या विहिरीचं पाणी प्यायल्यानंतर जुळी मुलं होतात? आंध्र प्रदेशच्या दोद्दीगुंटा गावातील अजब दाव्याची पडताळणी

जुळ्या मुलांसोबत महिला Image copyright RAVI PEDAPOLU

एका बाजूला जिथं भारत आपल्या चांद्रयान 2 मिशनची तयारी करत आहे. तिथंच दुसरीकडे आंध्र प्रदेशमधल्या दुर्गम भागातील एका गावात वेगळीच कथा सुरू आहे. या गावातल्या एका विहिरीचं पाणी पिल्यानंतर जुळी मुले जन्मतात, असं या ठिकाणचे लोक मानतात.

दोद्दीगुंटा एक 4 हजार 500 लोकसंख्येचं छोटंस गाव. आंध्र प्रदेशात पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये रंगमपेटा तालुक्यात हे गाव आहे. या ठिकाणच्या नागरिकांच्या उत्पन्नाचं प्रमुख स्रोत शेती आहे. गावात एकच शाळा आहे. इथले लोक बहुतांश शेतीच्या कामातच व्यस्त असतात. भारतातील इतर साध्यासुध्या गावाप्रमाणेच हे एक गाव.

पण सध्या हे गाव चर्चेत आलं आहे. या गावातल्या एका विहिरीचं पाणी पिल्यानंतर जुळी मुले जन्मतात, असं एका स्थानिक टीव्ही चॅनलवर दाखवल्यानंतर या गावाने सगळ्यांचं लक्ष वेधलं.

गेल्या काही दिवसांपर्यंत ही विहीर गावासाठी पाणी पिण्याचं प्रमुख स्रोत होती. ग्रामपंचायतीच्या वतीने काही दिवसांपूर्वी गावातील घरांमध्ये पाण्याचे नळ लावण्यात आले.

Image copyright Ravi pedapolu

जर कोणी या गावात फिरलं तर रस्त्यात तुम्हाला अनेक जुळी मुळे बागडताना दिसतील. पण गावात किती जुळ्या व्यक्ती आहेत, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.

अदाप्पा या गावचे सरपंच आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की गावात 110 जुळे आहेत. गावातल्या विहिरीचं पाणी पिल्यामुळेच गावात इतके सारे जुळे असल्याचं त्यांनी सांगितलं.

ते सांगतात, तुम्ही आमच्या गावात विविध वयोगटातल्या अनेक जुळ्या व्यक्ती पाहू शकता. या वैशिष्ट्यामुळेच आमचं गाव लोकप्रिय झालं आहे.

हे सुरू कसं झालं ?

बीबीसीशी बोलताना वेंकटराव सांगतात की सर्वप्रथम जनगणनेसाठी एक शिक्षक या गावात आले होते. त्यांनीच या गावात बहुतांश घरांमध्ये जुळी मुले असल्याचं निरीक्षण नोंदवलं.

"जवळपास 15 वर्षांपूर्वी एक शिक्षक जनगणनेसाठी आले होते. प्रत्येक घरात जुळी मुले पाहून ते आश्चर्यचकीत झाले. नंतर त्यांची बदली याच गावात झाली. त्यांच्या पत्नीने याच गावात मुलांना जन्म दिला, त्यांनासुद्धा जुळी मुलेच झाली होती. पत्नीला विहिरीचं पाणी पिल्यामुळेच जुळी मुले झाल्याची बातमी त्यांनी स्थानिक माध्यमांना दिली. त्यानंतरच आमचं गाव चर्चेत आलं आहे."

Image copyright RAVI PEDAPOLU

सध्यातर परिस्थिती अशी आहे की फक्त याच नाही तर दुसऱ्या गावांतून आणि जिल्ह्यांतून लोक विहिरीचं पाणी पिण्यासाठी येतात.

हैदराबादहून या गावचं पाणी घेण्यासाठी आलेली अनिता सांगते, "आमचं लग्न होऊन चार वर्षे झाली आहेत. अनेक डॉक्टरांकडून मी उपचार घेतले. पण मूल झालं नाही. त्यामुळे नशीब आजमावण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. आम्ही इथून दोन कॅन पाणी घेऊन जात आहोत."

लक्ष्मी याच गावात राहते, तिने नऊ महिन्यांपूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. गावातल्या विहिरीमुळेच ती जुळ्या मुलांची आई बनल्याचा तिला विश्वास आहे. या शिवाय हे पाणी अनेक आजारांना दूर करणारं असल्याचाही तिने जोर देऊन सांगितलं. ती सांगते की गावात अनेकांच्या घरी नळ आहेत, पण ते विहिरीचं पाणी पिणंच पसंत करतात.

Image copyright RAVI PEDAPOLU

परंतु, दुसरीकडे बुद्धीप्रामाण्यवादी आणि डॉक्टर मात्र हा दावा फेटाळून लावताना दिसतात.

जनविज्ञानचे उपाध्यक्ष आणि बुद्धीप्रामाण्यवादी छल्ला रवी कुमार सांगतात, "या विहिरीचं पाणी पिल्यामुळे गर्भधारणेला मदत होते, याबाबत कोणताच वैज्ञानिक पुरावा नाही. पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन तसंच इतर मूलद्रव्यांचं मिश्रण असतं. कॅल्शियम कार्बोनेट, लोह तसंच कॅल्शियम पाण्यात आढळतं. पण यामुळे गर्भधारणेला कोणतीही मदत होत नाही."

ते सांगतात, "हो, असं असू शकेल की या पाण्यामुळे आजार नाहीसे होत असतील. पण जर विहिरीचं पाणी पिल्यामुळे जुळी मुले जन्मत असतील तर या गावात एकही अशी जोडी नसेल ज्यांना मुले नसतील. या गोष्टीच्या पडताळणीसाठी कोणतंच प्रमाण उपलब्ध नाही."

पाणी आणि गर्भधारणेचा कोणताच संबंध नाही

स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. पद्मजा सांगतात, "विहिरीचं पाणी पिल्यानं मुले नसलेल्यांना मुले होतात आणि जुळी मुले होतात, असं बोलण्यामागे कोणतंही ठोस पुरावा नाही."

"जनुकीय गुण आणि अनुवंशिकता या गोष्टी जुळ्या मुलांच्या जन्मासाठी महत्त्वाच्या असतात."

Image copyright RAVI PEDAPOLU

त्या पुढे सांगतात, "गर्भधारणेसाठी त्या दांपत्याची क्षमता, वय या बाबीही यासाठी महत्त्वाच्या असतात. पाणी पिल्यामुळे जुळी मुली होतात, असं म्हणणं पूर्णपणे अवैज्ञानिक आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)