विधानसभेच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळ विस्तार, कोण असणार नवे चेहरे? #पाचमोठ्याबातम्या

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी Image copyright Devendra Fadanvis/Twitter

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार

राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी (16 जून) होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि कोणाची गच्छंती होणार याबद्दल चर्चा सुरू आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांना या विस्तारात मंत्रीपद मिळणार का याबद्दलही उत्सुकता आहे.

News18 लोकमतनं मंत्रिमंडळ विस्तारासंबंधीची बातमी दिली आहे.

राजभवनाच्या दरबार हॉलच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यानं गार्डनवर नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. सध्या मंत्रिमंडळामधील सात जागा रिक्त आहेत.

2. मोदी सरकारचे देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींवर नेण्याचे उद्दीष्ट

भारताची अर्थव्यवस्था 2014 पर्यंत 5 लाख कोटी रुपयांवर नेणं शक्य आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या बैठकीत म्हटलं आहे. लोकसत्तानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

शनिवारी (15जून) नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत देशाचा आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी जिल्हा पातळीपासून प्रयत्न करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

Image copyright Getty Images

देशातल्या अनेक भागात पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना लागू करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला.

गरिबी, बेरोजगारी, दुष्काळ, प्रदूषण, पूर, भ्रष्टाचार आणि हिंसाचार यांच्याशी लढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असं मोदी यांनी या बैठकीत सांगितलं.

3. बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराचा कहर, आतापर्यंत 66 मुलांचा मृत्यू

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजारानं तब्बल 66 मुलांचा बळी घेतला आहे. मुजफ्फरपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मृत्यू झाले आहेत. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इन्सेफेलाईटीसमुळे बिहारमधल्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मृत्यू झाले आहेत.

इथल्या SKSCH या एकाच हॉस्पिटलमध्ये 55 मुलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर केजरीवाल रुग्णालयामध्ये 11 मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Acute Encephalitis Syndrome (AES) या आजारात मुलांना ताप येतो. दरवर्षी अनेक मुलं या तापानं दगावतात. गेल्या वर्षीही या आजाराने 22 मुलांचा मृत्यू झाला होता.

4. रेल्वेत मसाजचा प्रस्ताव मागे

मध्य प्रदेशातल्या इंदूर येथून रवाना होणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना पायाचा आणि डोक्याचा मसाज करण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने शनिवारी मागे घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

हा प्रस्ताव पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने दिला होता. पण, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रस्तावाला नव्याने निवडून आलेले लोकसभेचे खासदार शंकर लालवानी आणि भाजपया च्ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी विरोध केला आहे.

ललवानी यांनी तसं पत्रही रेल्वे खात्याला पाठविल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

5. डॉक्टरांच्या सगळ्या मागण्य मान्य करू, त्यांनी कामावर रुजू व्हावं - ममता बॅनर्जी

आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या सगळ्या मागण्या मान्य करू. आता त्यांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. सकाळनं हे वृत्त दिलं आहे.

कोलकत्यातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ डॉक्टरांवर झालेला हल्ला दुर्दैवी असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलं.

या प्रकरणात आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाहीये. याआधी संपकरी डॉक्टरांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव सरकारनं फेटाळला होता.

ममता बॅनर्जी यांनी माफी मागितली तरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असा पवित्रा डॉक्टरांच्या संघटनांनी घेतला आहे. डॉक्टरांच्या संपामुळं राज्यात रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळं लोकात असंतोष वाढत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)