'ऑपरेशन कमला': कर्नाटकमध्ये 11 आमदारांचे राजीनामे

कुमारस्वामी Image copyright FACEBOOK/H D KUMARSWAMY

कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर (JDS) - काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

रमेश जारकीहोळी यांच्यासह काँग्रेस आणि JDSच्या 11 आमदारांनी राजीनामा दिल्याने आता 'ऑपरेशन कमला'चा (समोरच्या पक्षाकडून आमदार पळवण्याच्या मोहिमेला देण्यात आलेलं सांकेतिक नाव) चौथा प्रयत्न अखेरीस यशस्वी होणार का, याविषयीची चर्चा आता सुरू झाली आहे.

11 आमदारांनी राजीनामे दिले असले तरी कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी त्यावर अजून काही निर्णय घेतला नाही आहे. "माझ्या कार्यालयात 11 आमदारांचे राजीनामे आले आहेत, असं मला समजलं. आता मी घरी परतल्यानं ते राजीनामे घेऊन ठेवावेत असं कार्यालयाला सांगितलं आहे. उद्या सुटी असल्यानं मी सोमवारीच यावर निर्णय घेईल," असं विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी ANI वृत्तसंस्थेला सांगितलं.

राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये बी.सी पाटील, एच. विश्वनाथ, नारायण गौडा, शिवराम हेब्बार, महेश कुमाथल्ली, गोपालय्या, रमेश जारकीहोळी आणि प्रताप गौडा पाटील यांचा समावेश आहे.

या आमदारांमधल्या 3 आमदारांना काँग्रेसचे निष्ठावान किंवा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय मानले जातं.

जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्यातल्या गोकाकचे आमदार आहेत. जानेवारी महिन्यामध्ये इतर काही काँग्रेस आमदारांसोबत त्यांनाही काही आठवड्यांसाठी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये दडवून ठेवण्यात आलं होतं. भाजपला पुरेसा आकडा गाठता न आल्याने जानेवारीमध्ये ऑपरेशन कमलाचा तिसरा प्रयत्न फसला होता.

पण आताच्या 'ऑपरेशन कमला'चं उद्दिष्टंही तेच आहे. काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावणं हे या ऑपरेशनचं उद्दिष्ट. म्हणजे सत्ताधारी पक्षाची विधानसभेतली संख्या 209पेक्षा कमी होईल आणि जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस आघाडीचं बहुमत जाईल.

विधानसभेमध्ये 105 सदस्य असणारा भाजप हा एकूण 224 सदस्यांच्या विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष आहे.

सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला जारकीहोळी आणि आनंद सिंह यांच्याशिवाय आणखी 13 सदस्यांची गरज आहे. जेडीएस - काँग्रेसचे मिळून सध्या 117 सदस्य आहेत. त्यातले एक काँग्रेस आमदार रोशन बेग यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. (ही स्थिती आजचे राजीनामे स्वीकारण्यापूर्वीची आहे.)

'ऑपरेशन कमला' ही कर्नाटकातच जन्माला आलेली संकल्पना आहे. 2008मध्ये भाजप 224 सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेमध्ये 110 जागा जिंकून पहिल्यांदाच दक्षिण भारतात सत्तेवर आली, तेव्हा याचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कर्नाटक भाजपाचे नेते बी.एस. येडीयुरप्पा

या 'ऑपरेशन कमला'नुसार काँग्रेस आणि जेडीएसच्या सदस्यांनी वैयक्तिक कारणं देत विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपने उमेदवारी दिली.

या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या आठ आमदारांपैकी पाच जण भाजपच्या तिकिटावर निवडून आले तर तीन जण ही निवडणूक हरले. पण या ऑपरेशनमुळे भाजपला विधानसभेमध्ये बहुमत मिळवण्यात यश आलं.

डिसेंबर 2018मध्ये पुन्हा एकदा 'ऑपरेशन कमला' चा प्रयत्न झाला, ज्यावेळी 22 डिसेंबरला करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ विस्तारातून जारकीहोळी यांना कामगिरी चांगली नसल्याचं कारण देत मंत्रीमंडळातून वगळण्यात आलं होतं.

जानेवारी 2019 मध्ये तिसऱ्यांदा 'ऑपरेशन कमला' राबवण्यात आलं. यावेळी जारकीहोळी स्वतःसोबत इतर काही आमदारांना मुंबईला घेऊन आले. पण आवश्यक आकडा गाठता न आल्याने हा प्रयत्न देखील अयशस्वी ठरला.

आता सुरू असलेल्या घडामोडींमध्ये आनंद सिंह यांचा राजीनामा काँग्रेस नेत्यांना चकित करणारा आहे. "त्यांच्या राजीनाम्याने मला धक्का बसला आहे," पाणी पुरवठा मंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images

भाजपने आमदार पळवू नयेत म्हणून जानेवारीमध्ये त्यांना एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी आणखी एक आमदार जे. गणेश यांनी तथाकथितपणे आनंद सिंह यांच्यावर हल्ला केल्याने त्यांना डोळ्याजवळ गंभीर इजा झाली होती आणि त्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं.

पण आघाडी सरकारने ज्यापद्धतीने जिंदाल स्टील वर्क्स (जेएसडब्ल्यू)ला जमीन विकली त्यामुळे आपण नाराज असल्याचा दावा राज्यपाल वजुभाई वाला यांच्यासमोर राजभवनामध्ये आपला राजीनामा सादर करताना आनंद सिंह यांनी केला.

आताच्या या घडामोडीविषयी बोलण्यासाठी भाजपचा कोणताही नेता तयार नाही. दोन पक्षांतल्या अंतर्गत अडचणींमुळे हे राजीनामे दिले जात असून याच्याशी भाजपचं काही देणंघेणं नसल्याचं काहींचं म्हणणं आहे.

"जर ते स्वतःहून राजीनामा देत असतील, तर त्यासोबत आमचं देणंघेणं नाही. जर सगळं अपेक्षेनुसार घडलं तर आम्ही सरकार स्थापन करून आणि ऑक्टोबर किंवा डिसेंबरमध्ये महाराष्ट्रासोबतच निवडणुका घेण्यात येतील," एका भाजप नेत्याने सांगितलं.

Image copyright HD KUMARSWAMY
प्रतिमा मथळा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी

पण सध्या अमेरिकेच्या खासगी दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ट्वीट करून सांगितलं, "मी सध्या न्यू जर्सीमधील कालभैरवेश्वर देवळाच्या पायाभरणी समारंभासाठी आलेलो आहे. मी वृत्तवाहिन्या पाहतोय. सरकार अस्थिर करणं हे भाजपचं दिवास्वप्न आहे."

माजी खासदार आणि काँग्रेस नेते व्ही. एस. उग्रप्पा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं : "जे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि येडीयुरप्पा करत आहेत त्याचा धोका राज्य सरकारला नाही तर लोकशाहीला आणि घटनेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक देश, एक निवडणुकीबद्दल बोलत आहेत पण लोकशाहीला डावलण्यात आलं नाही, तरच त्यावर विश्वास ठेवता येईल. "

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)