बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष #5मोठ्या बातम्या

बाळासाहेब थोरात Image copyright Balasaheb thorat twitter

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यात मोठा बदल केला आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभेतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात येईल, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

तसेच काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी के. सी. पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त सकाळने प्रसिद्ध केले आहे.

प्रदेशाध्यक्षांसोबतच काँग्रेसने पाच कार्यकारी अध्यक्षही नेमले आहेत. यामध्ये युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार विश्वजित कदम, नितीन राऊत, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांचा समावेश आहे. तसंच निवडणुकांशी संबंधित सर्व समित्यांचीही घोषणा करण्यात आली.

2. राजस्थानात जमावाकडून पोलिसाची हत्या

राजस्थान येथील राजसमंद जिल्ह्यात जमिनीशी संबंधित वादाचा तपास करण्यासाठी गेलेल्या हेड कॉन्स्टेबल गनी मोहम्मद यांची जमावाने मारहाण करून हत्या केली. हे वृत्त एनडीटीव्ही इंडियाने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

गनी मोहम्मद हे जमीन प्रकरणाचा तपास करण्यासाठी गावात आले होते. दरम्यान, प्रकरणातील आरोपींनी 48 वर्षीय मोहम्मद यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

3. 'पश्चिम बंगालचे 107 आमदार लवकरच भाजपमध्ये'

पश्चिम बंगालमधील इतर पक्षांचे तब्बल 107 आमदार लवकरच भाजपात दाखल होणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपा नेते मुकुल रॉय यांनी केला आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला.

या आमदारांमध्ये राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेससह काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांचा समावेश असल्याचे रॉय यांनी सांगितले. आमच्याकडे त्या सर्व आमदारांची यादी असून ते आमच्या संपर्कात आहे, असंही त्यांनी सांगितलं. याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने वेबसाईटवर प्रकाशित केले आहे.

4. NIA चे तमिळनाडूत चार ठिकाणी छापे

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAने शनिवारी तामिळनाडूमध्ये चार छापे मारले. गेल्या महिन्यात कोइंबतूर येथून सहा जणांना अटक करण्यात आली होती. हे सर्व आरोपी आयसिसबद्दल सहानुभूती बाळगून आहेत असा त्यांच्यावर आरोप होता. याच तपासाचा पुढील भाग म्हणून हे छापे मारण्यात आले आहेत.

तामिळनाडू आणि केरळमध्ये हल्ले घडवून आणण्यासाठी तसेच सोशल मीडियावर आयसिसचा प्रचार करण्यासाठी नवी भरती करण्याचा या लोकांचा डाव होता असं NIAनं सांगितलं. हे वृत्त द हिंदूने दिलं आहे.

5. मराठा आरक्षण : भरतीसाठी बिंदूनामावली जाहीर

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) म्हणजेच मराठा समाजाच्या सरळसेवा भरतीसाठी आरक्षण तरतुदीनुसार सुधारित आरक्षित बिंदूनामावली राज्य शासनाने निश्चित केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय ४ जुलै रोजी जारी केला आहे.

या निर्णयानुसार मराठा समाजाच्या सर्वच प्रवर्गाची तीन वर्षाची आरक्षित बिंदूनामावली जाहीर करण्यात आली आहे.

Image copyright HINDUSTAN TIMES/GETTY IMAGES

यात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने २७ जून २०१९ रोजी दिलेल्या निर्णयानुसर सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गासाठी राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय, निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये १३ टक्के आरक्षण विहीत करण्यात येत आहे. त्यानुसार बिंदूनामावली सुधारित करण्यात आली आहे.

हा निर्णय राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, सेवामंडळे, पालिका, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, महामंडळे, शासकीय अनुदान प्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था, शासनाने अनुदान दिलेल्या मंडळांना लागू राहील. हे वृत्त लोकमतने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)