नाना पाटेकरांशी संबंधित #MeToo प्रकरणी तनुश्रूी दत्ता यांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता Image copyright Getty Images

अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप केला होता.

या आरोपांची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांनी आपला चौकशी अहवाल कोर्टाला सोपवला आहे.

"नाना पाटेकर यांच्याविरोधात तनुश्री दत्ता यांनी केलेल्या आरोपांबाबत मुंबई पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास करणं शक्य नाही," असं मुंबई पोलिसांनी कोर्टात दिलेल्या बी समरीमध्ये म्हटलं आहे. ANI या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

Image copyright TWITTER

परिणामी मुंबई पोलिसांनी नाना पाटेकरांविरोधातील चौकशी पूर्ण केल्याचं बोललं जात आहे.

यावर प्रतिक्रया देताना तनुश्री दत्ता यांनी म्हटलं आहे की, "भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि कायदेशीर यंत्रणेनं अतिभ्रष्ट अशा नाना पाटेकरांना क्लीन चीट दिली आहे. नाना पाटेकरांवर याआधीच लैंगिक छळवणुकीच्या आणि असभ्य वर्तनाच्या तक्रारी आल्या आहेत."

Image copyright TWITTER

तनुश्री यांच्या आरोपांवर आम्ही मुंबई पोलिसांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.

नेमकं प्रकरण काय?

'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या चित्रीकरणा वेळी नाना पाटेकरांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं होतं, असा आरोप तनुश्री दत्ता यांनी केला होता.

नाना पाटेकर हे आता समाजकार्य करताना दिसतात, पण त्यामागे त्यांचा 'हा' चेहरा आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.

तनुश्री यांच्या आरोपांनंतर काही दिवसांनी नाना पाटेकरांनी पत्रकार परिषद घेतली होती.

"तनुश्रीच्या आरोपांना मी दहा वर्षांपूर्वीच उत्तर दिलं आहे. त्यामुळे नवं काही सांगण्याची गरज नाही. दहा वर्षांपूर्वी जे सत्य होतं, ते आजही सत्यच आहे. सत्य हे कायम सत्यच राहतं," इतकीच प्रतिक्रया त्यांनी दिली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)