कोलकाता: डॉक्टरांचा संप, राजकारण आणि रुग्णांचे हाल

रुग्ण

पाच दिवसांपासून सुरू असलेला डॉक्टरांचा संप काल संपण्याची चिन्हं निर्माण झाली होती. मात्र डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांचं चर्चेचं आमंत्रण नाकारलं आणि ही आशा मावळली.

ज्या ठिकाणी ज्युनिअर डॉक्टरला मारहाण झाली त्या एनआरएस रुग्णालयात ममता बॅनर्जींनी यावं अशी आंदोलकांची मागणी होती. तसंच गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अर्थातच त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या नसल्यामुळे संप चिघळला आहे.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता बोलावलेल्या बैठकीबाबत डॉक्टरांची मतं विभागलेली दिसत आहेत. तसंच नबन्ना येथे बोलावलेल्या बैठकीत सहभागी व्हायचं की नाही यावर अंतिम निर्णय आज होणार होता.

चिघळतं आंदोलन, राजकारण आणि रुग्णांचे हाल

शहरातल्या पाच प्रतिष्ठित डॉक्टरांनी या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर दोन तास बैठक झाली. त्यानंतर एक ज्येष्ठ अधिकारी चर्चेचं आमंत्रण द्यायला पाठवला गेला.

या सर्व घडामोडी घडत असतानाच राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी हे जखमी ज्युनियर डॉक्टर परिबाहा मुखोपाध्याय यांना एका खासगी रुग्णालयात भेटायला गेले होते.

या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी ममता बॅनर्जींनी कोणतीही पावलं उचलली नाहीत असं त्यांनी नंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं.

तसंच शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ममता बॅनर्जी यांना लिहिलेलं एक पत्र व्हायरल झालं. त्या असं लिहिलेलं आहे की या प्रकरणाचा तोडगा काढण्यासाठी ते ममता बॅनर्जींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत पण ममता बॅनर्जींकडून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळत नाहीये.

14 जूनला ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात हर्षवर्धन यांनी चिघळत चालेलल्या आंदोलनाचा उल्लेख केला आहे. आंदोलनाचं लोण देशभर पसरत आहे. अनेक रुग्णालायातील ओपीडी बंद आहे. त्यामुळे दूरवरून आलेल्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोलकाताच्या नील रतन सरकार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातून सुरू झालेलं हे आंदोलन आधी शहर, आसपासचा भाग आणि नंतर देशाच्या अनेक भागात पसरलं. इतकरंच नाही तर दिल्ली आणि इतर शहरात असलेल्या AIIMS मध्येही या आंदोलनाची धग जाणवली.

सोमवारी देशव्यापी आंदोलन

पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या सरकारी रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये 600 पेक्षा अधिक ज्येष्ठ डॉक्टरांनी कनिष्ठ डॉक्टरांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत. त्याची चर्चा काल दिवसभर होती. मात्र हे राजीनामे अद्याप सरकारने मंजूर केलेले नाहीत.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. आर. वी. अशोकन यांनी सांगितलं की डॉक्टरांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण कराव्यात तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्राच्या पातळीवर एक कायदा आणावा अशी त्यांची मागणी आहे.

खरं तर गेल्या काही दिवसांपासून कोलकाता आणि अन्य दुसऱ्या सरकारी रुग्णालयात आपत्कालीन सेवा बहाल झाल्या आहेत. मात्र एक ज्येष्ठ डॉक्टरने बीबीसीला सांगितलं की ज्युनियर डॉक्टरची सेवा पूर्ववत व्हायला आणखी बराच वेळ लागेल.

कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ज्युनिअर डॉक्टरबरोबर नर्सेसही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. रिया दास त्यांच्यापैकी एक आहेत. आज डॉक्टरांवर हल्ला झाला आहे. असा हल्ला त्यांच्यावरही होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत आहे.

आंदोलनात सहभागी झालेले निवासी डॉक्टर आत्मदीप बॅनर्जी यांच्यामते एनआरएस मध्ये दाखल झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन ट्रकभरून माणसं आली आणि त्यांनी डॉक्टरांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यात एका डॉक्टराच्या कपाळावर गंभीर जखमा झाल्या. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

आत्मदीप बॅनर्जी यांनी सोमवारी झालेली घटना एक कारस्थान असल्याचा आरोप लावला. यामागे कुणाचा हात होता हे बॅनर्जी सांगू शकले नाही.

प्रतिमा मथळा आत्मदीप बॅनर्जी

भाजपचे ज्येष्ठ नेते मुकल रॉय यांनी सांगितलं की, "हा हल्ला एका विशिष्ट गटाने केला आहे. ते तृणमूल पक्षाचे समर्थक आहेत. त्यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला."

ममता बॅनर्जी एनआरएसच्या आंदोलकांकडे जाण्याऐवजी गुरुवारी शहरातील दुसऱ्या रुग्णालयात गेल्या. हा काही लोकांचा कट आहे. त्याला बाहेरचे विरुद्ध स्थानिक अशा साच्यात गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.

निवासी डॉक्टर सयान राय म्हणतात की आम्ही कुणालाही कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करण्यापासून रोखू शकत नाही मात्र आमचं आंदोलन कोणत्याही राजकारणाने प्रेरित नाही. त्यात गुंतण्याचा प्रयत्नही करायला नको.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)