बालभारती नवीन अभ्यासक्रम : गणित सोपं करण्यासाठी भाषेत बदल करणं योग्य?

शाळा Image copyright Rajshree auti

गेल्या तीन दिवसांपासून आपण संख्या वाचनाच्या नवीन पद्धतीबद्दल वाचत आहोत, बोलत आहोत. सोशल मीडियावरही अनेक गंमतीशीर मेसेज फिरत आहेत.

बालभारती या शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन संस्थेनं इयत्ता दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकात संख्या वाचनात नवीन पद्धत आणली आहे. संख्या लिहिणं आणि वाचणं यात गल्लत होऊ नये हा त्यामागचा उद्देश असल्याचं गणित विषय समितीच्या अध्यक्ष मंगला नारळीकर यांनी म्हटलं आहे.

त्यांनी सांगितलं, "ग्रामीण भागात जिथे पालक अशिक्षित आहेत, अशा घरातील मुलांना 52 ही संख्या बावन्न अशी कळत नाही. ती मुलं 25 लिहितात. त्याचबरोबर एकतीस म्हटलं तर 31 असं लिहिण्या ऐवजी 13 लिहिलं जातं. म्हणजेच लिखाणाप्रमाणे वाचन होत नाही. अनेक भागात व्यवहारात 50 आणि 3 म्हणतात."

गणितातील संख्यावाचन सदोष असल्याचं गणिताचे शिक्षक नागेश मोनेही सांगतात.

त्यांच्या मते, "नवीन पद्धत यायला हवी. पण ती ऐच्छिक ठेऊ नये. ही पद्धत 21 ते 99 या संख्येपर्यंत आहे."

नवीन पद्धतीनुसार गणिताच्या पुस्तकात 21 = वीस आणि एक, एकवीस असं लिहिलेलं आहे. यामुळे गोंधळ होणार नाही, असं तज्ज्ञ समितीचं म्हणणं आहे.

वाचनाच्या जुन्या पद्धतीत संस्कृतप्रमाणे वाचन आणि इंग्रजीप्रमाणे लिखाण होत असे.

"अंकानां वामतो गति : l " म्हणजे संख्या वाचताना डावीकडून वाचायची.

उदाहरणार्थ : 31 = एक त्रिंशत. मराठीमध्ये आपण 'एकतीस' वाचतो.

संस्कृतमध्ये इसवी सन संदर्भात येणारे ऐतिहासिक संदर्भ वाचनाची पद्धत

1857 = सप्त पंच अष्ट एक

संस्कृत भाषेच्या संख्यावाचनाचा परिणाम सगळ्या भाषांवर असल्याचं संस्कृतच्या शिक्षिका सुवर्णा बोरकर सांगतात.

'बदल त्रासदायक असतो'

बालभारतीच्या गणित समितीचे माजी सदस्य मनोहर राईलकर यांच्या मते " संख्या वाचन बदल खूप गरजेचा आहे. लहान मूल आधी संख्येकडे पाहतं, आकलन करतं आणि मगच संख्या म्हणतं किंवा लिहितं. मात्र जर लिहिणं आणि वाचनं यात फरक असेल तर मुलं गोंधळतात. त्यामुळे 21 ही संख्या वीस आणि एक अशी लिहिणं त्यांच्यासाठी सोपं आहे. मात्र ही मुलं जेव्हा व्यवहार करतील तेव्हा त्यांचा गोंधळ उडेल. त्यावेळेस हा बदल त्रासदायक ठरेल."

Image copyright Rajshree auti

पुण्यातील सदाशिव गोळवलकर शाळेत गणिताच्या शिक्षिका राजश्री औटी मुलांना तीन पद्धतीनं गणित शिकवतात. त्याची प्रात्यक्षिकं घेतात. मुलांना एकक, दशक, शतक या संकल्पना समजावण्यासाठी तिन्ही पद्धती वापरल्या जातात.

नवीन पद्धत आली तरी आम्हाला त्रास होणार नाही, असं त्या म्हणतात.

"21 ही संख्या एकवीस , वीस एक, दोन दशक एक या सगळ्या पद्धतीने शिकवली जाते. केवळ नवी पद्धतच शिकलेली मुल व्यवहारासाठी बाहेर पडली, तर त्यांचा गोंधळ होऊ शकेल," असं राजश्री यांना वाटतं.

'जुनी पद्धत योग्य'

अनेक पालकांना नवीन पद्धत अडचणीची वाटतेय.

अर्चना शाळिग्राम सांगतात, की जुन्या पद्धतीनं असलेली वाचनाची पद्धत योग्य आहे. मुलांना मराठी माध्यमात शिक्षण घेता यावं, यासाठी आम्ही परदेशातून पुण्यात आलो. नव्या पद्धतीनं मुलांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी भीती वाटते.

जोडाक्षरं हा भाषेचा महत्वाचा भाग आहे आणि तो असायला हवाच, असंही त्या म्हणतात.

Image copyright Rajshree auti

जोडाक्षरांची भीती कमी व्हावी हा देखील या समितीचा उद्देश होता.

आता 67 (सदुसष्ट) ऐवजी साठ सात असं वाचलं जाईल. ही पद्धत पहिलीत देखील होती. आता हीच मुलं दुसरीत आहेत, पुढे तिसरीत देखील बदल करण्याचा विचार समिती करत आहे.

"नवीन पद्धतीत जोडाक्षर न येणं हा त्या पद्धतीमुळे होणारा अतिरिक्त फायदा आहे. पण जोडाक्षरे नको म्हणून ही पद्धत नाही," असं मत मनोहर राईलकर मांडतात.

'नवीन पद्धत नकोच'

आखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी वाचनाच्या नवीन पद्धतीला विरोध केला आहे.

त्यांनी सांगितलं, "मराठीची परंपरा मोडीत काढत, तिचे अकारणच इंग्रजीकरण करत, जोडाक्षरे कठीण असल्याच्या आणि सोपेपणाच्या नावाखाली मराठीशी खेळण्याचा हा उद्योग शिक्षणमंत्र्यांनीच हस्तक्षेप करून त्वरीत थांबवायला हवा.

"भाषा आणि गणित यांच्या नात्याबद्दल जगभरात अनेक संशोधनं उपलब्ध आहेत. आपल्या मुलांच्या निव्वळ प्रयोगशाळा करण्याआधी त्यातल्या कोणत्या संशोधनाच्या आधारे हे निर्णय लादले जात आहेत, ते स्पष्ट व्हावं. हा विषय गणिताचा कमी संख्यावाचन कौशल्याचा अधिक आहे. ती कौशल्ये गणितीय नंतर व भाषिक अगोदर आहेत. कारण विषय कोणताही असो विचार स्वभाषेतच चालतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)