उदयनराजे भोसले: मी राजीनामा देतो, पुन्हा निवडणुका घ्या

उदयनराजे भोसले ट्वीट Image copyright SAI SAWANT

राज्यात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. भाजपने या निवडणुकीत विजय मिळवत सरकार स्थापन केले. पण महिन्याभरात आणि आताही EVMद्वारे झालेल्या मतदानावर शंका उपस्थित होत आहेत.

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांनी EVMद्वारे झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत सरकारला आव्हान दिलं आहे.

"या निवडणुकीत EVMव्दारे झालेले मतदान आणि मतमोजणीत आढळलेले मतदान यात मोठी तफावत आढळून आली, तरी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलायला तयार नाही. हा लोकशाहीचा घात असून काय व्हायचे ते होऊ द्या, मी खासदारकीचा राजीनामा देतो, त्यानंतर सातारा मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या," असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला दिले.

सातारा इथं शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी EVMबाबत शंका उपस्थित केली.

ते म्हणाले, "जगभरातील प्रगत देश बॅलेटपेपरवर मतदान घेत आहेत आणि आम्ही विश्वासार्हता नसलेल्या EVMचा वापर करत आहोत. 1 हजार मतदानाला बॅलेट पेपर वरील निवडणुकीत अवघा 1300 रूपये तर खर्च येतो, तर हाच खर्च EVM मशीनवरील मतदानासाठी 33 हजार रुपये येतो. हा खर्चाचा होणारा अपव्यय सर्वसामान्यांनी भरलेल्या कररूपी पैशातूनच होतो."

Image copyright Twitter/Chhatrapati Udayanraje Bhonsle

याबाबतच tweet देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, "सातारा लोकसभेचा मी राजीनामा देतो आयोगाने फेरनिवडणूक घ्यावी. लोकसभेत किती व्हायरस शिरलेत हे कोण सांगणार? EVM ने झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे. तरीही निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही."

पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगाला आव्हान देत उदयनराजेंनी EVM मशीनवर झालेले मतदान आणि निकालादिवशी मतमोजणीवेळी EVMवर आढळलेले मतदान यातील तफावतीचा खुलासा करण्याची मागणी केली.

Image copyright SAI SAWANT

माझ्या सातारा मतदार संघात देखील अनेक ठिकाणी हे प्रकार झालेत. असे प्रकार देशभरातील जवळपास 376 मतदार संघात झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि सरकारनं EVM मशीन बंद करून बॅलेटपेपरवर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी उदयनराजे यांनी यावेळी केली.

EVM मतदानावर विरोधकांनी आक्षेप घेतले आहेत. हातकणंगले मतदारसंघात झालेल्या मतदानात आणि मतमोजणीतील मतांमध्ये तफावत आढळून आल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील समोर आणली होती. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर 459 मते EVM मधून जास्त निघाली आहेत. त्याबाबत राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

EVM द्वारे झालेले मतदान - 12,45,797

EVM मधून मोजलेली मते- 12,46,256

एकूण 459 मते जास्त झाली असल्याची तक्रार शेट्टी यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात स्वतः शरद पवार यांनी देखील EVMमशीनच्या बाबत शंका उपस्थित केली होती.

उदयन राजे यांच्या वक्तव्यानंतर बीबीसीने भाजपची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ही बातमी अपडेट करण्यात येईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)