तिवरे धरणफुटीनंतर दापोलीच्या गावकऱ्यांमध्ये दहशत: 'खेम धरण फुटल्यावरच प्रशासन जागं होणार?'

खेम धरणाला 25 ठिकाणी गळती लागली आहे. Image copyright Mushtaq Khan

चिपळूण जवळचं तिवरे धरण फुटलं आणि अचानक महाराष्ट्रातल्या धरणांच्या स्थितीबद्दल चर्चा सुरू झाली. परंतु धरणांच्या सुरक्षेबाबत प्रशासन अजूनही तितकं गंभीर नसल्याचं कोकणातील धरणांजवळ राहाणाऱ्या गावकऱ्यांचं मत आहे.

दापोलीच्या हर्णे जवळच्या खेम धरणही गळत आहे. सध्या हे धरण 25 हून अधिक ठिकणी गळत आहे. तसेच धरणाचे दगड निखळत आहेत.

हर्णेच्या खेम धरणाची क्षमता 13.50 दशलक्ष क्युबिक फीट एवढी आहे. जलसंपदा खातं, पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदचे अधिकारी तिवरे धरणफुटीच्या पार्श्वभूमीवर या धरणाला भेटी देत आहेत. मात्र धरणाच्या सुरक्षेवरून होत असलेल्या दिरंगाईबाबत हर्णे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अस्लम अकबानी यांनी आपला संताप बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.

"आम्ही गेल्या 10 वर्षांषासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धरणाच्या दुरुस्तीसाठी मागणी करीत आहोत. धरणाला गळती वाढत चालली आहे. धरण फुटल्यावरच प्रशासन जागं होणार आहे का?"

"विधानसभा निवडणुकीच्या आधी खेम धरणाच्या कामाला मंजुरी मिळायला हवी. आमच्या हातात जर मंजुरीची कागदपत्रं आली नाहीत तर एकाही राजकीय पुढाऱ्याला गावात फिरू देणार नाही," असं इशाराही त्यांनी दिला आहे.

Image copyright Mushtaq Khan
प्रतिमा मथळा धरणाजवळ लावलेले सूचन फलक

खेम धरणाच्या ठिकाणी ग्रामपंचायती मार्फत खबरदारीचे सूचनाफलकही लावले गेले आहेत. त्यावर "शासनाच्या अहवालानुसार धरणाची भिंत कमकुवत झाल्यामुळे धरणाचे भिंतीवर कोणीही चढू अगर उतरू नये. भिंतीचे दगड निघून अपघात होण्याची शक्यता आहे," असं लिहिलं आहे.

'शेतात काम करतानाही आमचं लक्ष नदीकडेच'

धरणाच्या सुरक्षेबद्दल अडखळ गावचे माजी सरपंच राजेंद्र कदम म्हणाले, "आमच्या गावच्या कदमवाडी, जुईकरवाडी यांना धरणफुटीचा थेट धोका आहे. चार गावांचं सार्वजनिक खेम देवस्थान आणि अंबामाता मंदिराचं मोठं नुकसान होणार आहे. यामुळे जवळपास 35 कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन रहावं लागत आहे.

"आमच्यामध्ये कमालीचं दहशतीचं वातावरण आहे. शेतीच्या कामासाठीही पाऊस असल्यानं लोकं बाहेर पडत नाहीत. मीसुद्धा शेतकरी आहे. माझीही नदीकिनारी शेती आहे. भातलावणीसाठी गेल्यानंतर सारखं नदीकडे लक्ष असायचं, एवढी भीती आमच्या मनामध्ये आहे."

या धरणाच्या माध्यमातून हर्णे, पाजपंढरी, अडखळ या गावांना पाणीपुरवठा होतो. अडखळ ग्रामपंचायतीनं 35 लाखाची नळपाणी योजना तीन वर्षांपूर्वीच सुरू केली आहे.

Image copyright MUSHTAQ KHAN

धरणाच्या बाबतीत काही दुर्घटना घडली तर दुहेरी संकट ओढवेल, असं अडखळचे उपसरपंच मनोज शिर्के सांगतात. ते म्हणाले, "या धरणामुळे जीवितहानी होईलच तसंच पाणीपुरवठाही बंद होईल अशी भीती आमच्या मनात आहे.

अडखळच्या सरपंच सुलताना अन्वर शिरगावकर सांगतात, "अडखळ खाडीमध्ये होडीतून प्रवासी वाहतूक होते. पावसाळ्यात साधारणतः 150 मच्छिमारी बोटी या खाडीत आश्रय घेतात. कदमवाडी ते इरफानिया मोहल्ला या भागातल्या घरांची मोठी हानी होण्याची भीती आहे. आमची या भीतीच्या सावटातून सुटका करण्यात यावी."

कुलाबा वेधशाळेनं 11 जुलै रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे हर्णे आणि अडखळ ग्रामपंचायती मार्फत संपूर्ण गावामध्ये खबरदारीची सूचना देण्यात आली होती.

गावामध्ये रिक्षा फिरून, धार्मिकस्थळांच्या भोंग्यांमधून ग्रामस्थांना सतर्क केलं जात होतं. या धरणाला काहीही होऊ नये, अशी प्रार्थना सर्व ग्रामस्थ करत होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आमदार संजय कदम, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी सर्वांकडे पत्र पाठवून आम्ही धरण दुरुस्तीची मागणी केली आहे. पण आमच्या हातात अजूनही ठोस निर्णय आलेला नाही. धरण दुरुस्तीला मंजुरी मिळण्याची आम्ही वाट पाहात आहोत," असं हर्णेच्या सरपंच मुनीरा शिरगांवकर सांगतात.

"खेम धरणाची दुरुस्ती व्हावी यासाठी सातत्यानं माझा पाठपुरावा सुरू आहे. लोकांचा जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जाग का येत नाही? धरणाच्या दुरुस्तीचं काम लवकर सुरू झालं नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल," असं त्या सांगतात.

तिवरे धरणः सर्व काही वाहून गेलं!

धरण दुरुस्तीवरून राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार संजय कदम यांनी "जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना या भागात आम्ही फिरकूही देणार आहे. तिवरे गावच्या धरणफुटीनंतर तरी अधिकाऱ्यांनी धडा घ्यावा," असा सल्ला दिला आहे.

"बाकीच्या सर्व गोष्टी सोडून धरणांचं ऑडिट करून त्यांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे. कोकणात ज्या धरणांना गळती आहे त्यांचं काम तातडीनं हाती घेणं आवश्यक आहे. खेम धरणाबाबत मी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोललो आहे. खेम धरणाचा प्रस्ताव देऊन पैशांची मागणीही केलेली आहे. पाऊस संपल्यावर त्याचं काम सुरू करण्यात येणार आहे," रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर सांगत होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल म्हणाल्या, "खेम धरण जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. डिसेंबर 2018 ला खेम धरण दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेनं ठराव मंजूर केला आहे. धरणाच्या दुरुस्तीसाठी आम्ही 2 कोटी 45 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. 9 जुलै 2019 रोजी आमचा प्रस्ताव मंजूर झाल्याचा ईमेल आम्हाला प्राप्त झाला आहे. जलसंपदा विभागामार्फत या धरणाची दुरुस्ती होणार आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये धरणाचं काम सुरू होईल."

Image copyright MUSHTAQ KHAN
प्रतिमा मथळा खेम धरणाला 25 ठिकाणी गळती लागली आहे.

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. खेम धरणाला गळती लागलेली आहे ही वस्तुस्थिती आहे. पण सध्या धरणाला कोणताही धोका नाहीये, असा निष्कर्ष आमच्या तांत्रिक विभागाने दिल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

खेम धरणाबरोबरच जिल्ह्यातील आणखी काही धरणांना धोका आहे का, याची आम्ही माहिती घेतली. त्यामध्ये सावर्डा जवळील राजावाडी धरणाला गळती लागली आहे. त्याचबरोबर दापोलीतील सुकोंडी धरणाला गळती लागल्यामुळे ग्रामस्थांनी दुरुस्ती मागणी केली आहे. तिवरे सारखीच ही दोन्ही धरणं मातीची असल्यामुळं ग्रामस्थांच्या मनामध्ये भीती आहे.

रत्नागिरी जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश देशमुख म्हणाले, "यंदा राजावाडी आणि सुकोंडी धरणामध्ये खबरदारी म्हणून आम्ही पाणी साठवत नाही आहोत. या धरणाचे दरवाजे आम्ही उघडलेले आहेत. पावसाळा संपल्यानंतर या धरणांची कामं आम्ही हाती घेणार आहोत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)