वाडेकर, सनी पवार आणि इतर दोघे बसले होते. यावेळी टिक टॉक व्हीडिओ काढण्याचा मोह या सर्वांना आवरला नाही.

सनी पवारकडे असलेल्या बेकायदेशीर गावठी कट्ट्याचा व्हीडिओ बनवत असताना अचानक पिस्तुलातून गोळी सुटली आणि 20 वर्षीय प्रतीक वाडेकर याचा जागीच मृत्यू झाला. प्रतीकसोबत असणाऱ्या सर्वांनी तात्काळ घटनास्थळावरुन पोबारा केला.

पण पोलिसांनी तपास करत या घटनेमागील सत्य बाहेर आणलं. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पिस्तुल कुठून आलं, याबाबत तपास सुरू आहे.

2. काश्मीरमध्ये CRPF च्या पथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतावाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला आहे. अनंतनाग बस स्थानकाजवळ झालेल्या या हल्ल्यात पाच जवान ठार झाले आहेत. ही बातमी News18 लोकमतच्या वेबसाईटने दिली आहे.

अनंतनाग जवळच्या के. पी. रोडवर हा हल्ला झाला. सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा आत्मघाती हल्ला आहे.

पेट्रोलिंगसाठी जवानांचं वाहन जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यात दोन दहशतवादी ठार झाले. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गोळीबार सुरू होता.

3. भारताच्या मानवरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी यशस्वी

स्वदेशी बनावटीच्या मानवरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी येथे यशस्वीरीत्या घेण्यात आली असल्याचे बुधवारी संरक्षण सूत्रांनी सांगितले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

या विमानाचा वेग सुपरसॉनिक म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे. सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्मितीचा महत्त्वाचा भाग म्हणून यातील तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने बंगालच्या उपसागरावरील डॉ. अब्दुल कलाम बेटांवरून सकाळी ११.२५ वाजता ही चाचणी केल्याचं सांगण्यात आलं. हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमनस्ट्रेटर व्हेइकल (एचएसटीडीव्ही) या विशेष प्रकल्पांतर्गत हे विमान विकसित करण्यात आलं असून ते ध्वनीपेक्षा जास्त वेगाने जातं.

दरम्यान, भारताच्या चांद्रयान 2 या मोहिमेचा मुहूर्त ठरला असून १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

Image copyright ISRO

चांद्रयान-२ मोहिमेसाठी तीन मॉड्युल्स तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑर्बिटर, लँडर आणि एका रोव्हरचा समावेश आहे. त्यांना लाँच व्हेइकल जीएसएलव्ही एमके lll अंतराळात घेऊन जाईल. विशेष म्हणजे हे लाँच व्हेइकल भारतातच बनवण्यात आले आहे.

4. वेळेत ऑफिसला यायचं आणि घरून काम करायचं नाही, मंत्र्यासाठी मोदींचे नवे नियम

साडे नऊच्या ठोक्याला ऑफिसमध्ये हजर राहायचं आणि घरून काम करायचं नाही अशा काही सूचना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना दिल्या आहेत. ही बातमी News 18 वेबसाईटने दिली आहे.

Image copyright Getty Images

नव्या मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मोदींनी मंत्र्यांना या सूचना दिल्याचं समजतं. जेष्ठ मंत्र्यांनी तरुण तसंच पहिल्यांदा मंत्री झालेल्यांना मार्गदर्शन करावं असंही ते म्हटले.

5. भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखांना दिलासा

माओवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेले नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्याविरोधात प्रथमदर्शनी काहीही आक्षेपार्ह दिसत नसल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. तसेच त्यांना असलेले अटकेपासूनचे संरक्षण १८ जूनपर्यंत कायम ठेवले. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

पुण्यातील कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारामागे माओवाद्यांचा हात आहे आणि माओवाद्यांशी नवलखा यांचा संबंध आहे, असा आरोप ठेवत पुणे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. तो रद्द करण्यासाठी नवलखा यांनी रिट याचिका केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने अंतरिम आदेश देत नवलखा यांना ऑक्टोबर-२०१८मध्ये दिलेले अटकेपासूनचे संरक्षण आजतागायत कायम राहिले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)