चांद्रयान-2 मोहीम स्थगित, इस्रो पुढची तारीख सांगणार #5मोठ्याबातम्या

Image copyright ISRO

1. चांद्रयान-2 मोहीम तात्पुरती स्थगित

तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-2 चे प्रक्षेपण रद्द करण्यात आलं असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल, असं इस्त्रोने सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

आज 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार होते.

भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' या मोहिमेकडे संपूर्ण देश डोळे लावून होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोहीम रद्द झाली आहे.

इंधन गळतीमुळे थांबवण्यात आलं चांद्रयान

इंधन गळतीमुळे चांद्रयान-2 थांबवण्यात आलं असण्याची शंका इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांनी केलं आहे.

"आपल्या जवळ अद्ययावत यंत्रणा आहे त्यामुळे आपण कुठे बिघाड आहे हे ओळखू शकलो, भविष्यात मोठी अडचण निर्माण होण्यापेक्षा त्यावर आधीच उपाय योजना करणं हे केव्हाही चांगलंच. हे मिशन स्थगित करून इस्रोने योग्य निर्णय घेतला आहे.

"या तांत्रिक अडचणीचं नेमकं कारण शोधावं लागणार आहे. अशी शंका आहे की गॅस स्टोअरेज सर्किटमध्ये गळती असू शकते. ते नेमकं शोधावं लागणार आहे. दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागेल हे त्यानंतरच कळू शकतं," असं माधवन नायर एएनआय या वृत्त संस्थेला सांगितलं.

2. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार - मुख्यमंत्री

विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा वाढवून नुकसान भरून काढण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त ई-सकाळने वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

Image copyright DEVENDRA FADANVIS

सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन चळवळीच्या शिष्टमंडळाशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सांगितलं. आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही, त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा, त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येईल.

राज्य शासन खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 604 अभ्यासक्रमांकरिता 50 टक्के शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

3. विठ्ठलाच्या शासकीय पूजेदरम्यान गर्दीच्या नियंत्रणासाठी नियमावली बनणार

आषाढी एकादशीच्या महापूजेवेळी यावर्षी मोठ्या संख्येने व्हीआयपी मंडळींनी चौखांबी आणि गाभाऱ्याजवळ प्रवेश केला होता. त्यामुळे महापूजा करणाऱ्या मुख्यमंत्री दांपत्यासह वारकरी दांपत्यालाही त्रास झाला. या बाबीकडे लक्ष वेधून शासकीय महापूजेदरम्यान उपस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली बनवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने विधी व न्याय विभागाकडे केली आहे.

Image copyright DEVENDRA FADANVIS

यापुढे मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला गाभाऱ्यात आणि चौखांबीमध्ये किती लोक उपस्थित राहतील, याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जाईल. यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंदिर प्रशासनाला दिले आहेत. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे.

4. 'नाणार'च्या समथनार्थ शनिवारी रत्नागिरीत मोर्चा

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित बहुचर्चित तेलशुद्धीकरण प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रायगड जिल्ह्यात हलवण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना जिल्ह्यातील विविध संस्था, सामाजिक संघटना प्रकल्पाच्या समर्थनासाठी एकवटल्या आहेत. या प्रकल्पाच्या समर्थनासाठी शनिवारी, २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

प्रतिमा मथळा प्रतिकात्मक छायाचित्र

विविध संघटनांनी एकत्र येत यासाठी कोकण विकास समितीची स्थापना केली आहे. समितीचे प्रवक्ता अविनाश महाजन यांनी पत्रकार परिषदेत प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. काही राजकारणी आणि इतर व्यक्तींचा प्रकल्पाला विरोध आहे. त्यांच्या दबावामुळे प्रकल्पाला पाठिंबा असलेले बहुसंख्य गप्प राहिले, पण आता वातावरण बदलले आहे, असा दावा महाजन यांनी केला आहे. हे वृत्त लोकसत्ताने वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

5. गेस्ट हाऊसची इमारत कोसळून 2 जवान ठार

हिमाचल प्रदेशमधील सोलन येथे इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. सोलन येथील कुमारहट्टी-नाहन महामार्गावरील गेस्ट हाउसची इमारत कोसळली.

यावेळी ३० जवानांसह ७ नागरिक घटनास्थळी होते. यातील १८ जवान आणि ५ नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून २ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली १४ लोक अडकले आहेत. याबाबतचे वृत्त हिंदुस्तान टाईम्स मराठी या वेबसाईटने प्रसिद्ध केले आहे.

हे वाचलंत का?