शिवसेना वर्धापन दिन: मुख्यमंत्री फडणवीस - वाघ आणि सिंह एकत्र आले तरी जंगलाचा राजा ठरलेला असतो

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे Image copyright Twitter / ShivSena
प्रतिमा मथळा देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे

दोन भाऊ एकाच घरात राहतात तेव्हा कधीकधी थोडा ताणतणाव होतोच. पण प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांच्या मनात असं होतं की हा ताणतणाव दूर व्हावा. म्हणून आम्ही भारताकरिता आणि महाराष्ट्राकरता एकत्र आलो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

जेव्हा वाघ आणि सिंह एकत्र येतो, तेव्हा जंगलात कोण राज्य करणार, हे सांगावं लागत नाही. जंगलाचा राजा ठरलेला असतो. त्यामुळे महाराष्ट्राने एक अभूतपूर्व असा कौल दिला, असं ते मुंबईत बुधवारी संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख "माझे मोठे बंधु" असा केला.

उद्धव ठाकरे यांनीही मधल्या काळात भाजपबरोबर निर्माण झालेला दुरावा आम्ही दूर केलाय, असं सांगितलं. पण विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या या महत्त्वाच्या समारंभात बोलताना, समजा मुख्यमंत्रिपद नाही दिलं तर? असा प्रश्न विचारला असता, "अरे तेव्हा आम्ही बघू ना काय करायचं ते..." असं उत्तर दिलं.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

भाजप-शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला होता, मात्र आता तो दूर झाला आहे. मी इकडे बाळासाहेबांचा आशिर्वाद घेण्यासाठी, उद्धवजीचं प्रेम घेण्यासाठी अणि शिवसैनिकांकडून ऊर्जा घेण्यासाठी आलोय, असं म्हणत त्यांनी मला शिवसेनेच्या कार्यक्रमला येताना कधी वेगळं वाटत नाही आहे, असं सांगितलं.

"निवडणुका येतात जातात पण आपण एकत्र राहाणार आहे. आम्ही भगव्यासाठी लढतोय. या एका झेंड्याखाली आपण एकत्र आलो आहेत. आम्ही एकत्र आलोय ते हिंदुस्थान आणि महाराष्ट्रासाठी आलो आहेत," असं ते म्हणाले.

Image copyright Twitter / ShivSena
प्रतिमा मथळा देवेंद्र फडणवीस

लोकसभेत युतीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रात आता न भूतो असा विजय आपल्याला विधानसभेत मिळणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, युतीचा विधानसभेत विजय झाला तर मुख्यमंत्री कोण, हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे. यावर फडणवीस म्हणाले, "ही चर्चा मीडियाला चघळू द्या. आम्हाला या पदांसाठी सत्ता नकोय. महाराष्ट्रात बहुमतात निवडून येणं हे महत्त्वाचे आहे. उध्दवजी आणि आमचं सगळं योग्य पध्दतीने ठरलंय. योग्यवेळी योग्य निर्णय सांगायचे असतात. सगळेच निर्णय आता सांगायचे नसतात. कुणाला काय बोलायचं असेल तर बोलू दे... मीडियाला रोज एक प्रश्न लागतो. त्यांना चर्चा करू दे."

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

यानंतर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबरचे वाद मुलभूत प्रश्नांवर होते. चर्चेतून माझ्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे आता भांडणाचा विषयच संपलाय, असं सांगितलं.

"मुख्यमंत्री साहेब, आपल्यात एक मोकळं-ढाकळं वातावरण असलं पाहिजे. हे शिवसैनिक आहेत. प्रेम केलं तर असं करतील की सगळं देऊन टाकतील, पण लढायला लागले तर लढवय्यासारखे लढतात.

Image copyright Twitter / ShivSena
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे

नरेंद्र मोदी बहुमतात पंतप्रधान झाले. त्यात आमच्या शिवसेनेचाही सिंहाचा वाटा आहे, हे नमूद करायला ते विसरले नाहीत.

एका युतीची ही पुढची गोष्ट आहे, असं सांगत, "मुख्यमंत्रीजी, तुम्हीही कार्यक्रम घ्या. मी तिथे येऊन बोलतो. कसं सगळं समसमान झालं पाहिजे," असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)