मोदींना मत दिलंत ना मग कामाचं पण त्यांनाच विचारा - कुमारस्वामी #5मोठ्याबातम्या

कुमार स्वामी Image copyright Facebook/Kumarswamy

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. मोदींना मत दिलं ना मग त्यांच्याकडेच जा- कुमारस्वामी

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी एक विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे. रायचूरमध्ये त्यांचा दौरा सुरू असताना रोजगाराबाबत प्रश्न विचारणाऱ्या कामगारांना त्यांनी तुमचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच विचारा असं सांगितलं.

कुमारस्वामी कारेगुड्डा गावाकडे बसमधून चालले होते. तेव्हा येरुमारूस थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडवली आणि घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्र्यांना रोजगाराचा प्रश्न विचारल्यावर कुमारस्वामी यांनी 'मोदींना मत दिलंत ना मग कामाचं पण त्यांनाच विचारा' असं उत्तर दिलं.

कुमारस्वामी यांनी एका दौऱ्यात एका गावात राहाण्यासाठी 1.22 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे. हे वृत्त इटीव्ही भारतने प्रसिद्ध केलं आहे.

2. ममता बॅनर्जी काँग्रेस-डाव्यांशी हातमिळवणी करायला तयार

एकेकाळचे कट्टर शत्रू डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करायला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तयार झाल्या आहेत.

भाजप पश्चिम बंगालची संस्कृती नष्ट करायला निघाला आहे, त्यामुळे त्यांच्याविरोधात लढायला काँग्रेस आणि डाव्यांनी आपल्याबरोबर यावं असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केलं. पश्चिम बंगाल विधानसभेत त्या बोलत होत्या.

Image copyright Getty Images

यावर भाजपला पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करू देण्यास सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच जबाबदार आहे याची जबाबदारी घेतली तरच त्यांच्या आवाहनचा विचार करू असं डाव्या आणि काँग्रेस नेत्यांनी सांगितल्यावर आपण राजकीय आघाडीबद्ददल बोलत नसल्याचं ममता यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकांच्यावेळेस 23 पक्ष भाजपविरोधात उभे ठाकले होते, याची आठवणही त्यांनी डाव्यांना आणि काँग्रेसला करून दिली. तृणमूलला लोकसभा निवडणुकांमध्ये 22 जागा आणि 43 टक्के मतं मिळाली तर भाजपला पश्चिम बंगालमध्ये 18 जागा आणि 40 टक्के मतं मिळाली. पण बंगालमध्ये डावे आणि काँग्रेसच्या मतांची एकत्रित टक्केवारी 13 टक्के आहे. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

3. काश्मीरमध्ये 2 कट्टरपंथी गट भिडले, एक ठार

काश्मीर खोऱ्यात कट्टरपंथींच्या दोन गटांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. अनंतनागमधील बिजाबेहारा विभागातील सिरहामा गावामध्ये हा गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये एक कट्टरपंथी ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हिजबूल मुदाहिदिन आणि आयएसजेके या दोन गटांमध्ये हा गोळीबार झाला. याच आयएसजेकेचा एक सदस्य ठार झाला. काश्मीर खोऱ्यात कट्टरवाद्यांच्या दोन गटांत गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना आहे.

जम्मू काश्मीरमधील त्राल परिसरात झालेल्या एका चकमकीत सुरक्षा दलांनी शब्बीर मलिक या कंट्टपपंथीला ठार केलं होतं. तो झाकीर मुसाचा निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येतं. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

4. भाजप आमदाराची पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण

मध्य प्रदेशातील भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करण्याची घटना बुधवारी घडली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे ते पुत्र आहेत.

इंदूर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असतानाच वाद झाला आणि आमदार आकाश विजयवर्गीय घटनास्थळी दाखल झाले. तिथे किरकोळ बाचाबाची झाल्यावर आकाश यांनी हातात बॅट घेऊन पालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला. या अधिकाऱ्याला मारहाण करतानाचं चित्रिकरणही झालं आहे. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केलं आहे.

5. मुंबई- ठाण्यावर पाणीसंकट, केवळ 20 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा

मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुढील 20 दिवसच पुरेल एवढा पाणीसाठी शिल्लक आहे. जर पाऊस आला नाही तर हे पाणीसंकट तीव्र होण्याची भीती आहे. ठाण्यात आधीपासून 30 टक्के पाणीकपात आहे.

Image copyright Getty Images

मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या सात जलाशयांमध्ये 73 हजार 784 दशलक्ष लीटर पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 2 लाख 53 हजार 43 लिटर पाणीसाठा उपलब्ध होता.

जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्यामुळे पालिकेचे अधिकारी चिंतेत आहेत. ठाणे शहरातील मोठ्या गृहसंकुलांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)