BCCI: सौरव गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता

सौरव गांगुली Image copyright INDRANIL MUKHERJEE (Getty Images)

महाराजा, बंगाल टायगर, प्रिन्स ऑफ कोलकाता, ऑफ साईडचा गॉड आणि दादा यांसारख्या अनेक नावांनी परिचित असलेल्या सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.

सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नवा अध्यक्ष तर गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह मंडळाचे नवे सरचिटणीस बनू शकतात, असं वृत्त आहे.

नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवारी आहे. पण निवडणूक न होण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण आतापर्यंत कोणत्याच उमेदवाराने विरोधात अर्ज दाखल केलेले नाहीत. अथवा त्याची कोणतीही चर्चाही नाही. बीसीसीआयच्या मंडळाच्या पाच सदस्यांची निवड 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

बीसीसीआय आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनमद्ये काम केलेले माजी क्रिकेटपटू ब्रजेश पटेल यांना आयपीएलचे नवे अध्यक्ष बनवण्यात येऊ शकतं, असं सांगण्यात येत आहे.

47 वर्षीय गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा विद्यमान अध्यक्ष आहे. त्याला 2020 च्या सप्टेंबर महिन्यात या पदावरून हटणं अनिवार्य आहे.

त्यानंतर तीन वर्षे त्याला कोणतंही पद स्वीकारता येणार नाही. बीसीसीआयच्या निवडणुकांच्या नव्या नियमांनुसार याला कुलिंग पीरिएड असं संबोधण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या गांगुलीने बीसीसीआयचं अध्यक्षपद स्वीकारल्यास त्याला दहा महिन्यांचा कार्यकाळ प्राप्त होईल.

क्रिकेटपटू ते बीसीसीआयचा अध्यक्ष असा सौरव गांगुलीचा प्रवास असंख्य रंजक घडामोडींनी भरलेला आहे.

भारतीय क्रिकेटचा महाराजा

नव्वदीच्या दशकातली अखेरची वर्षं. जग विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात प्रवेश करत होतं. सगळ्याच ठिकाणी नव्या शतकातील वाटचालीच्या चर्चा सुरू असताना मात्र भारतीय क्रिकेटला फिक्सिंगचं ग्रहण लागलं होतं.

काही खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद सचिन तेंडुलकरकडे चालून आलं होतं. अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे काही काळानंतर त्यानेही राजीनामा दिला.

Image copyright Clive Mason/getty images

आता गरज होती भारतीय क्रिकेटला पुन्हा मान मिळवून देण्याची. याच घडामोडींतून भारताला सौरव गांगुलीच्या रुपात एक यशस्वी कर्णधार मिळाला. गांगुलीने भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली. भारतीय क्रिकेट रसिकांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बरोबरीनं जर कुणाला भरभरून प्रेम दिलं असेल तर ते सौरव गांगुलीच असं म्हणायला हरकत नाही.

भारताच्या क्रिकेटविषयी चर्चा करताना सौरव गांगुलीपूर्व आणि गांगुलीनंतर अशी विभागणी केली गेली तरी त्यात अतिशयोक्ती नाही. सचिन, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे, सेहवाग, जहीर खान यांच्यासारख्या खेळाडूंचं नेतृत्व गांगुलीनं इतक्या यशस्वीपणे केलं की तो भारतातील क्रिकेटविश्वातला एक मैलाचा दगड ठरला.

कारकिर्दीची नाट्यमय सुरूवात

8 जुलै 1972 रोजी जन्मलेल्या दादाने 11 जानेवारी 1992 रोजी आपल्या विसाव्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या सामन्यात त्याला फक्त तीन धावा करता आल्या.

अपयश आणि इतर काही कारणामुळे दादा चार वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला. पण परिस्थितीशी संघर्ष करून त्याने पुन्हा 1996 भारतीय संघात स्थान मिळवलं.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही संघात त्याची निवड करण्यात आली होती. त्यानंतर माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती.

Image copyright DIBYANGSHU SARKAR(Getty Images)

पण गांगुली शांत राहिला. त्याची सर्वांत अविस्मरणीय खेळी त्याची वाट पाहत होती.

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली. त्यात त्याने संयमी अशा 46 धावा केल्या. त्यानंतर कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने आपलं पदार्पण केलं. सलग दोन सामन्यात दोन शतके झळकावून त्याने दिमाखात पदार्पण केलं. या मालिकेनंतर गांगुलीने मागे वळून पाहिलंच नाही.

आक्रमक आणि यशस्वी कर्णधार

भारतीय संघाचं कर्णधारपद म्हणजे काटेरी मुकूट. मैदानावरच्या कामगिरीचा दर्जा जपताना मैदानाबाहेरच्या दबावाचाही सामना भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराला करावा लागतो. गांगुलीनं हे शिवधनुष्य लीलया पेललं. केवळ पेललंच नव्हे तर या धनुष्यातून त्याने अनेक प्रस्थापित संघांवर बाण सोडून त्यांना घायाळ केलं.

त्यामुळेच सौरव गांगुलीला भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 49 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 21 सामन्यांत भारताने विजय मिळवला. 13 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. तर 15 सामने अनिर्णित राहिले.

एकदिवसीय सामन्यांमध्येही दादाचा रेकॉर्ड दिमाखदार आहे. त्याच्या नेतृत्वाखालील 146 सामन्यांपैकी 76 सामन्यात भारताने विजय मिळवला. 65 सामने भारताने गमावले तर 5 सामने अनिर्णित राहिले.

Image copyright MANAN VATSYAYANA(Getty Images)

सौरव गांगुली मैदानावर आणि मैदानाबाहेरही आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला गेला. 2002 मध्ये नॅटवेस्ट सिरीजदरम्यान त्याने शर्ट उतरवून केलेलं सेलिब्रेशन आजही सगळ्यांना आठवतं.

आपल्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात त्याने अनेक कठोर निर्णय घेतले. पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवताना तो अनेकवेळा दिसला. त्याशिवाय कोच ग्रेग चॅपेलसोबत असलेला त्याचा वाद जगजाहीर आहे. आजही अनेक बाबींवर परखड मत नोंदवताना तो दिसतो.

युवा खेळाडूंना संधी

सध्या भारतीय संघ यशाच्या शिखरावर आहे. यात गांगुलीचा सिंहाचा वाटा आहे असं मानलं जातं. कर्णधार असताना त्याने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना नैसर्गिक कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करायचा.

भारताचा आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा पूर्वी खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता. त्याच्यातील प्रतिभा हेरून गांगुलीनं त्याला आपल्या जागी सलामीला पाठवलं. सलामी करण्याची संधी मिळाल्यानंतर सेहवागचा खेळ आणखीनच बहरला.

Image copyright INDRANIL MUKHERJEE(Getty Images)

योग्य संधी मिळाल्यामुळे युवराज सिंह, मोहम्मद कैफ, हरभजन सिंह, झहीर खान यांच्यासारखे दिग्गज खेळाडू भारताला लाभले. 2004 साली गांगुलीने पाकिस्तानविरुद्ध महेंद्रसिंह धोनीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. त्यावेळी केलेल्या 148 धावांमुळे धोनीची ओळख साऱ्या जगाला झाली. पुढे जाऊन याच धोनीने 2007 टी-20 आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले.

लढवय्या प्रेमी

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकीर्द जितकी रोमांचक आहे तितकीच त्याची लव्ह लाईफसुद्धा फिल्मी आहे. पत्नी डोना आणि सौरव हे लहानपणापासूनचे मित्र. कालांतराने त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.

या दोघांच्या कुटुंबीयांमध्ये पूर्वी मैत्री होती. काही कारणामुळे त्यांच्या संबंधात वितुष्ट आले. डोना ही ओडिसी डान्सर असल्यामुळे सौरवच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता.

Image copyright The India Today Group(Getty Images)

भारतीय संघात निवड झाल्यानंतर काही दिवसांनी सौरव आणि डोना यांनी गुप्तपणे कोर्ट मॅरेज केलं. पण माध्यमांनी त्यांना एकत्र टिपल्यामुळे त्यांच्यात विवाह झाल्याचं उघडकीस आलं.

घरच्यांचा विरोध डावलून लपूनछपून केलेल्या लग्नामुळे दोघांचेही कुटुंबीय नाराज झाले होते. पण नंतर त्यांनी या लग्नाला मान्यता दिली. दोघांचाही विवाह पुन्हा पारंपारिक पद्धतीने लावून देण्यात आला. आपल्या लढवय्या स्वभावामुळे मैदान जिंकणाऱ्या गांगुलीने जगाशी लढून आपलं प्रेमसुद्धा मिळवलं आहे.

सौरव गांगुलीचा आतापर्यंतचा प्रवास थोडक्यात

 • भारतीय संघाचा माजी जिगरबाज कर्णधार सौरव गांगुली 'दादा' या टोपणनावाने प्रसिद्ध.
 • भारताच्या सार्वकालीन यशस्वी कर्णधारांपैकी एक. 2000च्या दशकात मॅच फिक्सिंगचं सावट असताना नेतृत्वाची धुरा हाती आलेल्या गांगुलीने संघाची नव्याने बांधणी केली.
 • प्रिन्स ऑफ कोलकाता ही बिरुदावली पटकावलेला गांगुली हा झुंजार नेतृत्व आणि बेडरपणासाठी ओळखला जातो.
 • इंग्लंडविरुध्दची मालिका जिंकल्यानंतर क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्सवर टीशर्ट काढून विजयाचा आनंद साजरा करणारा कर्णधार.
 • 113 टेस्टमध्ये 7212 धावा. यामध्ये 16 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश.
 • लॉर्ड्सवर पदार्पणातच इंग्लंडविरुध्द शतकी खेळी.
 • परदेशात भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक.
 • 331 वनडेत 11, 363 धावा. यामध्ये 22 शतकं आणि 72 अर्धशतकं.
 • वनडेत दहा हजारपेक्षा जास्त धावा करणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये समावेश.
 • सलग चार वनडेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा एकमेव प्लेयर.
 • वनडेत 10,000 पेक्षा जास्त धावा, 100पेक्षा जास्त विकेट्स आणि 100पेक्षा जास्त कॅचेस नावावर असलेल्या दुर्मीळ यादीत विराजमान.
 • सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही वनडे क्रिकेटमधल्या सगळ्यात यशस्वी जोड्यांपैकी एक.
 • lPL स्पर्धेत, कोलकाता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स सॅघांचं नेतृत्व.
 • अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात गांगुलीचा मोलाचा वाटा.
 • प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्याशी वादानंतर कारकिर्दीने अनपेक्षित वळण घेतलं.
 • निवृत्तीनंतर समालोचक म्हणून तसंच इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील अॅटलेटिको डी कोलकाता संघाचा सहमालक.
 • सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून कार्यरत.
 • IPL गव्हर्निंग काऊंसिल सदस्य तसंच टेक्निकल कमिटी सदस्य म्हणून काम पाहिलं.
 • यंदाच्या IPL स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार म्हणून भूमिका.
 • 'अ सेंच्युरी इज नॉट इनफ' नावाने आत्मचरित्र प्रसिद्ध.
 • अर्जुन आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)