सरकारी अधिकाऱ्याची शेतकऱ्याला बेदम मारहाण?- फॅक्ट चेक

फेसबुक Image copyright Facebook

एका व्यक्तीला मारहाण होत असल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

'उपविभागीय दंडाधिकारी (SDM) दर्जाच्या अधिकाऱ्याकडून सरकारी कार्यालयातच शेतकऱ्याला बेदम मारहाण' असा दावाही हा व्हीडिओ शेअर करताना केला जात आहे. हा व्हीडिओ अधिकाधिक शेअर करण्याचं आवाहनही करण्यात येतंय.

एक व्यक्ती काही लोकांसमोर हात जोडून माफी मागत आहे आणि पांढरा शर्ट परिधान केलेली दुसरी व्यक्ती सहकाऱ्यांच्या मदतीने माफी मागणाऱ्या व्यक्तीला मारहाण करत आहे. हा सर्व प्रकार जिथे चालला आहे, ते सरकारी कार्यालयासारखं दिसतं. मारहाणीदरम्यान इतरही काही लोक घटनास्थळी उपस्थित असल्याचं व्हीडिओमध्ये दिसतं.

बीबीसीच्या शेकडो वाचकांनी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून मारहाणीचा व्हीडीओ आमच्यापर्यंत पोहोचवला. त्यानंतर आम्ही या व्हीडीओची सत्यता पडताळली.

या व्हीडिओसोबत वाचकांनी काही दावेही शेअर केले. कुणी हा व्हीडिओ हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशमधील असल्याचं म्हटलं, तर काही जणांनी व्हीडिओ मध्य प्रदेशातील असल्याचा दावा केला.

Image copyright Facebook
प्रतिमा मथळा फेसबुकवरील 'आज का सच' या पेजवरुन सात दिवसांपूर्वीच मारहाणीचा व्हिडीओ पोस्ट केल आहे. आतापर्यंत सात लाख व्ह्यूजचा टप्पा या व्हीडिओने पार केला आहे.

आणखी सर्च केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, की गेल्या काही दिवसात हा व्हीडिओ 10 लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला.

मारहाणीचा हा व्हीडिओ अनेक ठिकाणी सारख्याच मेसेजसोबत पोस्ट केला जात आहे.

"उपविभागीय दंडाधिकाऱ्याने केलेल्या मारहाणीचा हा व्हीडिओ संपूर्ण भारतभर पसरला पाहिजे. एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केली जात आहे. थोडी तरी संवेदनशीलता शिल्लक असेल, तर हा व्हीडिओ संपूर्ण भारतभर पसरवा आणि उद्यापर्यंत या घटनेची बातमी आली पाहिजे. मारहाण करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे," असा मेसेज या व्हीडिओसोबत शेअर केला जात आहे.

बीबीसीने या व्हीडिओची पडताळणी केली. यात आम्हाला असं आढळलं, की एका सरकारी कार्यालयात तक्रारदाराला मारहाण झाली होती. मात्र, ही घटना एक वर्षापूर्वीची असून त्यावेळी या घटनेच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात कारवाईही झाली होती.

व्हीडिओमागचं नेमकं सत्य काय?

मारहाणीचा व्हीडिओ राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील टोडाभीम शहरातील असल्याचं बीबीसीच्या पडताळणीतून समोर आलं.

टोडाभीम येथील कमालपुरा गावातील 'अटल सेवा केंद्रात' 12 जून 2018 रोजी 'न्याय आपके द्वार' कार्यक्रमाची बैठक होती. त्यावेळी मारहाणीची ही घटना घडली होती.

'न्याय आपके द्वार' अभियान राजस्थान सरकारने सुरु केलं आहे. जनता दरबारसारखा हा प्रकार आहे. या अभियानाच्या अंतर्गत गावा-गावात शिबिरं आयोजित केली जातात आणि प्रशासकीय अधिकारी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचं निराकारण करतात.

Image copyright Facebook

या सर्व प्रकाराची पडताळणी करत असताना मारहाणीच्या घटनेशी संबंधित अनेक बातम्या सापडल्या. या बातम्यांनुसार एसडीएम जगदीश आर्य यांनी जनसुनावणी करत असताना प्रकाश मीना नामक व्यक्तीला मारहाण केली होती.

प्रकाश मीना या व्यक्तीला सरकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली 24 तास पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं होतं, असंही तत्कालीन बातम्यांमध्ये सांगण्यात आलं होतं.

मारहाणीनंतर काय झालं?

गावात रस्ता बांधण्याची मागणी सीडीएम जगदीश आर्य यांच्याकडे केल्यानंतर ते भडकले, असा दावा प्रकाश मीना यांनी मारहाणीच्या घटनेनंतर केला होता.

दुसरीकडे एसडीएम जगदीश आर्य यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं, की जनसुनावणीदरम्यान प्रकाश मीना यांनी सरकारी कार्यालयात अपशब्दांचा वापर केला होता. त्यामुळे पुढे सर्व गोंधळ निर्माण झाला.

सध्या जो व्हीडिओ व्हायरल होत आहे, त्यातून संपूर्ण घटनेची केवळ एकच बाजू पसरवली जात असल्याचं सीडीएम जगदीश आर्य यांचं म्हणणं आहे.

2018 साली जेव्हा ही घटना घडली होती, त्यावेळी राजस्थानात व्हॉट्स अॅप ग्रुपवर मारहाणीचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला होता. मात्र आता वेगवेगळ्या ठिकाणांचा उल्लेख तोच व्हीडिओ करत पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट केला जात आहे.

मारहाणीच्या या प्रकरणात पुढे काय कारवाई झाली, याची अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही थेट एसडीएम जगदीश आर्य यांच्याशीच संपर्क साधला. ते म्हणाले, "जून 2018 मध्ये झालेल्या या घटनेनंतर राजस्थान सरकारने तात्काळ माझी बदली केली. त्याचसोबत, प्रकाश मीना या व्यक्तीविरोधातही तक्रार दाखल केली होती, ज्याची अजूनही कोर्टात सुनावणी सुरु आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)