तिवरे धरण: खेकड्यांमुळे धरण फुटू शकतं का?

खेकडा Image copyright Getty Images

तिवरे धरण फुटून आतापर्यंत 19 जणांचा जीव गेल्याचे स्पष्ट झाले आहे आणि 4 जण अद्याप बेपत्ता आहेत.

या धरणफुटीला खेकडे जबाबदार असल्याचं विधान जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्यानंतर माध्यमांमध्ये याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली.

खेकड्यांमुळे खरंच धरण फुटू शकतं का, याचे उत्तर शोधण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला आहे.

काय होतं तानाजी सावंत यांचं वक्तव्य?

तिवरे धरणफुटीनंतर माध्यमांशी बोलताना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत म्हणाले होते, "धरण जवळपास 2004 साली कार्यान्वित झालं. 15 वर्षं झाली त्यात पाणी साठतं. पण कोणतीच दुर्घटना घडली नव्हती. तिथं खेकड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यातूनच गळती सुरू झाली."

"ही बाब गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुरूस्तीही केली. ही दुर्घटना घडणं हे दुर्दैवी म्हणावं लागेल. पाण्याची पातळी आठ तासांत आठ मीटर वाढली होती," असं सावंत म्हणाले.

सावंत यांच्या खेकड्यांबाबतच्या वक्तव्यानंतर त्यांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर काही खेकडे पकडून पोलिसांच्या हवाली केले आणि कारवाई करण्यास सांगितलं.

त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर भागात विविध पक्ष आणि संघटनाही याबाबत आंदोलन करताना दिसत आहेत.

पक्षाच्या आमदाराला वाचवण्यासाठी धरणफुटीचं खापर खेकड्यांवर फोडण्यात येत असल्याचं त्यांचं मत आहे. तिवरे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

'...तिवरे धरण का फुटलं?'

"महाराष्ट्रात तिवरे धरणासारखी किंवा तिवरेपेक्षाही मोठी असलेली मातीची चार हजार धरणं आहेत. मंत्र्यांचं मत खरं असेल तर महाराष्ट्रात कितीतरी धरणं फुटली असती.

स्थानिक प्रशासन, जिल्हा परिषद आणि कृषी खाते यांनी बांधलेल्या मातीच्या बांधांची संख्याही 40 हजारपेक्षा जास्त आहे. हे सगळे बांध फुटत नाहीत आणि तिवरे धरणंच कसं काय फुटू शकतं?," असं जलसिंचन विभागाचे निवृत्त अभियंता विजय पांढरे यांना वाटतं.

विजय पांढरे सांगतात, "खेकड्यांमुळे धरणं फुटतात, असं म्हणणं योग्य नाही. कारण खेकड्यांची बिळं फारशी खोलवर जात नाहीत. मला तरी सात-आठ फुटांच्या पलीकडे ती गेलेली कधी आढळली नाहीत."

'काळी माती वापरली नाही'

पांढरे पुढे सांगतात, "तिवरे धरण फुटण्याला एक तांत्रिक कारणही आहे. मातीची धरणं बांधत असताना त्याचा "हर्टिंग झोन" म्हणजेच गाभा हा काळ्या मातीने भरायचा असतो. कारण काळी माती ही चिकट असते. तिची पकड मजबूत असते. परंतु, कोकणात काळी माती मिळतच नाही. असं असतानाही काळी माती आहे, असं दाखवून धरणं बनवली जातात."

धरण बांधताना नियमांची पायमल्ली झाल्याचा संशय पांढरे यांनी व्यक्त केला. पांढरे म्हणाले, "प्रत्यक्षात तुम्ही धरण फुटलेली दृश्य पाहिलीत, तर गाभा आणि बाह्य भाग एकाच प्रकारच्या तांबड्या मातीनं बनल्याचं दिसत आहे. कुठेही "हर्टिंग झोन" वेगळा दिसत नाही. त्यामुळे खूप मोठं "टेक्निकल व्हॉयलेशन" झालेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही घटना घडली. त्यासाठी खेकड्यांना दोष देणं बरोबर नाही."

"धरण फुटण्याची घटना ही अचानक होत नसते. ती हळूहळू होते. दोन वर्षांपूर्वी धरणातून गळती होत असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. थातूरमातूर काहीतरी दुरूस्ती केली. त्यामुळेच धरण फुटलं आहे," असंही पांढरे यांनी सांगितलं. याबाबत तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

अधिकाऱ्यांना घटनेची पूर्वकल्पना होती ?

जलअभ्यासक परिणिता दांडेकर यांनीही खेकड्यांमुळे धरण फुटण्याची शक्यता नसल्याचं सांगितलंय. याउलट या घटनेबाबत पूर्वकल्पना असूनही संबंधितांनी योग्य पावलं उचलली नाहीत असा आरोप त्यांनी केला. परिणिती दांडेकर सध्या 'साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम, रिवर्स अँड पीपल' या संस्थेत सहयोगी समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.

"तिवरे धरण कोकणातील इतर चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या धरणाप्रमाणेच एक होतं. त्याचं स्ट्रक्चर कमजोर होतं. ते ढासळत होतं हे त्यांना माहीत होतं. जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी विभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात 2 जुलैला सायंकाळी पाच वाजता सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचा उल्लेख आहे." असंही दांडेकर यांनी लक्षात आणून दिलं.

"पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहात होतं हे त्यांना माहिती होतं तर त्यांनी तशा सूचना गावकऱ्यांना द्यायला हव्या होत्या. त्यांना सूचना दिली असती तर लोक वाचले असते, या घटनेमागचं कारण काहीही असलं तरी तुम्ही त्याची जबाबदारी झटकू शकत नाही," असं दांडेकर म्हणाल्या.

दांडेकर म्हणतात, "खेकड्यांमुळे धरण फुटण्यासाठी त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने खेकडे असले पाहिजेत. त्यामुळे हा तर्क चुकीचाच आहे. खेकडे वगैरे काहीही कारण असू शकत नाही."

'एसआयटीमार्फत सत्य समोर येईल'

याबाबत रत्नागिरीचे जिल्हा जलसंधारण अधिकारी अभियंता प्रकाश देशमुख यांनी अधिक माहिती दिली. बीबीसी मराठीशी बोलताना देशमुख म्हणाले, "मंत्रिमहोदयांची ग्रामस्थांशी चर्चा झाली तेव्हा मी त्याठिकाणी उपस्थित नव्हतो. त्यामुळे याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही."

"धरण फुटण्याच्या घटनेची चौकशी एसआयटीतर्फे होणारच आहे. त्यावेळी सत्य समोर येईल."

देशमुख सांगतात, "हर्टिंग झोनसाठी फक्त काळी मातीच वापरली जाते, असं नाही. काळी माती उपलब्ध नसल्यास इतर हर्टिंग मटेरियल वापरून गाभा तयार केला जाऊ शकतो. कोकणात कुठेच काळी माती आढळून येत नाही.

केवळ धरणासाठी काळी माती घाटावरून आणणं शक्य नसल्यामुळे इतर पर्याय वापरले जातात."

"धरण भरल्यानंतर पाणी सुरक्षितपणे सांडव्यावरून खाली जातं. ही एक सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण विमोचक म्हणजेच 'हेड रेग्युलेटर'वरून पाणी वाहत जाऊन ही दुर्घटना घडली असावी," असा अंदाज देशमुख यांनी व्यक्त केला.

"तिवरे धरण सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्याच्या पूर्वेला सह्याद्री पर्वत आहे. त्याठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं. इथं आठ तासात 192 मिमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली होती," असंही देशमुख म्हणाले.

खेकड्यांविषयी थोडंसं

खेकड्यांच्या प्रजाती, त्यांच्या राहण्याची पद्धत, अधिवास यांच्याबाबत माहितीसाठी बीबीसीने जीवजंतूंचे अभ्यासक जिग्नेश त्रिवेदी यांच्याशी संवाद साधला. त्रिवेदी गुजरातमधील पाटण येथील हेमचंद्राचार्य विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

त्रिवेदी सांगतात, "खेकड्यांमुळे एखाद्या स्ट्रक्चरचं नुकसान झाल्याचं आतापर्यंत जगात कुठेच घडलं नाही. थेट खेकड्यांमुळे धरण फुटलं असेल असं खात्रीशीरपणे सांगू शकत नाही."

"मोठमोठ्या धरणांच्या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात असतं. तिथं खेकडे असणं स्वाभाविक आहे. पण खेकड्यांमुळे धरण फुटलं असं सांगितलं जात असेल तर हा अभ्यासाचा विषय आहे. यावर संशोधन करता येऊ शकतं," असं त्रिवेदी म्हणाले.

Image copyright Getty Images

त्रिवेदी पुढे म्हणाले, "झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, भारतात सुमारे 100 प्रजातींचे खेकडे आढळतात. त्यातील जवळपास 20 प्रजाती महाराष्ट्रात असाव्यात."

फ्रेश वॉटर क्रॅब म्हणजेच ताज्या पाण्यात आढळणाऱ्या खेकड्यांच्या प्रजाती नद्या आणि धरणांच्या ठिकाणी असतात. तिथल्या वाळूत बिळं करून ते राहतात.

पावसाळ्याच्या दरम्यान हे खेकडे आपल्या बिळांमधून बाहेर येतात."

"या दिवसात मोठ्या प्रमाणात खेकड्यांच्या हालचाली तुम्हाला दिसणं नॉर्मल आहे. हा काळ त्यांच्या विणीचा काळ असतो. बाकीच्या वेळी ते आतमध्ये राहतात." असं त्रिवेदी सांगतात.

"खेकडा ही शिकार करणारी प्रजात आहे. बहुतांश खेकडे मांसाहारी असतात. छोटे मासे, अळ्या हे त्यांचं खाद्य आहे. हे त्यांना पाण्याच्या किनारी भागात मिळत असल्याने खेकडे किनाऱ्यावरच आढळून येतात."

"खेकडे उथळ पाण्यात आपले भक्ष्य शोधतात. जास्त खोल पाण्यात ते जगू शकत नाहीत. त्यामुळे किनाऱ्यावरील दगडांमधल्या फटी, वाळू, मऊ माती यांच्या आत ते राहतात. त्यांच्यामुळे धरणाच्या स्ट्रक्चरला धोका पोहोचेल असं मला तरी वाटत नाही," असं त्रिवेदी म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)