ओम बिर्ला : लोकसभा सभापतिपदी बिनविरोध निवड, काँग्रेस-तृणमूल काँग्रेसचाही पाठिंबा

ओम बिर्ला Image copyright Getty Images

भाजपचे नेते ओम बिर्ला यांची सतराव्या लोकसभेच्या सभापतिपदी निवड झाली आहे. बिर्ला यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्लांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या पक्षांनीही ओम बिर्लांच्या नावाला समर्थन दिलं.

शिवसेना, बीजू जनता दल, लोक जनशक्ती पार्टी, अकाली दल, अपना दल, मिझो नॅशनल फ्रंट, AIADMK, YSR काँग्रेस या पक्षांनीही बिर्लांच्या नावाला पाठिंबा दिला.

बिनविरोध निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओम बिर्लांचं अभिनंदन केलं. सभागृहासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं.

'विद्यार्थी नेता म्हणून ओम बिर्लांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. तेव्हापासून आजतागायत ते समाजासाठी काम करत आहेत,' या शब्दांत मोदींनी बिर्लांच्या कामाचा गौरव केला.

मंगळवारी (18 जून) सकाळपासूनच सभापतिपदासाठी बिर्ला यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यावेळी त्यांच्या पत्नी अमिता यांनी हा आमच्यासाठी आनंद आणि अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या निवडीबद्दल अमिता यांनी सरकारचे आभारही मानले.

ओम बिर्ला यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रामनारायण मीणा यांचा पराभव केला होता. त्यांनी मीणा यांना अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत केलं. ओम बिर्ला हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते तीन वेळा आमदारही होते.

Image copyright OM BIRLA

भाजपच्या युवा मोर्चापासून सुरूवात करणारे ओम बिर्ला हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळच्या वर्तुळातले मानले जातात.

याआधी सुमित्रा महाजन यांनी सोळाव्या लोकसभेचे सभापतिपद भूषवलं होतं. महाजन यांनी सध्या सक्रिय राजकाणातून निवृत्ती घेतली आहे.

कोण आहेत ओम बिर्ला?

कोटा एक औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं होतं. कामगारांची आंदोलनं आणि मोर्चांसाठी हे शहर प्रसिद्ध होतं. या आंदोलनात काही शाळकरी विद्यार्थ्यांच्या संघटना सहभागी व्हायच्या. त्यात ओम बिर्ला हेही सहभागी व्हायचे.

त्या काळात कोटा शहरात गुमनामपुरा सिनियर सेकेंडरी स्कूल या विद्यार्थी संघटनेचे ते प्रमुख होते. त्यानंतर बिर्ला स्थानिक कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढले पण फक्त एका मताने पराभूत झाले. हा पराभव विसरून ते काम करत राहिले आणि नंतर कोटाच्या सहकारी ग्राहक भांडार संघाचे अध्यक्ष झाले. सार्वजनिक राजकारणात हा त्यांचा प्रवेश होता.

बिर्ला हे संधीचं सोनं करून चांगलं काम करणारे आहते, असं त्यांचे काही सहकारी सांगतात. "बिर्ला हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असले तरी ते राजकारणाचे उत्तम जाणकार आहेत. विद्यार्थी चळवळीतून विधानसभा आणि त्यानंतर लोकसभेपर्यंतचा प्रवास केलेले ते एक परिपक्व नेते आहेत."

Image copyright OM BIRLA

पक्षाच्या निवडणुकांचं नियोजन आणि बूथस्तरावर सर्व संघटनाबांधणीसाठी बिर्ला ओळखले जातात. ते राजस्थान भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि त्यानंतर मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुद्धा राहीले आहेत.

दक्षिण कोटा मतदारसंघाचे आमदार आणि भाजप नेते संदीप शर्मा यांच्यावर बिर्लांचा खूप प्रभाव आहे. शर्मा सांगतात, "बिर्ला हे आपल्या लोकांसाठी नेहमी उपलब्ध असतात. अर्ध्या रात्रीसुद्धा जर कुणी फोन केला तर ते फोन उचलण्यास तत्पर असतात. जरी कुणी काही चुकीचं वागत असेल किंवा रागारागात बोलत असेल तरी ते शांतपणे ऐकून घेतात. ते आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी प्रोत्साहित करतात. बिर्ला हे कामात सक्रिय असल्यामुळे अनेक संस्थांमध्ये मोठ्या पदांवर पोहोचले आहेत."

कोटामध्ये पक्षात काम करणारे त्यांचे सहकारी प्रेम कुमार सिंह सांगतात, "अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे बिर्ला हे इतर लोकांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांच्यात विरोधी मत ऐकण्याची क्षमता आहे. ते सहिष्णू आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे की विद्यार्थी संघनटनेपासून संसदेच्या सभापतिपदापर्यंत पोहोचले. हेच आपल्या लोकोशाही व्यवस्थेचे यश आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)