पश्चिम बंगालमध्ये राहायचं असेल तर बंगाली बोलता आलीच पाहिजे: ममता बॅनर्जी #पाचमोठ्याबातम्या

ममता बॅनर्जी Image copyright Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) बंगालमध्ये राहायचं असेल तर बंगाली बोला - ममता बॅनर्जी

बंगालमध्ये काम करायचं असेल, इथं राहायचं असेल तर बंगाली भाषा बोलता आलीच पाहिजे, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

शुक्रवारी ममता बॅनर्जी बंगालमधल्या 24 परगणा जिल्ह्यात बोलत होत्या तेव्हा त्यांनी हे विधान केलं आहे. तसंच बंगालची गुजरातसारखी परिस्थिती होऊ देणार नाही अस म्हणत बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जेव्हा मी उत्तर प्रदेश, बिहारला जाते तेव्हा तिथली भाषा बोलते तर मग जे लोक इथं येतात त्यांना बंगाली का येऊ नये? असा सवाल त्यांनी केला.

बंगालमध्ये सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या संपामागे भाजप आणि जातीयवादी शक्तींचा हात असल्याचा बॅनर्जी यांनी आरोप केला आहे.

2) महिलांच्या मोफत मेट्रो प्रवासाला श्रीधरन यांचा विरोध

दिल्ली मेट्रोचे माजी प्रमुख ई श्रीधरन यांनी महिलांना मेट्रोतून मोफत प्रवासाच्या योजनेला विरोध दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रस्तावाला विरोध करावा असं आवाहन ई श्रीधरन यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना मेट्रोतून मोफत प्रवासाचा प्रस्ताव ठेवला आहे. जर हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला तर चुकीचा पायंडा पडू शकतो असं ई. श्रीधरन यांचं म्हणणं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ई श्रीधरन

ई. श्रीधरन यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र पत्र लिहिलं आहे. 'जर दिल्ली सरकारला महिलांची मदत करण्याची इतकीच इच्छा आहे, तर महिलांचा प्रवास मोफत करण्याऐवजी त्यांच्या प्रवासाचा खर्च थेट त्यांच्या खात्यात जमा करावा', असं मत ई श्रीधरन यांनी पत्रात लिहिलं आहे.

3) संसदीय राजकारणातून मनमोहन सिंह निवृत्त

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे 28 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीनंतर शुक्रवारी निवृत्त झाले. आजतकनं ही बातमी दिली आहे.

17 जून रोजी संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यावेळी राज्यसभेत मनमोहन सिंह हे दिसणार नाहीत. ते राज्यसभेवर 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

Image copyright Getty Images

माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि डॉ. सिंह यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 21 जून, 1991 रोजी देशाचे अर्थमंत्री म्हणून राव यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेले होते.

4) झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात 5 पोलिसांचा मृत्यू

झारखंडमधील सराईकेला जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे. पोलीस कर्मचारी शुक्रवारी सायंकाळी पेट्रोलिंगसाठी फरत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे.

यातल्या 2 नक्षलवाद्यांनी पोलिसांची शस्त्रे लुटून नेली. हा हल्ला पश्चिम बंगाल आणि झारखंड सीमेवर झाला आहे.

झारखंडच्या मुख्यमंत्री रघुबीर दास यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. सराईकेला येथे आठवडी बाजार सुरू असताना मोटरसायकलवरून आलेल्या माओवाद्यांनी बेछूट गोळीबार केला.

5) सलीम सरदार मुल्ला, सुशील शिंदे यांना साहित्य अकादमी

सुशीलकुमार शिंदे यांच्या 'शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' या काव्यसंग्रहाला यंदाचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच 'जंगल खजिन्याचा शोध' या सलीम मुल्ला यांच्या कादंबरीस बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

शुक्रवारी साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

साहित्य अकादमीचे पुरस्कार 1955पासून दरवर्षी भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना दिले जातात. यात अनुवाद, युवा आणि बालसाहित्य पुरस्कारांचा समावेश आहे.

एकूण 24 भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. यंदा 23 भाषांतील साहित्यासाठी पुरस्कार जाहीर झाले असून मैथिली भाषेतील पुरस्कार जाहीर व्हायचा आहे, असंही या बातमीत म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)