कोलकातामध्ये जादूगार मँड्रेकचा मृत्यू: स्वतःला बांधून हुगळी नदीत गेलेल्या जादूगाराचा मृतदेहच बाहेर आला

जादूगार Image copyright PTI

हॅरी हाऊडिनी हा जादूगार स्वतःचे हात-पाय बांधून नदीत उडी मारायचा आणि काही वेळाने स्वतःच बाहेर पडायचा. त्याची ही जादू करण्याचा प्रयत्न कोलकात्याच्या एका जादूगाराच्या अंगावर बेतला.

कोलकात्याचे जादूगार चंचल लाहिरी हे मँड्रेक म्हणूनही ओळखले जायचे. रविवारी लाहिरींना एका बोटीतून हुगळी नदीच्या पाण्यात सोडण्यात आलं होतं.

सहा कुलुपं आणि साखळ्यांनी त्यांचे हातपाय बांधण्यात आले होते. दोन बोटींवर असलेल्या बघ्यांच्या समोर त्यांना नदीमध्ये सोडण्यात आलं. अनेक लोक नदी किनाऱ्यावर आणि कोलकात्याच्या प्रसिद्ध हावडा ब्रिजवर उभी राहून हा प्रकार पाहत होते.

पाण्याखाली स्वतःला सोडवून त्यांनी किनाऱ्यावर सुरक्षित परतणं अपेक्षित होतं. पण बराच काळ वाट पाहूनही ते बाहेर पडण्याची लक्षणं न दिसल्यावर उपस्थित लोकांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली.

कोलकाता पोलिसांनी आणि स्कूबा डायव्हर्सच्या पथकांनी हा भाग पिंजून काढला. लाहिरी यांचा मृतदेह जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत त्यांना मृत घोषित करण्यात येणार नसल्याचं एका अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

चंचल लाहिरींचा बराच काळ शोध घेतला आणि अखेर सोमवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडला, अशी माहिती कोलकाता पोलीसचे बंदर विभागाचे उपायुक्त सयद वकार रझा यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितलं.

स्थानिक वर्तमानपत्रामध्ये फोटोग्राफर असणाऱ्या जयंत शॉ यांनी लाहिरींना हा प्रकार करताना पाहिलं होतं. त्यांनी आपल्या अॅक्टला सुरुवात करण्याआधी आपण त्यांच्याशी बोलल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

Image copyright EI SAMAY

"ते जादूसाठी आपला जीव का धोक्यात घालत असल्याचं मी त्यांना विचारलं, ते (लाहिरी) हसले आणि म्हणाले, 'जर मी हे करू शकलो तर ते मॅजिक (जादू) असेल, नाहीतर ते ट्रॅजिक (दुःखद) असेल'," शॉ सांगतात. "लोकांना जादूमध्ये पुन्हा रस वाटावा म्हणून आपण हे करतो," असं जादूगार लाहिरींनी सांगितल्याचं शॉ म्हणतात.

पण लाहिरींनी अशी पाण्याखालची धोकादायक जादू करण्याचा पहिल्याच प्रयत्न केला होता, असं नाही. 20 वर्षांपूर्वी एका काचेच्या बॉक्समध्ये बंदिस्त करून त्यांना याच नदीमध्ये सोडण्यात आलं होतं. पण तेव्हा मात्र त्यांना स्वतःची सुखरूप सुटका करून घेणं जमलं होतं.

शॉ यांनी लाहिरी यांची आधीची पाण्याखालची जादू पाहिलेली होती. "यावेळी ते पाण्याबाहेर येणार नाहीत, असा विचारही मला कधी आला नाही," ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)