महाराष्ट्रात MBBSच्या तीन हजार जागा वाढणार, केंद्र सरकारची मंजुरी #5मोठ्याबातम्या

डॉक्टर Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. महाराष्ट्रातल्या MBBSच्या जागा वाढणार

महाराष्ट्रातील डॉक्टरांची संख्या लक्षात घेता MBBSची प्रवेश क्षमता वाढवणे गरजेचं असल्यानं राज्य सरकारने त्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला सादर केला होता. त्याला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजुरी दिल्याचं ABPमाझाच्या बातमीत म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील शासकीय आणि खासगी महाविद्यालयात MBBSच्या एकूण 3,670 वाढवण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 2,020 तर सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीय समाजासाठी (SEBC) 1,650 जागा वाढवण्यात येणार आहेत, असंही या बातमी म्हटलं आहे.

त्याचबरोबर राज्यात 7 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये देखील सुरू होणार आहेत. महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण विभागासाठी काही प्रस्ताव गिरीश महाजन यांनी डॉ. हर्षवर्धन यांना सादर करुन यावर सविस्तर चर्चा केली.

2. पश्चिम बंगालचे नेतृत्व मानसिक धक्क्यात- मोहन भागवत

निवडणूक युद्ध नाही, तर स्पर्धा असते. नागरिकांनी मतांचा कौल दिल्यानंतर राजकारणातली स्पर्धा संपते. मात्र सध्याच्या परिस्थितीत पश्चिम बंगालच्या राजकीय नेतृत्वाला पराजय सहन झाला नसून ते मानसिक धक्क्यात असल्याचं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

ते नागपूरमध्ये RSSच्या एका कार्यक्रमता बोलत होते. सकाळनं ही बातमी दिली आहे.

Image copyright RSS

भारताचा विकास होऊ नये म्हणून अनेक राष्ट्रे कार्यरत आहेत. त्यामुळे प्रगती होत असताना देशातल्या हिंसाचाराला आळा घातला पाहिजे, असंही ते म्हणाले. डॉ. आंबेडकरांनीही संविधान सभेच्या एका भाषणात हाच इशारा दिला होता याची भागवत यांनी आठवण करून दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीयवर्ष संघशिक्षा प्रशिक्षण वर्गाचा रविवारी रेशीमबागेतल्या स्मृती मंदीर परिसरात झाला.

3. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारच्या कार्यकाळातील पहिले संसदीय अधिवेशन सोमवारपासून (17 जून) सुरू होत आहे. 5 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

यावेळी हंगामी अध्यक्ष वीरेंद्र कुमार 17 आणि 18 जून या दोन दिवसांमध्ये नव्या खासदारांना सदस्यत्वाची शपथ देतील. 19 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. 20 जून रोजी राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. त्यानंतर संसदेचे कामकाज सुरू होईल. हे अधिवेशन २६ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

Image copyright AFP

545 सदस्यांच्या लोकसभेत भाजपप्रणित 'एनडीए'चे 353 खासदार असून त्यात भाजपचे 303 खासदार आहेत. प्रमुख विरोधक काँग्रेसचे संख्याबळ जेमतेम 52 इतके आहे. लोकसभेत केंद्र सरकारकडे बहुमत असले तरी राज्यसभेत विरोधी पक्षांची सदस्य संख्या अधिक आहे.

4. देशभरातले डॉक्टर सोमवारपासून संपावर

कोलकात्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी Indian Medical Associationनं (IMA) आज (सोमवारी) संपाची हाक दिली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

डॉक्टरांवर सतत होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करण्यासह डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA)माजी सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी केली आहे.

Image copyright AIIMS RDA

या संपामुळे सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा असे 24 तास ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद राहतील.

MARD, परिचारिका संघटना, रेडिओलॉजी असोसिएशन यांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे.

सरकारी रुग्णालयांची वैद्यकीय सुविधा सुरळीत सुरू राहणार असली तरीही या वेळेमध्ये डॉक्टर काम करताना काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा देणार आहेत, असंही या बातमीत म्हटलं आहे.

5राजस्थानची सुमन राव झाली मिस इंडिया 2019

राजस्थानच्या सुमन रावने फेमिना मिस इंडिया 2019चा किताब जिंकला आहे. 22 वर्षीय सुमनला मिस इंडिया 2018च्या अनुकृती दासने ताज घातला. Network18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

मुंबईच्या सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत हुमा कुरेशी, चित्रंगदा सिंग, रेमो डिसूजा, विकी कौशल आणि आयुष शर्मा, मिस वर्ल्ड 2018 वेनेसा पोंसे, शहाने पिकॉक, मुकेश छाबरा हे सेलिब्रिटी उपस्थित होते.

सुमन सध्या सीएच्या परीक्षेची तयारी करत आहे. सुमनला गेल्या वर्षी या किताबानं हुलकावणी दिली होती. गेल्या वर्षी ती उपविजेती ठरली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)