मंत्रिमंडळ विस्तार: विखे पाटील, आशिष शेलार कॅबिनेट मंत्री; सहा माजी मंत्र्यांची गच्छंती

राधाकृष्ण विखे पाटील Image copyright Getty Images

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे.

अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे. त्यांच्याशिवाय आज मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये भाजप नेते आशिष शेलार, डॉ. संजय कुटे तसंच शिवसेनेचे जय हेही होते.

आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवा कल्याण खातं देण्यात आलं आहे तर कुटे यांच्याकडे कामगार, विमुक्त-भटक्या तसंच इतर मागास आणि विशेष मागास जाती कल्याण, ही खाती देण्यात आली आहेत.

प्रकाश मेहता, दिलीप कांबळे, विष्णू सावरा, राजकुमार बडोले, प्रवीण पोटे या विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे.

हा मंत्रिमंडळ विस्तार 10+2+1 अशा फॉर्म्युल्यानुसार झाला आहे. म्हणजेच यात भाजपच्या 10, शिवसेनेच्या 2 आणि RPIच्या एका मंत्र्याचा शपथविधी पार पडला.

भाजपकडून डॉ. अनिल बोंडे, सुरेश खाडे, डॉ. अशोक उईके यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेच्या तानाजी सावंतांनाही कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं.

भाजपचे योगेश सागर, संजय भेगडे, अतुल सावे, परिणय फुके यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आरपीआयच्या अविनाश महातेकर यांनाही राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

कालच्या मंत्रिमंडळात विस्तारात शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावं आणि खातेवाटप एका दृष्टिक्षेपात

नाव (पक्ष) खातं
राधाकृष्ण विखे पाटील (सध्या भाजपात अधिकृत प्रवेश नाही) गृहनिर्माण
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) रोजगार हमी आणि फलोत्पादन
आशिष शेलार (भाजप) शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण
संजय कुटे (भाजप) कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण
सुरेश खाडे (भाजप) सामाजिक न्याय
अनिल बोंडे (भाजप) कृषी
अशोक उईके (भाजप) आदिवासी विकास
तानाजी सावंत (शिवसेना) जलसंधारण
योगेश सागर (भाजप) नगरविकास (राज्यमंत्री)
अविनाश महातेकर (रिपाईं) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य (राज्यमंत्री)
संजय भेगडे (भाजप) कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पूनर्वसन (राज्यमंत्री)
डॉ. परिणय फुके (भाजप) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) वने, आदिवासी विकास (राज्यमंत्री)
अतुल सावे (भाजप) उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ (राज्यमंत्री)

राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचे पुत्र सुजय यांना लोकसभेसाठी नगरमधून काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी भाजपकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळेपासूनच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा रंगल्या होत्या. त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला नसला तरी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेतेचं सत्ताधारी पक्षात सहभागी झाल्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे

"कोणतही काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं करण्याची माझी भूमिका असते. कॉंग्रेस पक्षानं माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली होती. आता मुख्यमंत्र्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती सुध्दा मी प्रामाणिकपणे पाडेन," अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.

"फडणवीस सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहे. त्यामुळे सरकारला विरोध करण्यापेक्षा सरकारमध्ये जाऊन अधिक चांगलं काम करता येईल," असं विखे पाटील यांनी म्हटलं.

मला भाजपकडून पूर्वीपासून मंत्रिपदाची ऑफर नव्हती. डॉ. सुजय विखेंनी जो निर्णय घेतला आणि त्यांना निवडून देऊन लोकांनी त्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं, त्यानंतर मी हा विचार केल्याचं विखे यांनी बीबीसीला सांगितलं.

विधानसभेसाठी कोठून लढणार याविषयी बोलताना विखे यांनी सांगितलं, की माझ्या जागेबाबत उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री बसून निर्णय घेतील. मी आता युती बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ती भूमिका कायम राहील.

आशिष शेलारांना संधी

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे या मंत्रिमंडळ विस्तारातलं अजून एक महत्त्वाचं नाव आहे.

आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेच्या बरोबरीचं यश मिळालं. लोकसभेच्या निवडणुकीतही मुंबईमध्ये भाजपची संघटनेवरची मजबूत पकड दिसून आली. त्यामुळे शेवटच्या टप्यात आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं गेलं.

रविवरी उशिरा आलेल्या यादीत त्यांच्याकडे शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवा कल्याण खातं देण्यात आलं आहे, असं दिसतंय.

Image copyright ASHSH SHELAR/FACEBOOK

मंत्रिपद मिळाल्यानंतर आशिष शेलार यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला. "मला दिलेलं हे पद नसून एक मोठी जबाबदारी आहे, असं मी मानतो. कमी कालावधीत वेगानं काम करणं माझी खासियत आहे. मी ते करेनच."मंत्रिपद मिळायल्यानंतर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी राहणार का याबद्दल बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं, की मी मुंबई अध्यक्ष पदावर राहीन की नाही हा निर्णय वरिष्ठांचा आहे. ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल.

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना

शिवसेनेतर्फे जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. क्षीरसागर हे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर विरोधक आणि मराठवाड्यातले महत्त्वाचे नेते मानले जातात.

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह क्षीरसागर यांना मंत्रिमंडळात घेतल्याने मुंडे विरूध्द मुंडे लढाईत युतीचं पारडं जड राहील. तसंच रिपाईतर्फे अविनाश महातेकर यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे.

प्रकाश मेहतांची गच्छंती

एम. पी मिल कंपाऊंड SRA घोटाळ्याच्या आरोपांमुळे प्रकाश मेहतांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. विधिमंडळात या घोटाळ्याचे आरोप झाल्यावर मुख्यमंत्र्यांना हे अवगत आहे, असा शेरा फाईलवर मारला होता पण मुख्यमंत्र्यांनी त्याला नकार दिला.

Image copyright facebook@Prakash Mehta

मुख्यमंत्र्यांच्या क्लिन इमेजला मेहतांमुळे धक्का लागला. त्यामुळे मेहता यांच्या जाण्याची चर्चा आहे.

ज्या मंत्र्यांची गच्छंती झाली त्यांची नावं आणि खाती एका दृष्टिक्षेपात

मंत्री (पक्ष) खातं
प्रकाश मेहता (भाजप) गृहनिर्माण
विष्णू सावरा (भाजप) आदिवासी विकास मंत्री
राजकुमार बडोले (भाजप) सामाजिक न्याय मंत्री
प्रवीण पोटे पाटील (भाजप) सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
राजे अंबरिश आत्राम (भाजप) आदिवासी विकास राज्यमंत्री
दिलीप कांबळे (भाजप) सामाजिक न्याय राज्यमंत्री

'निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विस्तार'

आज होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला आहे अस राजकीय विश्लेषक अभय देशपांडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

"आज समावेश झालेल्या मंत्र्यांना जेमतेम दोन महिने मिळतील. त्यामुळे प्रशासनाच्या पातळीवर फारसं त्याचं महत्त्वाचं नाही. कारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल. ज्यांना गेल्या चार वर्षांत संधी मिळाली नाही त्यांना निवडणुकीच्या तोंडावर संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. तसंच विरोधी पक्षातून आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एकूणच हा निर्णय राजकीय आहे."

"लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला 227 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. विधानसभेतही त्यांना मिळेल असा विश्वास आहे. तरी हा विश्वास आणखी दृढ करण्यासाठी विस्तार केला जात आहे." देशपांडे पुढे सांगत होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)