गुजरातमध्ये ऑनर किलिंग: उच्चवर्णीय मुलीशी लग्न केल्यामुळं पोलिसांसमोर दलित तरुणाची हत्या

उर्मिला आणि हरेश Image copyright Solanki family

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात 'ऑनर किलिंग'चा प्रकार समोर आला आहे. हरेश सोळंकी यांनी उच्चवर्णीय मुलीशी विवाह केला होता. या मुलीच्याच कुटुंबियांनी पोलिसांदेखत हरेशची हत्या केली.

कुटुंबियांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.

हरेश सोळंकी यांचा उर्मिला या मुलीशी विवाह झाला होता. 181-अभयम या महिला हेल्पलाईनची मदत घेऊन आपल्या गर्भवती पत्नीला परत आणण्यासाठी ते उर्मिलाच्या माहेरी गेले होते. यावेळी हरेशबरोबर पोलीसही होते.

उर्मिलाच्या कुटुंबियांपैकी आठ जणांनी हरेशवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये हरेश यांचा मृत्यू झाला तर महिला कॉन्स्टेबल जखमी झाल्या आहेत. उर्मिलाच्या घरी गेलेले अभयम हेल्पलाईनचे अधिकारीच या प्रकरणात तक्रारदार झाले आहेत.

हरेश त्याच्या कुटुंबातला एकमेव कमावता होता आणि त्याच्या हत्येमुळे आता विखुरलेल्या या कुटुंबावर आर्थिक संकटही ओढवले आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत.

नेमकं काय झालं?

हरेश सोळंकी कच्छ जिल्ह्यातील अंजार तालुक्यामधील वरसामोडी गावातील रहिवासी होते. अहमदाबादमधील वरमोर गावातल्या उर्मिलावर त्याचं प्रेम होतं. दोन महिन्यांपूर्वी उर्मिला तिच्या माहेरी गेली होती. तिला परत आणण्यासाठी हरेश सोळंकींनी 181 अभयम या हेल्पलाईनची मदत घेतली.

अभयम या हेल्पलाईनच्या अधिकारी भाविकाबेन नवजीभाई सांगतात, की हरेश सोळंकींची बायको दोन महिन्याची गरोदर होती. त्यांना हे त्यांच्या सासऱ्यांना सांगायचं होतं.

गुजरातमधल्या महिलांच्या मदतीसाठी आणि संरक्षणासाठी गुजरात सरकारने '181-अभयम्' ही चोवीस तास सेवा सुरू केली आहे. गुजरात पोलिसांच्या '10091' हेल्पलाईनची पूरक सेवा म्हणून अभयम हेल्पलाईन काम करते.

Image copyright Gujarat Police

संकटकाळी महिलांना सल्ला देणं, मार्गदर्शन देणं आणि वेळ पडल्यास बचावाचं काम अभयम हेल्पलाईन करते. घटना घडली तेव्हा हरेश सोळंकींसोबत महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्पिता आणि चालक सुनीलभाई होते.

'मृत्यूचा विजय'

हरेश सोळंकींचे काका शांतीलाल सांगतात, "आमचं संपूर्ण कुटुंबच हरेशभाईवर अवलंबून होतं. त्यालाच ठार मारण्यात आलंय."

हरेशचे वडील यशवंतभाई यापूर्वी सुरक्षारक्षकाचं काम करायचे, पण आता त्यांच्याकडे काम नाही.

हरेशभाई खासगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते तर लहान भाऊ संजय मजुरीची लहानमोठी कामं करतो. वर्षभरापूर्वी त्यांनी सरकारी योजनेतून एक घर घेतलं होतं. त्याचा हप्ता हरेश भरायचा. हरेशला एक बहीण आहे, तिचं लग्न झालंय.

Image copyright Getty Images

पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार तक्रारी दाखल केल्या असून त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.

अहमदाबादचे ग्रामीण पोलीस अधीक्षक ए. व्ही असारी यांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितलं, "या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर फरार आहेत. त्यांना पाच टीम्स शोधत आहेत."

उर्मिलाचे वडील दशरथ यांचं घर पाहण्यासाठी वरमोरा गावामध्ये सोबत जायला हरेश तयार झाला.

या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद असल्याने गेली तीन वर्ष हेल्पलाईनसाठी समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या भाविका यांनी त्याला सोबत न येण्याचा सल्ला दिला होता.

पण त्यांना उत्तर देताना हरेशने सांगितलं, "असं काही नाही. तुम्हाला कोणी घर दाखवणार नाही. मी बरोबर येतो. उर्मिलाचे वडील मला ओळखतात. उर्मिला स्वखुशीने माहेरी गेली होती. मी तुम्हाला लांबून घर दाखवीन."

Image copyright Screen Grab

अभयमच्या अधिकारी भाविकाबेन आणि कॉन्स्टेबल अपर्णा या आरोपी दशरथ सिंह यांच्या घरी गेल्या. हरेशने वरमोरमध्ये त्याची पत्नी उर्मिलाची बहीण दाखवली आणि तो गाडीमध्ये ड्रायव्हरसोबत बसून राहिला.

भाविकाबेन यांनी हरेश सोळंकीची पत्नी उर्मिला, तिचे वडील दशरथ सिंह, भाऊ इंद्रजीत सिंग आणि कुटुंबातल्या महिलांसोबत 15-20 मिनिटं चर्चा केली. कुटुंबाने याबाबत महिनाभर विचार करावा अशी विनंती करून अभयमचे कर्मचारी परतले.

तेव्हाच दशरथ सिंह यांना अभयमच्या वाहनामध्ये बसलेले हरेश दिसले.

एफआयआरमध्ये करण्यात आलेल्या नोंदीनुसार दशरथ सिंह यांनी जमावाला सांगितलं, की हरेशने माझ्या मुलीला पळवून नेलं. तो गाडीत ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेला आहे. त्याला बाहेर ओढा आणि मारून टाका.

यादरम्यान अभयमच्या कारच्या मागच्या बाजूला ट्रॅक्टर आणि मोटरसायकल लावून अडथळे निर्माण करण्यात आले. ड्युटीवरील अधिकाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला. महिला कॉन्स्टेबल अर्पिता यांनी 181 क्रमांकावर फोन करत पोलिस मदत मागवली. त्यांना मुकामार बसला आहे.

या हल्ल्यात हरेश सोळंकींचा मृत्यू झाला. पंधरा मिनिटांनी मंडल पोलीस इथे दाखल झाले. त्यांनी हरेश यांचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)