मुझफ्फरपूरची बातमी देताना टीव्ही माध्यमांनी लक्ष्मणरेषा ओलांडली का?

बिहार Image copyright Getty Images

बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यामध्ये 100 पेक्षा जास्त मुलांचा अकाली मृत्यू झाल्याने सरकार आणि समाजव्यवस्थेवर ताशेरे ओढण्यात येत आहेत.

कुपोषण आणि भुकेमुळे मुलं एन्सिफिलायटिस नावाच्या रोगाची शिकार ठरली. बळींचा आकडा ज्या झपाट्याने वाढतोय ते घाबरवणारं आहे.

पण मीडियानेही हे सगळं प्रकरण ज्या प्रकारे हाताळलं, सर्वांसमोर मांडलं, ते देखील तितकंच विचलित करणारं आहे.

विशेषतः न्यूज चॅनल्सवर टीका करण्यात येतेय. असं म्हटलं जातंय की इतक्या दुःखद घटनेचं कव्हरेज करताना न्यूज चॅनल्सनी थोडीही संवेदनशीलता दाखवली नाही.

अनेक टीव्ही पत्रकारांनी पत्रकारितेमधील नैतिकता आणि मूल्यांची पर्वा न करता लक्ष्मणरेषा पुन्हापुन्हा ओलांडल्याची चर्चा होत आहे.

त्यांना ना रुग्णांविषयी सहानुभूती होती ना त्यांच्या खासगी क्षणांविषयी आदर. इतकंच नाही तर त्यांना त्यांच्या पेशाच्या विश्वासार्हतेचीही पर्वा नव्हती.

हे करणं आपलं कर्तव्य आहे याची न्यूज चॅनलच्या पत्रकारांना अचानक जाणीव झाली आणि हे कव्हरेज करण्यासाठी ते तुटून पडले. चांगली गोष्ट इतकीच ही घटना त्यांना कव्हरेज करण्यालायक वाटली.

शिवाय यातही तथ्य आहे की त्यांच्यामुळे स्थानिक प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार कामाला लागलं.

गरजेपेक्षा जास्त आक्रमक

हे कव्हरेज करताना न्यूज चॅनल्सची संख्या गरजेपेक्षा जास्त होती आणि त्यात एक प्रकारचा उन्माद होता.

Image copyright STR/AFP

न्यूज चॅनल्सची आपसांत सुरू असलेली स्पर्धा सगळ्यांनाच जाणवली. एकमेकांना मागे टाकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी पत्रकार तयार होते.

एका पत्रकाराने आयसीयूमध्ये घुसत तिथली परिस्थिती काय आहे, उपचारांसाठी उपकरणं नाहीत, आवश्यक ती काळजी घेतली जात नाही हे उघडकीला आणलं, हे जरी मान्य केलं, तरी हे पाहून दुसऱ्या पत्रकाराला आयसीयूमध्ये घुसत स्वतःचं शौर्य दाखवण्यासाठी कामात अडथळा आणायची काय गरज होती?

सॉफ्ट टार्गेट

हे लोकप्रियता मिळवण्यासाठीचं आणि सफल होण्यासाठीचं समीकरण असल्याचं न्यूज चॅनल्सच्या पत्रकारांनी जणू ठरवलं आहे. ते सगळ्यांत जास्त सक्षम आणि धाडसी आहेत, हे त्यांना सिद्ध करायचं होतं.

म्हणूनच तिथे हजर असणाऱ्या नर्स असो डॉक्टर्स, सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दोषी ठरवलं. हॉस्पिटलमध्ये सुविधांची कमतरता किंवा पुरेशी व्यवस्था नसणं यासाठी हे कर्मचारी जबाबदार असोत वा नसोत, पत्रकार त्यांच्यावर तुटून पडले.

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाविषयी प्रश्न विचारायला टीव्ही पत्रकारांना भीती वाटत असल्याने त्यांना चौकटीत उभं न करता डॉक्टर्स आणि नर्सेसना सॉफ्ट टार्गेट बनवण्यात आलं.

डॉक्टर्स आणि नर्सेसनाच खलनायक ठरवण्यात आलं. इतकंच नाही तर त्यांच्या कामात अडथळेही आणण्यात आले.

पण सत्य परिस्थिती अशी आहे की न्यूज चॅनल्सनी मुझफ्फरपूर या घटनेचा स्वतःसाठी एक इव्हेंट केला. स्वतःची प्रतिमा सुधारणं आणि टीआरपीही मिळवणं असे दुहेरी उद्देश यात होते.

एन्सिफिलायटिसला बळी पडलेली मुलं आणि त्यांच्या नातेवाईकांबद्दल बहुतेक न्यूज चॅनल्सनी संवेदनशीलता दाखवली नाही. आणि ज्यांनी दाखवली त्यात नाटकच जास्त होतं.

रिपोर्टिंग कमी, आवाज जास्त

न्यूज चॅनल्सवर जे कव्हरेज करण्यात आलं त्यात पत्रकारिता किंवा बातमीदारी (रिपोर्टिंग) कमी आणि आवाजच जास्त होता. 'सनसनी' निर्माण करणं हाच मुख्य हेतू होता.

रिपोर्टर्सची जागा एँकर्सनी घेतली होती. म्हणजेच ते रिपोर्टिंग नाही तर 'शो' (कार्यक्रम) करत होते.

कार्यक्रम हिट करण्यासाठी आवश्यक असणारा मालमसाला तयार केला जात होता. रिपोर्टिंग होतच नव्हतं.

न्यूज चॅनल्सनी बातमीदारी यापूर्वीच संपुष्टात आणलेली आहे. म्हणूनच कार्यक्रमात सुरुवातीला या घटनेविषयीची बातमी दिसतच नाही.

मुझफ्फरपूरमधल्या कुपोषित बालकांची संख्या आणि त्यांची परिस्थिती ही आफ्रिकेतल्या सगळ्यांत जास्त कुपोषित देशांपेक्षाही वाईट असल्याचं सांगण्यात येत नाही.

गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या नितीश कुमारांच्या सरकारच्या अपयशावर टीका केलेली नाही. दरवर्षी असे मृत्यू होत असूनही हे प्रशासन इतकं सुस्त आणि बेपर्वा का आहे? या विषयी प्रश्न विचारण्यात आले नाहीत.

राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती इतकी हलाखीची का आहे? किंवा आरोग्यासाठीच्या तरतुदींमध्ये कपात का करण्यात आली? याविषयी प्रश्न का विचारण्यात आले नाहीत?

हे विचारायला हवं होतं, पण विचारलं गेलं नाही. कारण हे सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचं आहे.

अशा प्रकारच्या घटनांच्या मुळापर्यंत जाऊन त्याविषयीचे प्रश्न उपस्थित करण्याची सवय आता पत्रकारांना राहिली नाही. आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेचं कौतुक करणाऱ्या चर्चा तासनतास केल्या जाऊ शकतात. पण अशा घटनांदरम्यान त्यांचा फायदा काय, हे मात्र विचारलं जात नाही.

विरोधाभासाची गोष्ट म्हणजे अशा प्रसंगांमध्येही विरोधीपक्षालाच लक्ष्य बनवण्यात येतं. विरोधी पक्ष गप्प का, आंदोलनं, निदर्शनं का करत नाही, हे विचारलं जातं.

विरोधी पक्षाला जागं करणंही गरजेचं आहे. पण त्यांना लोकांच्या नजरेतून उतरवण्याचा सतत प्रयत्न करणं योग्य नाही.

टीव्ही चॅनल्स अशा घटनांकडे अगदी वरवर पाहतात, आपल्या फायद्यासाठी या घटनांचा वापर करतात आणि मग पुढच्या दुर्घटनेची वाट पाहतात.

आता देखील तसंच होईल.

ज्याप्रमाणे गोरखपूरमध्ये शेकडो जीव गेल्यानंतर मोठा गदारोळ झाला. पण आता कोणाच्याही हे लक्षातही नाही. त्याचप्रमाणे मुझफ्फरपूरमधील घटना पूर्णपणे पिळून घेतल्यानंतर टीव्ही चॅनल्स ही घटना विसरून जातील, हे लिहून घ्या.

हेच व्यावसायिक माध्यमांचं सत्य आहे.

त्यांच्या मते पत्रकारिता करण्याचे दिवस आता गेलेले आहेत.

( या लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. )

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)