जुन्या दिल्लीत मंदिरावरून निर्माण झालेला तणाव गंगा-जमुनी परंपरेमुळे कसा निवळला? - फॅक्ट चेक

हिंदू मुस्लीम Image copyright SM VIRAL POST

'पुरानी दिल्ली'च्या चावडी बाजार चौकातून हौजी काझी मार्गे लाल कुंवा बाजारापर्यंत जाणारा मुख्य रस्ता. खांद्याला खांदा खेटून जाणारी गर्दी, वेगवेगळे आवाज आणि बाजाराचा स्वतःचा असा एक विशिष्ट गंध. हे इथलं रोजचंच दृश्य असल्याचं इथे राहणारे सांगतात. मात्र आठवडाभरापूर्वी या बाजारातली परिस्थिती अशी नव्हती.

इथे संचारबंदीसदृश स्थिती होती. निमलष्करी दलाच्या अनेक तुकड्या आणि वीसहून अधिक पोलीस ठाण्यांमधले पोलीस कर्मचारी इथे तैनात करण्यात आले होते.

याला कारणीभूत ठरली एका टू-व्हीलर पार्किंगवरून काही मुलांमध्ये झालेला वाद. या वादाला धार्मिक रंग मिळाला आणि परिसरात तणाव निर्माण झाला. त्याचदरम्यान एका मंदिरावर दगडफेकीची घटना घडली. त्यावरून बरंच राजकारणही झालं.

मंदिरावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर बीबीसीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन एक बातमी केली होती. बीबीसीला आढळलं की एका घटनेने कशा प्रकारे या परिसरातल्या माणसा-माणसातलं अंतर वाढवलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लाल कुआँ बाजारातील 2 जुलै 2019 रोजीचं चित्र

या मंगळवारी मंदिराची डागडुजी आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मात्र सोशल मीडियावर बऱ्याच अफवा उठत होत्या.

त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा जुन्या दिल्लीचा दौरा केला. त्यावेळी स्थानिकांनी तिथली परिस्थिती सामंजस्याने सांभाळल्याचं आमच्या लक्षात आलं.

मंदिरात नवी सजावट

संध्याकाळच्या आरतीच्या आधी सुमारे पाच वाजता मूर्तींवरून पडदे हटवण्यात आले. मंदिरातले सगळे दरबार नव्याने सजवल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

जवळपास 15 फूट रुंद 'गली दुर्गा मंदिरात' जाताच उजव्या भिंतीवर दुर्गा, शंकर आणि राम दरबारसह इतर हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत आणि याच गल्लीत राहणाऱ्या लोकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग आहे. निमलष्करी दलाचे अनेक जवान अजूनही इथे तैनात आहेत.

हे जवान 15 ऑगस्टपर्यंत इथेच तैनात असतील, असं बोललं जातंय.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मंदिरात नव्या मूर्ती आणताना दुर्गा मंदिर कमिटीचे सदस्य

'गली दुर्गा मंदिर' प्रामुख्याने हिंदू हलवायांची गल्ली आहे. इथे मोठमोठ्या कॅटरर्ससह रोजंदारीवर काम करणारे मजूरही राहतात.

ताराचंद सक्सेना (बिट्टू) या गल्लीचे प्रमुख आहेत आणि दुर्गा मंदिर ट्रस्टचे अध्यक्षसुद्धा. त्यांनीच मंदिर समितीतर्फे मंगळवारी जुनी दिल्ली परिसरात 'शोभा यात्रा' आयोजित केली होती आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं.

ताराचंद सांगतात, "सगळं शांततेत पार पडल्याने गल्लीतले रहिवासी आनंदी आहेत. मंदिराची दुरुस्ती झाल्याने आम्ही समाधानी आहोत. अमन समितीच्या लोकांनी आमच्या सर्व कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्याने आम्हाला आनंद झाला. आमच्याकडे जे लोक छोटी-मोठी कामं करतात, ते परिस्थिती सामान्य होण्याची आतुरतेने वाट बघत होते."

Image copyright Getty Images

त्यांनी सांगितलं, "अनेक प्रकारच्या अफवा उठल्यामुळे बाहेरच्या लोकांसाठी ही घटना मोठी झाली. मीडियातल्या काही लोकांनी ही साफ खोटी बातमी दिली की मंदिरावर दगडफेक झाल्यानंतर जमावाने या गल्लीतल्या एका 17 वर्षांच्या हिंदू मुलाला उचलून नेलं. खरं म्हणजे तो मुलगा बेपत्ता होणं आणि पुन्हा घरी परतणं, याचा दगडफेकीशी काहीही संबंध नव्हता."

'मुस्लीम बांधवांनी वाटला महाप्रसाद'

गली दुर्गा मंदिरासमोर आहे गली चाबूक सवार. हा मुस्लीमबहुल परिसर आहे.

या गल्लीत राहणाऱ्या अनेकांचे फोटो शोभायात्रेनंतर सोशल मीडियावर 'एक जिंदा मिसाल' म्हणजेच 'जिवंत उदाहरण' या मथळ्याखाली व्हायरल होऊ लागले.

Image copyright SM VIRAL POST

यातले एक आहेत 52 वर्षांचे अब्दुल बाकी. ते या मुस्लीम गल्लीचे 'सदर' (प्रमुख) आहेत. त्यांना 'पानवाले' या नावानंही ओळखतात. शोभायात्रेवेळी त्यांनी दुर्गा मंदिरासमोर प्याऊ उघडला होता.

सोशल मीडियावर त्यांचा जो फोटो व्हायरल झाला त्यात ते भाविकांना जेवण वाढताना दिसतात.

अब्दुल बाकी सांगतात, "शोभायात्रेत आम्हाला सहभागी करून घेण्यासाठी आमचे हिंदू बांधव आम्हाला घ्यायला आले होते. आम्हाला कळतं की झालेल्या प्रकारामुळे त्यांचं मन दुखावलं होतं. म्हणूनच अशावेळी सेवा करण्यापासून आम्ही स्वतःला रोखू शकलो नाही. हे गुरुद्वारामध्ये भाविकांची सेवा करण्यासारखंच होतं."

Image copyright ABDUL BAQI
प्रतिमा मथळा अब्दुल बाकी (डावीकडे)

व्हायरल झालेल्या फोटोंबाबत अब्दुल बाकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं, "ज्यावेळी दुर्गा मंदिरातून शोभायात्रा सुरू झाली त्यावेळी हिंदू गल्लीतली बहुतांश माणसं शोभायात्रेसोबत पुढे गेली होती. मग आम्ही स्वयंपाक्यांसोबत महाप्रसादाचं काम सांभाळलं."

लोकांनी सांगितलं की जुन्या दिल्लीत ईदच्या काळात हिंदूसुद्धा अशा पद्धतीने छबील (प्याऊ) उभारतात.

सौहार्द्याचं हे चित्र पालटलं कसं?

गंगा-जमुनी संस्कृतीचं, बंधुभावाचं इतकं सुंदर चित्र असताना 30 जूनच्या रात्री नेमकी चूक कुठे झाली? हा प्रश्न आम्ही दोन्ही गल्ल्यांमध्ये विचारला.

डॉ. इशरत कफील म्हणाले की थोडा दोष तर सोशल मीडिया आणि अफवांचा आहे. मात्र त्याहून जास्त दोष आमच्या वयाच्या लोकांचा आहे.

प्रतिमा मथळा गली दुर्गा मंदिराचं गेट (1 जुलै 2019 चं छायाचित्र)

ते सांगतात की, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी लोकांना सोशल मीडियावरून हेच कळलं होतं की तबरेझ अंसारीप्रमाणे जुन्या दिल्लीतही मॉब लिंचिंगचा प्रकार घडला आहे. सुरुवातीच्या काही तासात कुणालाच माहिती नव्हतं की मूळ मुद्दा पार्किंगचा वाद होता.

51 वर्षांचे कफील युनानी डॉक्टर आहेत आणि अमन समितीचे ज्येष्ठ सदस्यही आहेत. 20 वर्षांहूनही अधिक काळापासून ते या भागात प्रॅक्टिस करत आहेत. आपले 75% रुग्ण हिंदू असल्याचं ते अभिमानाने सांगतात.

ते म्हणाले, "अशा घटना मूर्खपणाचा परिणाम असतात. व्हीडियोत जी मुलं मंदिरावर दगडफेक करताना दिसत आहेत त्यांनी अजून नीट किशोरावस्थेत पायही ठेवलेला नाही आणि अल्लाचं नाव घेत इतरांच्या प्रार्थनास्थळावर दगडफेक करत आहेत. असं करण्याला कुराणमध्ये पाप म्हटलं आहे. मात्र, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना कधी सांगितलं आहे का की इथे त्यांचे हिंदूंशी कसे संबंध आहेत. ते कसे एकत्र मोठे झाले. इथली संस्कृती काय आहे, हे त्यांना सांगायला हवं होतं."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शोभा यात्रेत ज्या रथातून मूर्ती आणल्या गेल्या, त्याच रथात भाविकांसह डॉ. इशरत काफील बसले होते.

दुसरीकडे हिंदु गल्लीतल्या एका ज्येष्ठ नागरिकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं, "गेल्या 25 वर्षांत इथे बाहेरून आलेले आणि मूलनिवासी यांच्या संख्येत बराच बदल झाला आहे. इथली माणसं बाहेर जात आहेत आणि बाहेरून आलेले लोक इथे भाड्याने घर घेऊन राहत आहेत. त्यामुळे या गल्ल्या आता 60-80 च्या दशकात होत्या तशा राहिलेल्या नाही. इथली संस्कृती विस्मृतीत जात आहे. बाहेरून आलेल्या ज्या लोकांची मुलं इथे मोठी झाली त्यांना कसलीच लाज राहिलेली नाही."

लाल कुंवा बाजारातले व्यापारी सांगतात की गेल्या नऊ दिवसांत तीन दिवस बाजार पूर्णपणे बंद होते. इतर दिवशीही काही काम झालं नाही. अनेक रात्री तर आम्ही झोपलोही नाही. कारण प्रकरण हाताबाहेर जाऊ नये, अशी काळजी आम्हाला लागून होती. मात्र, पोलिसांच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.

या भागातल्या ज्या जुन्या-जाणत्या लोकांशी आम्ही बोललो त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "1986-87 आणि 1992 मध्ये बाबरी मशीद विध्वंसानंतरसुद्धा या जुन्या बाजारांमध्ये तणाव निर्माण झाला होता. काही ठिकाणी संघर्षही झाला. मात्र, आमच्या या गल्ल्यांमधल्या जमावातल्या एकानेही मंदिर किंवा मशिदीबाहेरचा एक लाईटही फोडला नाही."

बाहेरून आलेले लोक

हौज काजी पोलीस ठाण्याजवळ लोकांनी आम्हाला सांगितलं की मंगळवारी जुन्या दिल्लीतल्या नया बास, खारी बावली, फतेहपुरी, कटरा बडियान यासारख्या बाजारांमधून जी शोभायात्रा काढण्यात आली त्यात बरेज जण बाहेरून आले होते. त्यांनी प्रक्षोभक भाषणं केली, घोषणाबाजी केली.

Image copyright Getty Images

यात विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र जैन यांचाही समावेश होता. दुर्गा मंदिराच्या जवळच उभारलेल्या व्यासपीठावरून ते म्हणाले, "आम्ही हौज काझीला अयोध्या बनवू शकतो. आता हिंदू मार खाणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे."

डॉक्टर कफील सांगतात की जेव्हा ही भाषणबाजी सुरू होती त्यावेळी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत व्यासपीठाच्या बाजूलाच सेवा देत होते.

हे भाषण ऐकून त्यांना वाईट वाटलं असेल का? हे आम्ही तुमच्यावर सोडतो.

मात्र 30 मिनिटं चाललेलं ते प्रक्षोभक भाषण ऐकून एका हिंदूने बीबीसीला जे सांगितलं, ते वाचा...

ते म्हणाले, "याच गली दुर्गा मंदिरामध्ये पाच वर्षांपूर्वी एक संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली होती. त्या इमारतीत 21 गरीब कुटुंबं राहायची. सर्व हिंदू होते. त्यांनी मदतीसाठी सर्वांसमोर हात पसरले. मग हळूहळू सर्व पांगले. त्यातली काही कुटुंब आजही जवळच राहतात. हे धर्म शिकवणारे त्यावेळी कुठे होते?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)