नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ यांच्यात काय चर्चा होणार?

मोदी - पोम्पेओ Image copyright Getty Images

इराण आणि अमेरिकेमधला तणाव सध्या युद्धाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे आणि नेमक्या अशाच वेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांखेरीज पाँपेओ पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करतील. त्यांच्या भारत दौऱ्याविषयी बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी मध्य-पूर्वेतल्या घडमोडींचे तसंच आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार कमाल पाशा यांच्याशी बातचीत केली.

प्रोफेसर पाशा सांगतात की पाँपेओंच्या भारत दौऱ्याचं महत्त्व दोन गोष्टींमुळे वाढलं आहे. एक म्हणजे नुकतंच इराणने अमेरिकेचं एक ड्रोन विमान पाडलं. यामुळे आखातात तणाव वाढला आहे आणि तिथली परिस्थिती गंभीर झाली आहे.

दुसरी गोष्ट अशी की संयुक्त अरब अमिरातींमध्ये तेल वाहून नेणाऱ्या जहाजावर हल्ला झाला होता, त्यामुळे तेलवाहतूकीवर परिणाम झाला आहे. तसंच तेलाच्या इन्शुरन्सचा प्रीमियम वाढल्यामुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

यावर ट्रंप यांचं म्हणणं आहे की ते इराणवर सैनिकी कारवाई करणार होते, पण शेवटच्या क्षणी काही कारणांमुळे त्यांनी हा हल्ल्याचा निर्णय रद्द केला. या सगळ्यामुळे तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इराणचं म्हणणं आहे की अमेरिकेने हल्लाबिल्ला केला तर ते कठोर प्रत्युत्तर देतील.

पाहा हे विश्लेषण

पाँपेओ ज्या हेतूने भारतात आले आहेत, त्यांच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे, असंही पाशा सांगतात.

भारत 400 अॅन्टीबॅलिस्टिक मिसाईल रशियाकडून खरेदी करू इच्छितो. पण शस्त्रास्त्र विक्रीच्या बाबतीत, त्याच्या किमती ठरवण्याच्या चढाओढीत अमेरिकेला सगळ्यात शक्तिशाली देश बनायचं आहे.

नरेंद्र मोदी आणि माईक पाँपेओ यांच्यात काय चर्चा होणार?

एका बाजूला नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आपले जवळेचे मित्र आहेत, असं सांगतात तर दुसऱ्या बाजूला दोन्ही देशांमध्ये अनेक गोष्टींवरून मतभेद आहेत. अशात हे दोन्ही नेते काय चर्चा करतील?

प्रोफेसर पाशा सांगतात की, "सगळ्यांनाच माहिती आहे की भारताला अमेरिकेबरोबरचे संबंध दृढ करायचे आहेत. संबंध सुधारण्याची सुरुवात माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात झाली. सध्या प्रत्येक क्षेत्रात अमेरिकेशी भारताचे गहिरे संबंध प्रस्थापित होत आहेत. आता तर शस्त्र खरेदीच्या बाबतीतही दोन्ही देशांमध्ये प्रगती झाली आहे.

अर्थात तरीही अशा अनेक बाबी आहेत ज्यात दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तान आणि काश्मीर. भारताची इच्छा आहे काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान तसंच कट्टरतावाद्यांवर दबाव आणावा. पण अमेरिकेने भारताच्या इच्छेप्रमाणे पावलं उचलली नाहीयेत.

प्रोफेसर पाशांना असंही वाटतं की अमेरिका भारत आणि चीन यांच्यात जे संबंध सुधारत आहेत त्याने खूश नाहीये. अमेरिका चीनला एकटं पाडायचे पुरेपूर प्रयत्न करत आहे.

चीन आणि पाकिस्तान तसंच रशिया आणि भारताच्या दरम्यान असलेल्या संबंधांवर अमेरिकेला वाटतं की भारताला इतर देशांशी असलेल्या संबंधांची एक रणनिती बनवायची आहे. तर दुसरीकडे अमेरिकेलाच भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांसोबत आपला गट तयार करायचा आहे.

अमेरिकेला वाटतं की भारताने रशियाकडून मिसाईल्स खरेदी केले तर पुढे जाऊन भारत अमेरिकेला जो गट बनवायचा आहे, त्या गटात सहभागी होणार नाही.

आखाती भागात असलेल्या तणावावर भारताची भूमिका

प्रोफेसर पाशा सांगतात की जेव्हाही कुणी अमेरिकेचा मंत्री किंवा अधिकारी भारतात येतो, तेव्हा ला नेहमी ठसवलं जातं की आखाती देशांमध्ये 80 लाखांहून अधिक भारतीय आहेत. भारताचं इंधन, पेट्रोल किंवा गॅस याच भागातून येतो. व्यापाराच्या दृष्टीने हा भाग भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे.

Image copyright EPA

यातून भारताला हे स्पष्ट करायचं असतं की या भागात जेव्हाही तणाव असतो तेव्हा त्याच्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे भारत अमेरिकेला हे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल की इराण प्रश्नासंबंधी सारासर विचार करून भूमिका घ्यावी. एक चुकीचं पाऊल फक्त अमेरिका आणि इराणच नाही तर संपूर्ण जगाला महागात पडेल.

इराणवरून असलेल्या तणावावरून भारत ओमान आणि इतर देशांशी चर्चा करण्याचाही प्रयत्न करेल. अमेरिका-इराण तणावावरून तेल आणि आर्थिक बाबींवर बराच परिणाम झाला आहे. त्यामुळे अमेरिकेशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)