वर्ल्ड कप 2019: शिखर धवन बाहेर, ऋषभ पंतच्या समावेशाने संघाला किती फायदा?

शिखर धवन, ऋषभ पंत, भारत, वर्ल्ड कप 2019 Image copyright Twitter
प्रतिमा मथळा हाताच्या बोटाला झालेली दुखापत गंभीर असल्याने शिखर धवनऐवजी आता ऋषभ पंतला वर्ल्ड कपसाठी संधी मिळाली आहे.

हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर असलेला टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन आता संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकणार नाही. शिखरऐवजी ऋषभ पंतला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे.

ICCतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये दमदार कामगिरीचा रेकॉर्ड असलेल्या शिखरला 'मिस्टर ICC' म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत शिखरने शतकी खेळी साकारत या बिरुदावलीला न्याय दिला होता.

मात्र याच मॅचमध्ये पॅट कमिन्सचा उसळता चेंडू शिखरच्या हाताच्या बोटाला लागला. या दुखापतीवर मैदानात उपचार करण्यात आले. मात्र शिखर फील्डिंगसाठी मैदानात उतरला नाही.

या दुखापतीमुळे शिखर किमान तीन आठवडे खेळू शकणार नाही, असे संकेत आधी मिळाले होते. मात्र शिखरच्या दुखापतीसंदर्भात इंग्लंडमधील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला.

टीम मॅनेजर संजय सुब्रमण्यम यांनी शिखरच्या दुखापतीसंदर्भात घोषणा केली, तो क्षण.

शिखर सेमी फायनल आणि फायनल या टप्प्यासाठी फिट होईल, असा विश्वास कर्णधार विराट कोहलीसह संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला होता.

मात्र शिखरची दुखापत गंभीर असून, त्यातून पूर्णपणे सावरण्यास 15 जुलैपर्यंतचा कालावधी लागेल, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केल्याने तो उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऋषभ पंत

दरम्यान, इंज्युरी कव्हर म्हणून विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत इंग्लडला रवाना झाला होता. शिखर खेळू शकणार नसल्याने आता ऋषभचा भारतीय संघात अधिकृतरीत्या समावेश होईल.

ऋषभचा रेकॉर्ड काय?

ऋषभने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी शतक झळकावलं होतं. मात्र ऋषभच्या नावावर फक्त 5 वनडेंचा अनुभव आहे.

ऋषभच्या समावेशासह टीम इंडियात महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक आणि पंत असे तीन विकेटकीपर बॅट्समन झाले आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा के.एल. राहुल

शिखरच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलला चौथ्या क्रमांकावरून सलामीला बढती देण्यात आली आहे. 16 जूनच्या पाकिस्तानविरुद्ध राहुलने 57 धावांची खेळी केली.

राहुल सलामीला येणार असल्याने बहुचर्चित चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता. पाकिस्ताननविरुद्ध विजय शंकरला संधी देण्यात आली.

मोठी धावसंख्या करायची असल्याने चौथ्या क्रमांकावर विजयऐवजी हार्दिक पंड्याला पसंती देण्यात आली. हार्दिकने 19 चेंडूत 26 धावा केल्या. विजयने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 15 चेंडूत 15 धावा केल्या.

गोलंदाजी करताना विजयने पहिल्याच चेंडूवर इमाम उल-हकला बाद करत निर्णायक भूमिका बजावली. नंतर त्यानेच पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदलाही तंबूचा रस्ता दाखवला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विजय शंकर आणि ऋषभ पंत यांच्यात चौथ्या स्थानासाठी चुरस आहे.

शिखर स्पर्धेबाहेर गेल्याने चौथ्या स्थानासाठीची चुरस आणखी रंगतदार झाली आहे.

दिनेश कार्तिककडे वीसहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. विजय शंकर गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही आघाड्यांवर चमकतो आहे. ऋषभ पंतकडे अनुभव नसला तरी कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.

अशा परिस्थितीत चौथ्या स्थानासाठी या तिघांमध्ये चुरशीचा मुकाबला रंगणार आहे. खेळपट्टी फलंदाजीला साथ देणारी असेल तर ऋषभ अंतिम अकरात येऊ शकतो. खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असेल तर विजय संघात कायम राहू शकतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)