मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचा मालमत्ता कर गेल्या पाच वर्षांपासून थकीत : #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचा मालमत्ता कर गेल्या पाच वर्षांपासून थकीत

मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या थकीत पाणीपट्टीचं प्रकरण ताजं असतानाच सरकारने या बंगल्याचा मालमत्ता करही भरला नसल्याचं समोर आलं आहे.

युतीचं सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजे ऑक्टोबर 2014 पासून मार्च 2019 पर्यंतचा 'वर्षा' निवासस्थानाचा सुमारे सात लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झालेला नाही. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

'वर्षा' निवासस्थानाच्या क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर म्हणून राज्य सरकारनं पालिकेच्या तिजोरीत दरवर्षी एक लाख 63 हजार 144 रुपये जमा करणं आवश्यक आहे. पालिका दर सहा महिन्यांनी मालमत्ता कराची देयकं जारी करत असते.

पालिकेने ऑक्टोबर 2014 पासून ऑक्टोबर 2018 या काळात मालमत्ता कराची नऊ देयकं जारी केली. मात्र आजतागायत 'वर्षा' निवासस्थानाचा मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमाच करण्यात आलेला नाही.

2014 या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांचा मालमत्ता कर भरण्यात आला आहे. मात्र त्यानंतर कर भरण्यातच आलेला नाही.

2. विधानसभा निवडणुका 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान - चंद्रकांत पाटील

राज्यात येत्या सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, असं भाकित महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पिंपरी इथं पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

Image copyright Getty Images

राज्यात येत्या 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल. तसंच 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील, असं चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शेरेबाजीही केली. येत्या विधानसभेत अजित पवारांना पराभूत करणार असं मी म्हटलं तर तुम्हाल हसू येईल, पण बारामती विधानसभा जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहू, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याचा उल्लेख बातमीत आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून कमळावरचा खासदार निवडून आणण्याचं आपलं टार्गेट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

3. मोदींकडून खासदार हिना गावित, अमोल कोल्हेंचं कौतुक

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत आभाराचं भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील खासदार हिना गावित आणि डॉ. अमोल कोल्हे यांचं कौतुक केलं. लोकमतनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

अभिभाषणावर बोलताना मोदींनी पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवणाऱ्या खासदारांचे कौतुक केलं. लोकसभा अधिवेशनातील चर्चासत्रात जवळपास 60 खासदारांनी सहभाग घेतला. अनुभवी खासदारांनी आपल्या परीने उत्तम भाषण केलेच, पण नवीन खासदारांनीही चर्चासत्रात अतिशय उत्कृष्टपणे चर्चा घडवून आणल्याचं मोदींनी म्हटलं.

Image copyright Getty Images

हिना गावित यांनी आदिवासींसंदर्भात मांडलेले मुद्दे आणि खासदार सारंगी यांचं भाषण ऐकल्यानंतर आता मी काय बोलू, असा प्रश्न मला पडला आहे, अशा शब्दांत मोदींनी हिना गावित यांचं कौतुक केलं. त्यासोबतच खासदार असुदुद्दीन औवेसी यांच्यासह सभागृहातील अन्य खासदारांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांबद्दल त्यांचंही कौतुक केलं.

दरम्यान, मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा आणीबाणीवरुन काँग्रेसला लक्ष्य केलं. आणीबाणीचा डाग कदापि पुसला जाणार नाही, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

4. तू स्वतःसाठी खेळलास, धोनी देशासाठी खेळतो - चाहत्यांची सचिनवर टीका

वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यातल्या महेंद्रसिंह धोनीच्या संथ खेळावर सचिन तेंडुलकरसह अनेकांनी टीका केली. मात्र धोनीच्या चाहत्यांना ही टीका रुचलेली नाही. त्यांनी त्यावरून सचिनला ट्रोल केलं आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे.

काही चाहत्यांनी तर 'सचिन, तू स्वतःसाठी खेळत होतास. तर धोनी संघ आणि देशासाठी खेळत आहे,' असं म्हटलं आहे. धोनीमुळेच आपण विश्वकरंडक जिंकू शकलो. जे तुम्ही तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये करू शकला नाहीत, असा टोमणाही एका चाहत्याने सचिनला मारला आहे.

महेंद्रसिंह धोनीनं अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात 36 चेंडूत 24 धावा केल्या. तर केदार जाधवनं 48 चेंडूत 31 धावा केल्या. या दोघांनी 5 व्या विकेटसाठी 84 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. भारतानं अफगाणिस्ताविरुद्धचा हा सामना 11 धावांनी जिंकला.

5. मेहुल चोक्सीचं अँटिग्वाच नागरिकत्व रद्द होणार

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार मेहुल चोक्सी यांचं अँटिग्वामधील नागरिकत्व रद्द करणार असल्याचं अँटिग्वा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

आर्थिक घोटाळ्यातील आरोपींना आम्ही आसरा देतो असं नाहीये. कोणत्याही आरोपीला अँटिग्वा संरक्षण देऊ शकत नाही, असं अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी म्हटल्याचं वृत्त 'अँटिग्वा ऑब्झरर्व्हर'नं प्रसिद्ध केलं आहे.

मेहुल चोक्सींच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. मेहुल चोक्सी आजारी असल्यास त्यांना हवाई रुग्णवाहिकेतून भारतात आणण्याचा प्रस्ताव तपास यंत्रणांकडून देण्यात आला होता. प्रकृती अस्वास्थामुळे भारतात परतण्याबाबत इच्छुक नसल्याचं चोक्सींकडून सांगण्यात आलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)